हा कसला ‘संकेत’ ?

पण एवढे निश्चित आहे की, संकेत आर्सेकर यांनी दिलेला हा “संकेत” गोव्याच्या राजकारणात दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले की केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर सत्ताधारी पक्षातील प्रत्येक हालचालही राजकीय विश्लेषणाचा विषय ठरते. काही निर्णय औपचारिक वाटले तरी त्यामागे दूरगामी राजकीय संदेश दडलेले असतात. मुख्यमंत्री कार्यालयाच्या संयुक्त सचिवपदाचा संकेत आर्सेकर यांनी दिलेला राजीनामा हा अशाच निर्णयांपैकी एक मानला जात आहे. हा केवळ एका अधिकाऱ्याचा राजीनामा नसून, गोव्यातील भाजपच्या आगामी राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाहूल देणारा संकेत ठरतो.
आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात “आता माघार नाही” अशी घोषणा करणाऱ्या संकेत आर्सेकर यांनी काही दिवसांतच मुख्यमंत्री कार्यालयातील पदाचा राजीनामा दिला. तो अद्याप स्वीकारला गेला नसला तरी राजकीय नियुक्ती असल्याने स्वीकारला जाणे निश्चित मानले जाते. प्रश्न एवढाच आहे की, ही वेळ का निवडली गेली?
गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांनी सावर्डे मतदारसंघात नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. कोणत्याही मोठ्या घोषणांशिवाय, प्रचाराशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे, सामाजिक संपर्क आणि जनाधार वाढविण्यावर भर दिला. आज त्या कामाचे राजकीय रूपांतर करण्याची वेळ त्यांनी साधल्याचे दिसते.
संकेत आर्सेकर यांचा प्रवास संघ परिवाराच्या कार्यपद्धतीतून घडलेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ आणि युवा मोर्चा अशा संघटनांमध्ये काम करत त्यांनी स्वतःला तयार केले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यशैलीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. आल्तिनोवरील मुख्यमंत्री निवासस्थानी राहून शिक्षण पूर्ण करताना पर्रीकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि प्रशासन, संघटन व नेतृत्वाचे धडे त्यांनी घेतले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या काळात त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला खरी उभारी मिळाली. तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ संकेत आर्सेकर यांना झाला, असे मानले जाते.
मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असतानाच त्यांनी सावर्डे मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. रस्ते, सरकारी नोकऱ्यांसाठी पाठपुरावा, वैद्यकीय मदत, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग, युवकांचे संघटन अशा माध्यमांतून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. बजरंग दल, गोसेवा उपक्रम, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उपस्थिती यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारले.
भाजपसमोरचे मोठे आव्हान म्हणजे नवीन नेतृत्व उभे करणे. अनेक मतदारसंघांत पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी युवकांना संधी देण्याबाबत केलेली घोषणा याच पार्श्वभूमीवर पाहावी लागेल.
सावर्डेत संकेत आर्सेकर आणि कुडचडेत रोहन गावस देसाई यांनी विद्यमान आमदारांच्या प्रभावक्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडून त्यांना रोखले गेलेले दिसत नाही. त्यामुळे या हालचाली पक्षाच्या माहितीशिवाय होत आहेत, असे मानणे कठीण आहे.
सावर्डे मतदारसंघात माजी मंत्री विनय तेंडुलकर, माजी मंत्री दीपक पाऊसकर आणि विद्यमान आमदार डॉ. गणेश गावंकर यांसारखे प्रभावी नेते आहेत. या पार्श्वभूमीवर संकेत आर्सेकर यांनी अद्याप उमेदवारीचा दावा केलेला नसला तरी तिकीट मागण्याइतकी ताकद त्यांनी निर्माण केली आहे.
राजीनाम्यानंतर त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय मर्यादा राहणार नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय दौरे, जनसंपर्क आणि संघटनात्मक काम अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सभापती म्हणून घटनात्मक मर्यादांमुळे डॉ. गणेश गावंकर यांना उघड संघर्षात उतरता येत नाही. या परिस्थितीचाही लाभ संकेत आर्सेकर यांना मिळू शकतो.
तथापि, या घडामोडीकडे केवळ गटबाजी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही मोठ्या पक्षात नवीन नेतृत्व पुढे येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असते. प्रश्न एवढाच असतो की, ती प्रक्रिया नियोजनबद्ध असते की संघर्षपूर्ण.
आता पाहायचे एवढेच की, हा निर्णय एका नव्या नेतृत्वाचा उदय ठरेल की भाजपातील अंतर्गत स्पर्धेला अधिक तीव्र करणारा टप्पा ठरेल. पण एवढे निश्चित आहे की, संकेत आर्सेकर यांनी दिलेला हा “संकेत” गोव्याच्या राजकारणात दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

  • Related Posts

    कॅसिनो की कायदा ?

    गोमंतकीय कुटुंबांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून स्थानिकांना कॅसिनोमध्ये प्रवेशबंदी आहे. जर जुगार इतका घातक आहे, तर तो इतर भारतीय नागरिकांसाठी कसा काय योग्य ठरतो?कॅसिनो की कायदा ? डेल्टा कॉर्प…

    करिअर की संस्कृती ?

    गोव्यासारख्या राज्यासाठी रोजगार धोरण तयार करताना स्थानिक संस्कृती, धार्मिक परंपरा, गावांची सामाजिक रचना आणि लोकजीवन यांचा अभ्यास आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय युवकांना दिलेला सल्ला प्रथमदर्शनी चुकीचा…

    You Missed

    Has the Casino Lobby Captured the Government? EiE Convenor Retd. Justice Ferdino Rebello Fires 10 Questions at Goa Government

    Has the Casino Lobby Captured the Government? EiE Convenor Retd. Justice Ferdino Rebello Fires 10 Questions at Goa Government

    Goa Forward Students’ Wing Demands Direct KTCL Bus Services to Goa University

    Goa Forward Students’ Wing Demands Direct KTCL Bus Services to Goa University

    07/07/2026 e-paper

    07/07/2026 e-paper

    टीसीपी कार्यालयावर १७ रोजी जनआक्रोश

    टीसीपी कार्यालयावर १७ रोजी जनआक्रोश

    हा कसला ‘संकेत’ ?

    हा कसला ‘संकेत’ ?

    06/07/2026 e-paper

    06/07/2026 e-paper