
आमदार वेन्झी व्हिएगश यांच्याकडून मंजुरीपत्र उघड
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) –
पर्यटन खात्याकडून बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चनजीकच्या वारसा स्थळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पाला नगर नियोजन खात्याकडून १२ मे २०२३ रोजी ना हरकत दाखला देण्यात आल्याचा पोलखोल बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी केला. नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली नसल्याचे केलेले विधान त्यामुळे खोटे ठरले आहे.
जुने गोवेवासीयांनी रविवारी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता. वारसास्थळाच्या अगदी जवळ, शंभर मीटर परिघात हा प्रकल्प उभारला जात आहे. वारसास्थळाच्या संवर्धनाला त्यामुळे बाधा पोहोचणार असल्याने बफर झोनचे उल्लंघन करून उभारण्यात येणारा हा प्रकल्प बेकायदा आहे, अशी टीका आंदोलकांनी केली होती.
आज विधानसभेत कामकाजाच्या प्रारंभीच विरोधकांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांनी या विषयावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली होती. नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी सकाळीच माध्यमांकडे बोलताना नगर नियोजन खात्याने कुठलाही परवाना वा ना हरकत दाखला दिला नसल्याचे विधान केले होते.
आमदार वेन्झीने केला पोलखोल
सकाळच्या सत्रात सरकार या विषयावर काहीच भाष्य करत नसल्याचे ओळखून, तसेच नगर नियोजन मंत्र्यांकडूनही काहीच स्पष्टीकरण येत नसल्याचे ओळखून बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी नगर नियोजन खात्याने जारी केलेल्या ना हरकत दाखल्याची प्रत सभागृहाला सादर केली. या गोष्टीमुळे सरकारची बरीच नाचक्की झाली. नगर नियोजन मंत्र्यांना आपल्याच खात्याकडून हा परवाना दिल्याची माहिती नाही, हे कसे काय, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.