धारगळ पंचायतीचा सनबर्नला पाठींबा
पेडणे, दि. २ (प्रतिनिधी)
पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर, धारगळीतील ग्रामस्थ तथा पेडणेतील इतर भागांतील लोकांचा विरोध डावलून धारगळ पंचायतीने ५ विरूद्ध ४ अशा मतांनी सनबर्न महोत्सवाला तत्वतः ना हरकत देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. हा ठराव मंजूर करून सत्ताधारी पंचायत मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विनंतीचा अखेर मान राखला.
धारगळीवासीयांत दुफळी
धारगळ येथील नियोजित सनबर्न महोत्सवाला विरोध करण्यासाठी आमदार प्रविण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठी सभा रविवारी धारगळ पंचायतीसमोर झाली. या सभेला मोठ्या संख्येने महिला, तरूण वर्ग, धारगळीतील ग्रामस्थ तथा पेडणेतील इतर भागांतील लोकांचाही सहभाग होता. या सभेत सनबर्न धारगळीत होऊ न देण्याचा निर्धार करण्यात आला. ह्याच दरम्यान, धारगळचे सरपंच सतीश धुमाळ तथा सत्ताधारी पंचायत मंडळीकडून एका वेगळ्या सभेचे आयोजन करून त्यात धारगळीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत सनबर्नचा धारगळवासीयांना लाभ होणार असल्याचे सांगून या महोत्सवाला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. धारगळचे विद्यमान सत्ताधारी पंचायत मंडळ आमदार आर्लेकर यांच्या विरोधात असल्याने त्यांनी सनबर्नच्या निमित्ताने आमदार आर्लेकर यांना आव्हान देण्याची संधी या विषयावरून प्राप्त करून घेतली.
आमदार बेभरवशी
पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर आणि त्यांच्यासोबत असलेली मंडळी बेभरवशी असल्याची टीका या सभेत करण्यात आली. धारगळ येथील सिमेंट काँक्रिट प्रकल्प, डेल्टीन कॅसिनो प्रकल्प आदींबाबत आमदाराने कोलांट उडी घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारचे घटक असूनही विश्वासान घेतले नाही,असे म्हणणे हे आमदाराला किती शोभते,असाही सवाल करण्यात आला. केवळ आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या मर्जीतील लोकांना एकत्र करून विरोध केला जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली. धारगळ पंचायतीकडून काही अटी आयोजकांपुढे सादर केल्या जातील. या अटींत कचरा व्यवस्थापनासाठी वाहन, स्थानिकांना महोत्सव काळात रोजगार आणि व्यवसायसंधी आदींचा समावेश असेल. या अटी मान्य झाल्या तर हा महोत्सव होण्यात काहीच हरकत नाही,असा निर्धार या सभेत करण्यात आला.
ग्रामसभेचा विश्वासघात
ग्रामसभेत सर्वांनुमते सनबर्नला विरोध दर्शवून परवाना न देण्याचा ठराव मंजूर झाला असताना पंचायत मंडळ बहुमताच्या आधारे तत्वतः मंजूरी देते ही निव्वळ लोकशाहीची थट्टा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पंचायत राज्य कायद्यात ग्रामसभा ही सर्वश्रेष्ठ आहे. हा विषय न्यायालयापुढे सुनावणीसाठी येईल,असेही यावेळी सांगण्यात आले.
विरोधक, समर्थक भाजपचेच
सनबर्नवरून एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दोन्ही गट भाजप समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधी गटाचे नेतृत्वच आमदार आर्लेकर करत आहेत तर समर्थक गटाच्या लोकांनीही आम्ही भाजपचेच कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. खात्रीलायक माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आमदार आर्लेकर यांना लोकांसोबत राहण्याचा सल्ला दिला आहे तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सनबर्न समर्थकांना पूर्ण पाठींबा असल्याची खबर या परिसरात चर्चेत आहे.