बलात्कारप्रकरणी दोषीला जन्मठेप!
गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी)
अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला पणजी येथील गोवा राज्य बाल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास करणाऱ्या कोलवा पोलीस स्थानकाच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासकार्याला या निकालामुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
मे २०१९ मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्यामुळे ती गर्भवती राहिल्याचे समोर आले होते. या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस यांनी हाती घेतला होता.
कोलवा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सपना गावस यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकिल ॲड. तेमा नार्वेकर यांनी न्यायालयात मांडली.
बाल न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप आणि दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याने पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
तपास अधिकारी सपना गावस, त्यांना मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक राहुल परब आणि सरकारी वकिल तेमा नार्वेकर यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणाला न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक टप्पा गाठता आला.






