गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)
राज्यातील शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कोडिंग अँड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स’ (केअर्स) योजनेच्या पुनर्गठित राज्यस्तरीय समितीवर उमंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहसंस्थापक मांगिरीश सालेलकर आणि एशियर सोल्युशन्सच्या संस्थापक संचालिका सुनया शिरोडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. राज्यभरातील शाळांमध्ये केअर्स योजनेची प्रभावी अंमलबजावणी, धोरणात्मक मार्गदर्शन, योजनेच्या प्रगतीवर देखरेख आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाधारित संधींसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने केअर्स योजना महत्त्वाची मानली जात आहे.






