४ जानेवारीला अंतिम मतदार यादी
————————————————————————————————–
गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)
राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत आतापर्यंत ३१,८१५ नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून सुमारे ११ हजार नावे वगळण्यात आली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी ही माहिती दिली. अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत डॉ. गोयल यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. या प्रक्रियेत नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील नावे वगळण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रितेश साळगावकर यांच्याशी संबंधित मतदारांची नावे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरजीपीच्या नेतृत्वाचा वाद निवडणूक आयोगाकडे
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजीपी) नेतृत्वावरून निर्माण झालेल्या वादाचा अंतिम निर्णय भारतीय निवडणूक आयोग घेणार असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आरजीपीच्या दोन वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने पक्षातील नेतृत्वाचा वाद पुन्हा चर्चेत आला.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे अधिकृत नेतृत्व म्हणून कोणत्या गटाला मान्यता द्यायची, याचा निर्णय राज्य निवडणूक कार्यालयाच्या पातळीवर न होता भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल, असे डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले.







