किमान समान कार्यक्रमावर भर
गांवकारी,दि.२८(प्रतिनिधी)
काँग्रेस आणि आरजीपी पक्षाच्या युतीसंबंधीची दुसरी महत्वाची बैठक आज पार पडली. किमान समान कार्यक्रमावर आजच्या बैठकीत दीर्घ चर्चा करण्यात आली. जागा वाटप किंवा अन्य गोष्टींबाबत अद्याप चर्चा झाली नसली सकारात्मक पावले पडत असल्याने ही युती स्पष्ट विचारांवर आणि ठोस कार्यक्रमावर आधारित असेल,असा विश्वास आरजीपीच्या प्रदेश अध्यक्ष शविना नाईक शिरोडकर यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस तसेच आरजीपीच्या वतीने आमदार विरेश बोरकर, प्रदेश अध्यक्ष शविना नाईक शिरोडकर तथा अन्य पदाधिकारी हजर होते. पोगो हा विषय कायम असून त्याबाबत पक्ष तडजोड करणार नाही,असेही शविना शिरोडकर हीने स्पष्ट केले. दीर्घ चर्चा, स्पष्ट विचार आणि गोव्यासंबंधीचे सुरक्षित भवितव्य लक्षात घेऊन लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करणारी ही युती ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
काँग्रेस- आरजीपी युतीची चर्चा सुरू असली तरी ही युती इतर भाजपविरोधी पक्षांसाठीही खुली आहे. ज्या कुणाला या युतीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी निश्तितपणे पुढे यावे,अशी माहिती डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली.




