धारगळ गावांत महोत्सव नकोच
पणजी,दि.१९(प्रतिनिधी)
पेडणे तालुका नागरिक समितीचे माजी अध्यक्ष तथा पेडणेचे सक्रीय सामाजिक कार्यकर्ते भरत बागकर यांनी धारगळ येथील नियोजित सनबर्न महोत्सवाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही याचिका बुधवार २० रोजी सुनावणीसाठी येणार आहे.
या याचिकेत विविध १४ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पेडणे तालुक्यातील धारगळ या गावांत हा संगीत, नृत्य रजनी महोत्सव का नको आणि त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, याबाबत अनेक महत्वाचे मुद्दे याचिकादाराने मांडले आहेत. धारगळसारख्या गावावर तसेच या परिसरावर नेमका काय परिणाम होऊ शकतो तसेच ही नियोजित जागा राष्ट्रीय महामार्गाला टेकूनच असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठीही या महोत्सवाचा अडथळा निर्माण होऊन गैरव्यवस्था होऊ शकते,असे अनेक मुद्दे यात उपस्थित करण्यात आले आहेत.
या सर्व मुद्दांवर आता न्यायालय नेमकी काय भूमीका घेते आणि या महोत्सवाबाबत सरकारची नेमकी भूमीका काय हे या याचिकेवरून उघड होणार आहे. भरत बागकर यांच्या या याचिकेचे पेडणे तालुक्यातील अनेक भागांतून स्वागत करण्यात आले आहे.