स्वप्नेश शेर्लेकर यांची साळ ग्रामपंचायतीकडे तक्रार
गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी डिचोली तालुक्यातील साळ ग्रामपंचायतीकडे केलेल्या तक्रारीत सर्व्हे क्र. २१६/१ या जमिनीवर बेकायदेशीर बांधकामे आणि संरक्षक भिंत उभारल्याची गोष्ट नजरेला आणून दिली आहे. या जमिनीचे मालक म्हणून राज्याचे पंचायतमंत्री व दाबोळीचे आमदार मॉविन गुदीन्हो, मारिया गुदीन्हो आणि गॉडफ्रे लॉरेन्स यांची नावे एक चौदाच्या उताऱ्यावर नोंदवलेली आहेत.
ही जमीन प्रादेशिक आराखडा २०२१ नुसार ‘शेतीयोग्य क्षेत्रा’त येते. येथे शेतीखेरीज इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे उभारण्यात आलेली बांधकामे व संरक्षक भिंत ही जमिनीच्या वापरात बेकायदेशीर बदल असल्याचे शेर्लेकर यांनी नमूद केले आहे. ही जमीन तिलारी सिंचन प्रकल्पाच्या अधिसूचित क्षेत्रात येते, जिथे सिंचन क्षमता व कृषी शाश्वतता जपण्यासाठी बांधकामांवर निर्बंध आहेत.
१४ जानेवारी २०२६ रोजी साळ ग्रामपंचायतीने दिलेल्या माहिती अधिकार (आरटीआय) उत्तराचा हवाला देत शेर्लेकर यांनी सांगितले की सर्व्हे क्र. २१६/१ मध्ये कोणत्याही बांधकामासाठी किंवा संरक्षक भिंतीसाठी परवाना मंजूर केलेला नाही. त्यामुळे हे बांधकाम गोवा पंचायत राज अधिनियम, १९९४ च्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीत आणखी नमूद केले आहे की साळ ग्रामपंचायत व जिल्हा ग्रामीण विकास संस्था (डीआरडीए) यांनी सार्वजनिक निधीतून बांधलेला रस्ता थेट या मालमत्तेच्या संरक्षक भिंत आणि गेटपाशी संपतो. हा रस्ता सार्वजनिक उपयोगाऐवजी खासगी प्रवेशरस्ता म्हणून वापरला जातो.
शेर्लेकर यांनी ग्रामपंचायतीला या बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याची, संबंधित मालकांना नोटिसा देण्याची आणि आवश्यक असल्यास बांधकामे पाडून जमीन मूळ शेतीयोग्य स्थितीत आणण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक निधीचा वापर करून बांधलेल्या रस्त्याबाबत पारदर्शक चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.







