अरे हे चाललंय काय?

इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे.

राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईक यांनी सरकारी नोकरीसाठी पैसे घेण्याच्या व्यवहारात एक आयएएस अधिकारी, पीडब्ल्यूडी अभियंता आणि एका मंत्र्याचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवली आहे. इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे.
भाजप सरकारची पूर्णपणे कोंडी करणारे हे प्रकरण ठरले होते. शेकडो बेरोजगार सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देऊन फसले गेले आहेत. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि विशेष म्हणजे भाजप सरकारातील काही मंत्री, आमदार तसेच पक्षाशी जवळचे संबंध असलेल्या लोकांवरच संशयाची सुई आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली असून दोघांनी आत्महत्या केल्याचीही नोंद आहे. पूजा नाईक या सध्या जामीनावर आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
नोकरीसाठी पैसे दिलेल्या लोकांचे सर्व पैसे वसूल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. यानंतर अचानक हे प्रकरण सक्तवसूली संचालनालयाने आपल्या हातात घेतले आणि नोकऱ्यांसाठी रोख रक्कम दिलेल्यांचीही चौकशी होणार, असे वातावरण तयार झाल्यानंतर तक्रारदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि या प्रकरणावर हळूहळू पडदा पडला.
आता अचानक पूजा नाईक यांनी सनसनाटी गौप्यस्फोट करून पुन्हा एकदा कॅश फॉर जॉबचे भूत वर आले आहे. “२४ तासांत आपले पैसे परत केले नाहीत तर आपण सर्व पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सर्व गोष्टींचा पोलखोल करणार,” असे त्या म्हणाल्या. एका बड्या प्रकरणातील मुख्य आरोपी एवढा मोठा खुलासा करते आणि सरकारी यंत्रणा, पोलिस त्याची दखलच घेत नाहीत, हे विचित्रच ठरते.
वास्तविक हे वक्तव्य सार्वजनिक झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पूजा नाईक यांना गाठून या प्रकरणी माहिती मिळवून संशयितांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक होते. परंतु तसे घडताना दिसत नाही. पूजा नाईक केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य करत असतील, तर त्याबाबतही तपास होऊन कारवाईची तयारी सरकारने ठेवायला हवी.
१७ कोटी रुपयांच्या या व्यवहाराबाबत सरकारी यंत्रणा आणि पोलिस ज्या ढीम्म पद्धतीने गप्प राहून हे पाहत आहेत, ते पाहता या सरकारची संवेदनाच बोथट झाली आहे की काय, असा प्रश्न पडतो.
खरे तर नोकऱ्यांसाठी पैसे घेणे ही गोष्ट काही नवीन नाही. काँग्रेस किंवा अन्य कुठल्याही सरकारच्या कार्यकाळात अशा गोष्टी घडतच होत्या. परंतु हल्लीच्या काळात या गैरव्यवहाराला इतके अधिष्ठान प्राप्त झाले आहे की मुळात हा गैरव्यवहार की अधिकृत व्यवहार यातील फरकच समजेनासा झाला आहे. पैसे घेणारा जसा दोषी, तसाच देणारा देखील दोषी ठरत असल्याने या व्यवहारात फसलेल्यांना मुकाट्याने हा गंडा सहन करावा लागत आहे. हे लोक लाजेच्या आणि भीतीच्या भावनेत काही बोलूही शकत नाहीत. लाखो रुपयांना टोपी पडूनही या लोकांना मुका मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूजा नाईक यांनी हे वक्तव्य जागृत श्री बोडगेश्वर देवस्थानाच्या आवारात केले आहे. हे वक्तव्य निश्चितपणे खोटे असू शकत नाही आणि खरे असल्यास अधिकच गंभीर आहे. त्यामुळे सरकारने या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई सुरू करणे अपेक्षित आहे.

  • Related Posts

    भाजप महिला जागी हो !

    भाजपमधील महिला संघटनात्मक पातळीवर सक्रिय असूनही समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांशी संबंधित विषयांवर गप्प का राहतात, हा खरा चर्चेचा विषय आहे. महिला हीच खरी भाजपची ताकद आहे. भाजपाच्या यशात…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…