सरकारी हप्तेखोरीचा स्वकियांकडूनच पोलखोल

राष्ट्रीय मीडियाकडून गोवा सरकारचा पंचनामा



गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि परप्रांतीय पर्यटन व्यवसायिक यांच्यात साटेलोटे झाले असून लाखो रुपयांचे हप्ते ठरवून बेकायदा परवाने बहाल केले जात आहेत. यामुळे लोकांच्या, किंबहुना पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हडफडे दुर्घटनेनंतर राज्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय मीडियाकडून सरकारी हप्तेखोरीचा पंचनामा सुरू असल्याने राज्य सरकारची मोठी अडचण बनली आहे.
भाजपात अस्वस्थता
राज्यातील भाजप सरकारातील आणि पक्षातील नेते आता उघडपणे आपल्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करू लागले आहेत. सर्वत्र हप्तेखोरीचा बाजार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. किनारी भागात पर्यटनाच्या नावाखाली अनेक बेकायदा आणि गैरधंदे सुरू असून त्यांना हप्ते लावून संरक्षण दिले जात असल्याचे आरोपही पुढे आले आहेत.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो, साळगांवचे माजी आमदार तथा माजी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना या सर्व गोष्टींचा पोलखोल करून आपल्या सरकारची कोंडी केली आहे. या घटनेनंतर भाजपात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
हप्तेखोरीचे ऑडिट करा
हडफडे दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व नाईटक्लबांचे अग्निसुरक्षा ऑडिट सुरू झाले आहे. याबाबत उत्पल पर्रीकर यांनी, “अग्निसुरक्षेपेक्षा हप्तेखोरीचे ऑडिट करा, जेणेकरून या सगळ्या गैरकारभारांना कुणाकडून संरक्षण मिळते हे उघड होईल,” असा आरोप केला.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्यातील बहुतांश नाईटक्लब विनापरवाना सुरू असल्याची टीका केली. बहुतांश नाईटक्लब पर्यायी परवान्याखाली हप्ते देऊन इतर परवाने प्राप्त करून व्यवसाय चालवतात, असा आरोप त्यांनी केला. “किमान हडफडेच्या घटनेनंतर तरी या गोष्टी बंद करून हा व्यवसाय रूळावर आणण्याची गरज आहे, अन्यथा गोव्याचा पर्यटन व्यवसाय कोलमडेल,” असेही त्यांनी म्हटले.
मला लाज वाटते भाजपचा नेता म्हणवून घ्यायला
राज्यातील भाजप पक्षात जे काही सुरू आहे ते पाहता “मलाच भाजपचा नेता म्हणवून घ्यायला लाज वाटते,” अशी तीव्र प्रतिक्रिया माजी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी दिली.
हडफडेची घटना घडली असताना भाजपचाच एक उमेदवार आपल्या पत्नीसह डान्स पार्टीत नृत्य करत असल्याचे पाहिल्यानंतर “मान शरमेने खाली जाते,” असेही ते म्हणाले.
भाजपात नव्याने दाखल झालेल्या लोकांना पक्षाची शिस्त आणि ध्येयधोरणे माहित नाहीत. त्यांच्या कृतींमुळे पक्षाची बदनामी होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

कामणा बेकायदा चिरे खाणींवरील
कारवाई अखेर कोणी रोखली?

खाण संचालकांचे पोलिस महासंचालकांना कारवाईचे आदेश
गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

केपे तालुका आणि सांगे मतदारसंघातील कामणा–कावरे येथे सुरू असलेल्या बेसुमार बेकायदा चिरे खाणींचे प्रकरण आता थेट पोलिस महासंचालकांपर्यंत पोहोचले आहे. खाण खात्याच्या कारवाईला अटकाव झाल्यानंतर खाण संचालकांनी पोलिस महासंचालकांना थेट कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.
कामणा–कावरे गावात सुमारे ४७ बेकायदा चिरे खाणी सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांचा विरोध मोडून राजकीय आशीर्वादाने या खाणी चालवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वनक्षेत्रातील या जागेत सुरू असलेल्या खोदकामामुळे प्रचंड धूळप्रदूषण होत असून रोजच्या ट्रकांच्या रहदारीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांना कुणीच वाली नाही
कामणा–कावरेतील बेकायदा चिरे खाणींबाबत स्थानिकांनी पंचायतीसह वन विभाग, पोलीस, मामलतदार कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, खाण विभाग, आरटीओ, वाहतूक पोलीस, तलाठी आदींकडे तक्रारी केल्या. तरीदेखील कोणतीही कारवाई होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी खाण विभागाने छापा टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही कारवाई रोखण्यात आली. या बेकायदा खाणींचे चालक दरमहा प्रति मशीन सुमारे ₹१ लाख देऊन अधिकाऱ्यांच्या मदतीने आपला व्यवसाय सुरळीत चालवतात, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.

  • Related Posts

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    राजकीय दबावापुढे म्हापसा पोलिस हतबल ? गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) धुळेर-म्हापसा येथील एका घरात व मालमत्तेत कथितरीत्या बेकायदा प्रवेश करून बाऊन्सर्सच्या मदतीने कुटुंबीयांना घराबाहेर काढणे, मारहाण करणे, मौल्यवान वस्तू ताब्यात…

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा हल्लाबोलगांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मतदारसंघनिहाय सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमताची चाचपणी सुरू केली…

    You Missed

    26/08/2026 e-paper

    26/08/2026 e-paper

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    आरोप गंभीर; सत्य काय ?

    आरोप गंभीर; सत्य काय ?

    25/08/2026 e-paper

    25/08/2026 e-paper

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?