अनन्यभाव !

“बाबा, पंढरपूरातून माझ्यासाठी काय आणणार?” माझे पंढरपूरात जाणे निश्चित झाल्यावर राईने विचारले. “विठ्ठलसोडून दुसरे काहीच नाही!” मी म्हणालो.
मी तिला असे उत्तर दिले, कारण त्या दिवशी माझ्या मनात संत सेना महाराजांची एक गोष्ट पिंगा घालत होती. त्याचेही एक कारण होते. गेल्या वर्षीचा रिंगणचा अंक संत सेना महाराजांवर होता. बरेच दिवस तो माझ्या टेबलावर न वाचताच पडून होता. मागच्या महिन्यात माझे पंढरपूरला जाणे नक्की झाल्यावर अगदी सहज मी तो चाळायला घेतला. त्यात सेना महाराजांचे मध्यप्रदेशातील स्थान, पंजाबमधील स्थान, त्यांच्या फोटोची ठेवण, मूर्त्यांची ठेवण, त्यांची अभंग रचना वगैरे गोष्टी होत्या. त्यांच्यासाठी स्वतः पांडुरंग राजाची हजामत करुन आला ही कथादेखील होती. पण मला आंतरमूख केले ते एका वेगळ्याच कथेने. ती कथा रेणुका कल्पना यांच्या लेखात होती. पंढरपूरातील श्रीधर शेटे यांनी ती त्यांना ऐकवली.
“सेना महाराज तीन वेळा पंढरपूराला आले होते. पण विठ्ठलाला मात्र एकदाच भेटले,” शेटे सरांचे हे वाक्य वाचताच माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे सातशे वर्षांपूर्वी आजच्या सारखी गर्दी थोडीच असणार. मग ते पंढरपूरात येऊन विठ्ठलाला का भेटले नसतील. दुसरा विचार चमकून गेला तो म्हणजे त्यांच्या जातीमुळे त्यांना भेटू दिले नसेल का? माझे ऐहिक मन ऐहिक कारणेच शोधणार.
मी कुतूहलाने शेटेसर पुढे काय म्हणाले ते वाचू लागलो. “त्याचं झालं असं की त्यांच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे, सेना महाराज पहिल्यांदा पंढरपूरात आले तेव्हा आधी चंद्रभागेत आंघोळ करायला गेले असावेत. तिथं डुबकी मारताना त्यांना एक छान सपाट दगड दिसला. तो दगड आपल्या वस्तार्याला धार लावायच्या कामाला येईल असं वाटलं म्हणून त्यांनी तो सोबत घेतला. पुढं सेना महाराज पांडुरंगाचं दर्शन वगैरे घेऊन त्यांच्या गावी परतले. पण इकडे विठ्ठलानं रखुमाईला विचारलं, ‘सगळे संत येऊन गेले, पण सेना का ग आला नसेल?’ रुक्मिणी म्हणाली, ‘सेना आला होता की!’ त्यावर पांडुरंग म्हणाला, ‘छे ग. तो मला भेटायला नव्हता आला, तो तर दगड न्यायला आला होता!’
पुढच्या वारीला सेना महाराज दुसर्‍यांदा आले. यावेळेस ते नेलेला दगड चंद्रभागेत पुन्हा टाकायला आले होते.
असं त्यांनी का केलं असेल? भक्तीच्या कानांनी त्यांना विठ्ठल रखुमाईचा संवाद ऐकू गेला असेल का? नाहीतरी साक्षी भावाने विठ्ठल प्रत्येक जीवमात्रात असतोच. विवेकाच्या द्वारे तो आपल्याशी बोलत असतोच. आपण सामान्य त्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतो. पण सेना महाराज कसे दुर्लक्ष करतील? जे आपल्यात अखंड वास करणाऱ्या विठ्ठलाचा आवाज ऐकतात तेच तर संत होतात.
पण याही वेळेस विठ्ठलाला सेना महाराज आपल्याला भेटायला आले असे वाटले नाही. ‘तो नेलेला दगड परत करायला आला,’ विठ्ठल रखुमाईला म्हणाले.
तिसऱ्या वेळेस जेव्हा सेना महाराज आले, तेव्हा विठ्ठल त्यांना कडकडून भेटला!
‘अनन्यभाव’ हा शब्द मी अनेकदा वापरला आहे, पण त्याचा गूढ अर्थ सेना महाराजांच्या या कथेतून कळला. या अर्थाला गूढ तरी का म्हणावे? ज्याने ज्याने दुसर्‍यावर प्रेम केले असेल, त्या प्रत्येकाने अनन्यभाव अनुभवला असेलच. पण आमचे मन ऐहिक गोष्टींनी बरबटलेले असल्याने विठ्ठलाच्या बाबतीत अनन्यभाव अनुभवता येत नाही, इतकेच!

  • डाॅ.रुपेश पाटकर
  • Related Posts

    Vishal Pai Cacode writes to AICC leader K. C. Venugopal, raises seven questions on Goa Congress

    Margao, July 3: Political analyst and long-time Congress supporter Vishal Pai Cacode has written an open letter to AICC General Secretary (Organisation) K. C. Venugopal ahead of his Goa visit,…

    No split in Congress; BJP spreading false narrative to mislead voters: Tulio D’Souza

    Panaji: Congress leader Tulio D’Souza has dismissed reports of a split within the Congress, alleging that the BJP is deliberately spreading a false narrative to mislead the people of Goa…

    You Missed

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    16/07/2026 e-paper

    16/07/2026 e-paper

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार