स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी

गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित तसेच स्थानिकांनी विरोध सुरू केल्यानंतर, या स्पर्धेला समर्थन मिळवण्यासाठी काही राजकीय शक्तींनी सरपंच, पंच आणि टॅक्सी व्यवसायिकांना पुढे केले आहे. स्थानिक पातळीवर पंचायतीचे विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या सरपंच व पंचसदस्यांना या रेस स्पर्धेची एवढी गोडी का, असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रस्तावित फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस कोणत्याही परिस्थितीत आयोजित करण्याचा चंग सरकारने बांधला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही जबाबदारी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्यावर दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांना विश्वासात घेतले नसल्याची कुरबुर त्यांच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मीडियाला आमंत्रित करून या स्पर्धेचे जोरदार समर्थन करण्याचे काम सुरू आहे. गोवा कुळ-मुंडकार संघटना तसेच काही मोपा विमानतळ भूपीडित, लिंक रोड भूपीडित आदींकडून या स्पर्धेला हरकत घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही, मोपा विमानतळ व आयुष इस्पितळावरील रोजगाराच्या नावाने थट्टा, तसेच स्थानिकांचे अन्य विषय प्रलंबित असताना कोट्यवधी रुपये खर्चून अशा स्पर्धा घडवून आणण्यामागे केवळ काही लोकांचा स्वार्थ असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, या स्पर्धेला चांदेलचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य तुळसीदास गांवस, कासारवर्णेच्या सरपंच अवनी गाड तसेच काही टॅक्सी व्यवसायिकांनी पाठींबा दिला आहे. या स्पर्धेमुळे स्थानिकांना फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक नागरिक या आयोजनाला विरोध करत असून न्यायालयात जाण्याची तयारी सुरू आहे.
जीत आरोलकरांची नेहमीच जीत
गेल्या काही काळापासून पेडणे तालुक्यात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयात आमदार जीत आरोलकर यांची निर्णायक भूमिका होती, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. याआधी धारगळ-पेडणे येथे सनबर्न फेस्टिव्हल आयोजनातही जीत यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पेडणे मतदारसंघात जीत आरोलकर यांचे राजकीय वर्चस्व वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी हे ओळखून आता पेडणेच्या विषयांची जबाबदारी जीत आरोलकरांवर सोपवण्याचे ठरवले आहे.
विमानतळ कराराचा भंग
स्ट्रीट रेसच्या आयोजनामुळे गोवा सरकार आणि जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्यातील सवलत कराराचा भंग होत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, ८ नोव्हेंबर २०१६ च्या सवलत करारानुसार जीजीआयएएलची स्थापना केवळ विमानतळाचा विकास, संचालन व व्यवस्थापनासाठी करण्यात आली आहे. करारातील कलम ५.१४ नुसार, विमानतळाशी असंबंधित कोणताही व्यावसायिक उपक्रम राबवता येत नाही. विमानतळ परिसरात व्यावसायिक मोटरस्पोर्ट स्पर्धा आयोजित करणे हे करारबाह्य ठरू शकते.
तसेच, करारातील कलम ५.४.२(क्यू) आणि २८.४.१ नुसार मंजूर मास्टर प्लॅनशिवाय कोणताही भू-वापर बदल करता येत नाही. विमानतळाच्या प्रवेश रस्त्यांवर व कार्यरत भागांमध्ये रेस ट्रॅक उभारणे हे अनधिकृत भू-वापर परिवर्तन असल्याचा आरोप होत आहे. सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. इंधन साठवणूक क्षेत्राजवळ उच्च वेगाने होणारी रेस आग, स्फोट आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. डीजीसीएच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    किमान वेतनात मोठी वाढ करा

    आयटकचा सरकारला निर्वाणीचा इशारा गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन राज्यातील कामगारांचे किमान वेतन तातडीने वाढवावे, अशी मागणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या गोवा…

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    Senior Aam Aadmi Party leader Francis Coelho has resigned from AAP Goa, citing political disagreement over alliance strategy ahead of the 2027 Goa Assembly elections and questioning the formation of a separate Opposition front.

    You Missed

    22/09/2026 e-paper

    22/09/2026 e-paper

    १४ वर्षांचा सत्तावनवास संपणार ?

    १४ वर्षांचा सत्तावनवास संपणार ?

    किमान वेतनात मोठी वाढ करा

    किमान वेतनात मोठी वाढ करा

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    21/09/2026 e-paper

    21/09/2026 e-paper

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?