आश्‍‍वासनांपेक्षा कृतीची गरज

आज मुख्‍यमंत्री सावंत, आमदार आरोलकर, आमदार आर्लेकर व आरोग्‍यमंत्र्यांनी जशी फोटोसाठी एकत्र येत, हसतखिदळत पोज दिली, तशी एकी लोकांच्‍या हितासाठी दाखवावी.
तुये येथील गोमेकॉ संलग्न इस्पितळ सुरू करण्याच्या घोषणा इतक्या वेळा झाल्या की, त्या शब्दांचे ओझेच झाले. एक ‘तप’ उलटले तरी प्रत्यक्षात इस्पितळ सुरू झाले नव्‍हते. अखेर नागरिकांनी आंदोलनाद्वारे उठाव केल्यानंतर सरकारच्या नाकी नऊ आले आणि तेव्हा कुठे आश्‍‍वासन पूर्तीची हालचाल सुरू झाली. हे चित्र दुर्दैवी असले तरी नवीन नाही. हक्काच्या सुविधा मिळवण्यासाठी लोकांनी कंठशोष केल्याशिवाय सरकारी यंत्रणा हालत नाही, हीच आजची कटू वस्तुस्थिती आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने नाईलाजाने जनमताची दखल घ्यावी लागत आहे. चिंबलात घेतलेली माघार असो वा तुयेतील इस्पितळ. सगळे निर्णय राजकीय गरजेपोटीच घेतले जात असल्याचे स्पष्ट दिसतेय. तुयेत आज मोठ्या थाटात गोमेकॉ संलग्‍न इस्पितळाचा उद्घाटन सोहळा झाला तरी प्रत्यक्षात इस्‍पितळ पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार आहेत, असे सुतोवाच करण्‍यात आले आहे. तूर्त लोकांच्‍या हाती काय आले तर स्‍वप्‍नांचे इमले. एक इस्‍पितळ वेळेत सुरू न करता आलेल्‍या सरकारने तुयेत आरोग्‍य महाविद्यालय सुरू करण्‍याची नवी घोषणा केलीय. लोकांसमोर आश्‍‍वासने अशी पेरली जातात की मूळ मुद्याकडून लक्ष भरकटलेच पाहिजे. आरोग्‍य महाविद्यालय कधी उभे राहील तेव्‍हा राहो. इथे गोमेकॉशी संलग्‍न दर्जा लाभलेल्‍या इस्‍पितळाला साजेशा सुविधा उपलब्‍ध करा. नाहक जिल्‍हा दर्जाचे पालुपद लावू नये. जिल्‍हा इस्‍पितळे आरोग्‍य संचालनालय चालवते. गोमेकॉ ही स्‍वतंत्र व्‍यवस्‍था. लोकांना फरक कळतो.

राजकीय खेकडेवृत्तीमुळे पेडणे तालुक्याचे सातत्याने नुकसान होत आले आहे. माजी मुख्‍यमंत्री पार्सेकरांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या प्रकल्पांना जाणीवपूर्वक चालना दिली गेली नाही, हे लपून राहिलेले नाही. इलेक्ट्रॉनिक सीटी असो, वीज उपकेंद्र असो किंवा जलशुद्धीकरण प्रकल्प; सर्वच बाबतीत हा आकस दिसून आला. आज एक बरे झाले. आतून एकमेकांचे पाय ओढणारे सत्तेतील काही घटक एकाच फोटो फ्रेममध्‍ये आले. आरोग्‍यमंत्री राणे यांना पुन्‍हा सांगावे लागले की, ‘मी व मुख्‍यमंत्री एकच आहोत’. ‘आम्‍ही मिळून पुढील निवडणुकीसाठी योगदान देऊ’. मुळात राणेंना ‘आम्‍ही एक आहोत’ हे वारंवार का सांगावे लागते? जेव्‍हा जेव्‍हा राणे व मुख्‍यमंत्री एका व्‍यासपीठावर येतात तेव्‍हा हा एकीचा डॉयलॉग ठरलेला आहेच. तुयेतील सतर्क नागरिकांमुळे इस्‍पितळ सुरू करण्‍यासंदर्भात सरकारला दखल घ्‍यावी लागली, अशा आशयाचे विश्‍‍वजित राणे यांनी जे विधान केले ते खरेच आहे. कारण लोकांनी जागे केल्‍याशिवाय सरकारी यंत्रणा हलत नाही. आज मुख्‍यमंत्री सावंत, आमदार आरोलकर, आमदार आर्लेकर व आरोग्‍यमंत्र्यांनी जशी फोटोसाठी एकत्र येत, हसतखिदळत पोज दिली, तशी एकी लोकांच्‍या हितासाठी दाखवावी. लोकांचे आशीर्वाद लाभतील. शब्‍दांचे खेळ, मखलाशीद्वारे दिशाभूल पुरे झाली आता. अंतर्गत मतभेद तुमचे तुम्‍हाला लखलाभ होवो. लोकांना सेवा द्या. तुयेतील इस्‍पितळ पूर्ण क्षमतेने सुरू होऊ द्या. त्‍यासाठी ताकद वापरा. कारण मनुष्याच्या जीवनात आरोग्यव्यवस्था ही केवळ उपचारांची यंत्रणा नसून सुरक्षिततेची हमी असते. आजारपण कधी, कोणाला आणि कशा स्वरूपात येईल याचा अंदाज बांधता येत नाही; अशा वेळी सक्षम, सुलभ आणि संवेदनशील आरोग्यव्यवस्था माणसाला मानसिक धैर्य देते. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण असा भेद न करता वेळेवर उपचार मिळणे हे लोकशाहीचे मूलभूत कर्तव्य आहे. आरोग्यसेवा कमकुवत असेल तर विकासाच्या साऱ्या घोषणा पोकळ ठरतात. म्हणूनच भाषणांपेक्षा निर्णय व आश्‍‍वासनांपेक्षा कृती हीच आजची खरी गरज आहे.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    27/06/2026 e-paper

    27/06/2026 e-paper

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    गोव्यासमोरील मूक आपत्ती