फातोर्ड्यात वोट चोरी उघड

आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप

गांवकारी,दि.१७(प्रतिनिधी)

फातोर्डा मतदारसंघातील मतदारयादीतून तब्बल साडेचार हजार पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मागील दोन निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्या ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात बेकायदेशीरपणे जोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. हा वोट चोरीचा प्रकार असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे ते म्हणाले.
इथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार विजय सरदेसाई यांनी या घटनेचा पोलखोल केला. ज्या मतदारांनी २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कुडतरी मतदारसंघात मतदान केले होते, ज्यांची घरे आजही कुडतरीतच आहेत, त्यांना थेट फातोर्डा मतदारसंघाच्या यादीत नोंदवण्यात आले आहे. कुडतरी मतदारसंघात भाजपला निवडणूक जिंकता येणार नाही, या भीतीनेच तेथील मतदार फातोर्ड्यात आणून समाविष्ट केले जात आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करत विजय सरदेसाई यांनी सर्व मतदारांना आपल्या नावाची मतदारयादीत त्वरित पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. जर पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली गेली तर त्यांच्या मूलभूत मतदानाच्या अधिकारावर गदा येईल आणि त्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांच्या लाभापासूनही वंचित राहावे लागू शकते, असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते आता स्वतः घराघरांत जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची नावे मतदारयादीत कायम आहेत की वगळली गेली आहेत, याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत.
दरम्यान, मतदारयादीतील या कथित फेरफारप्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची निश्चित कालमर्यादेत निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने यावर योग्य पावले न उचलल्यास या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा स्पष्ट इशाराही आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

  • Related Posts

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    बलात्कारप्रकरणी दोषीला जन्मठेप! गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी) अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला पणजी येथील गोवा राज्य बाल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दोन लाख…

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) गोव्यावरील कर्जाचा डोंगर तब्बल ३८ हजार कोटी रुपयांवर पोहोचला असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जनतेच्या मूलभूत गरजांपेक्षा सरकारी सोहळे…

    You Missed

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

    गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    17/10/2026 e-paper

    17/10/2026 e-paper