आरटीय कार्यकर्ते संतोष घोलप यांचा आरोप
—————————————————————————————————————
गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन बेटिंग आणि हवाला व्यवहारांचे प्रमुख केंद्र म्हणून गोव्याचा वापर होत असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्रातील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप यांनी केला आहे. गोव्यातील दोन बड्या कॅसिनोंच्या आडून सुमारे ५० जणांची टोळी हे व्यवहार चालवत असून या संपूर्ण रॅकेटसंबंधी महत्त्वाची माहिती आणि पुरावे सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सादर केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संतोष घोलप यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीच्या मुंबई विभागाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई, पुणे, मेहसाणा, सुरत आणि हैदराबाद येथे ऑनलाईन बेटिंगशी संबंधित प्रकरणात छापेमारी केल्याची माहिती घोलप यांनी दिली. या कारवाईनंतर त्यांनी ईडीकडे अतिरिक्त माहिती सादर करून संबंधित रॅकेटचे धागेदोरे गोव्यातील कॅसिनोंपर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे.
दोन बड्या कॅसिनोंतून व्यवहारांचा आरोप
गोव्यातील दोन प्रमुख कॅसिनोंमध्ये गेमिंग टेबल्स खरेदी करून किंवा त्यांचा वापर करून संबंधित टोळी आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोप घोलप यांनी केला आहे. कॅसिनोंमध्ये जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून ऑनलाईन बेटिंग आणि कथित हवाला व्यवहारांचे जाळे चालवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या रॅकेटमध्ये समुंदरसिंग राठोड हा प्रमुख सूत्रधार असून मुकेश जैन त्याचा साथीदार असल्याचा आरोपही घोलप यांनी ईडीकडे सादर केलेल्या माहितीत केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
बेनामी खाती, यूपीआय व्यवहारांची माहिती ईडीकडे
या कथित रॅकेटसाठी बेनामी बँक खाती, इतरांच्या नावावरील यूपीआय खाती आणि विविध आर्थिक व्यवहारांचा वापर केला जात असल्याचा दावा घोलप यांनी केला. संबंधित बँक खाती, यूपीआय व्यवहार आणि काही विशिष्ट ग्राहकांची माहिती तपास यंत्रणेकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले.
या टोळीच्या कथित कारवायांमुळे अनेकांची आर्थिक फसवणूक झाली असून काही जण कर्जबाजारी झाले आहेत. काही पीडितांवर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आल्याचाही गंभीर दावा त्यांनी केला आहे.
गोवा सरकार आणि पोलिसांनी चौकशी करावी
संतोष घोलप यांनी ‘गांवकारी’शी बोलताना या कथित आंतरराष्ट्रीय रॅकेटची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ईडीने केवळ ऑनलाईन बेटिंगपुरता तपास मर्यादित न ठेवता गोव्यातील कॅसिनोंशी संबंधित आर्थिक व्यवहार, बेनामी खाती आणि संभाव्य हवाला व्यवहारांचीही चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले.
गोवा सरकार आणि गोवा पोलिसांनीही या गंभीर आरोपांची दखल घेऊन स्वतंत्र तपास सुरू करण्याची गरज असल्याचे घोलप म्हणाले.





