पणजी, दि. ६ ऑगस्ट : एकाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट अभिनय असे दोन मानाचे पुरस्कार पटकावणारा बहुचर्चित कोंकणी लघुपट ‘आंसेसांव’ याची १५व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठेच्या महोत्सवात निवड झालेला हा एकमेव कोंकणी चित्रपट ठरला आहे.
७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय गोवा मराठी चित्रपट महोत्सवात ‘आंसेसांव’चे प्रदर्शन शनिवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजता माकिनेझ पॅलेस येथे होणार आहे. कोंकणी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन मांगिरीश बांदोडकर यांनी केले असून निर्मिती डॉ. के. के. संझगिरी यांनी केली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री प्रशांती तळपणकर यांनी ‘आंसेसांव’ या वृद्ध महिलेची प्रमुख भूमिका प्रभावीपणे साकारली आहे.
गेल्या वर्षी कॅनडातील टोरोंटो येथे झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आंसेसांव’ला उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट अभिनय असे दोन पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर गोव्यातील विविध चित्रपट महोत्सवांमध्येही या लघुपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
आता गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील निवडीमुळे ‘आंसेसांव’ला मराठी चित्रपट रसिकांसमोर सादर होण्याची आणखी एक महत्त्वाची संधी मिळाली असून, या चित्रपटाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.





