ते तिघे कोण ?

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातच हे प्रकार घडल्यामुळे त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून सत्य जनतेसमोर ठेवणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते.

सरकारी नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेण्याबाबतच्या घोटाळ्याची चौकशी गेल्या वर्षभरापासून शीतपेटीत गेली होती. लोकांना तर या घोटाळ्याचा विसरच पडला होता. अशा वेळी अचानकपणे या घोटाळ्याच्या मुख्य आरोपी पुजा नाईक अधिकृत पद्धतीने एका प्रमुख मीडियाला संबोधित करत सनसनाटी गौप्यस्फोट करतात आणि पुन्हा एकदा या घोटाळ्याचा धुरळा उडतो, हे नवलच म्हणावे लागेल.
पुजा नाईक हिने एक आयएएस अधिकारी, एक अभियंता आणि एक मंत्री यांना आपण नोकऱ्यांसाठी १७ कोटी रुपये दिल्याचे वक्तव्य केले आहे. हे पैसे २४ तासांत मिळाले नाहीत तर आपण या प्रकरणाचा पोलखोल मुख्यमंत्र्यांसमोर करू, असा इशाराही तिने दिला. २४ तासांची मुदत संपताच तिला गुन्हा शाखेकडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. तिथे ५ तास तिची जबानी नोंदवण्यात आली. या जबानीत तिने त्या तिघांची नावे आणि इतर महत्त्वाची माहिती दिल्याची खबर आहे.
आता तिने नेमकी काय माहिती दिली आणि कुणाची नावे घेतली, याबाबत पोलिसांनी गुप्तता राखली आहे. वास्तविक ही माहिती तिने मीडियासमोर दिली होती, परंतु कायदेशीर बाबी लक्षात घेऊन मीडियाने ही नावे उघड केली नाहीत. मात्र त्या मीडियाला ही नावे माहित आहेत.
या सगळ्या घटनाक्रमावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुळात एका वर्षानंतर पुजा नाईक अचानक प्रकटते आणि अशा तऱ्हेने सनसनाटी गौप्यस्फोट करते. ती खाजगी व्हिडिओ काढून तो व्हायरल न करता अधिकृतपणे प्रमुख मीडियासमोर हा गौप्यस्फोट करते. पुजा नाईक हिचे हे धाडस पाहिल्यानंतर तिने शेकडो जणांना गुंडाळण्यासाठी दाखवलेल्या धाडसाचा अंदाज बांधता येतो.
हा गौप्यस्फोट पुजा नाईक हिने नव्यानेच केला आहे की यापूर्वी पोलिस तपासात तिने ही माहिती दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक सुनीता सावंत करत होत्या. त्यांनी पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणात कुणीही राजकीय नेत्याचा सहभाग नसल्याचे विधान केले होते.
मग पुजा नाईक हिला आत्ताच हा गौप्यस्फोट करावा असे का वाटले? इतकी महत्त्वाची माहिती तिच्याकडून वदवून घेण्यात पोलिस अपयशी कसे ठरले, असा सवालही उपस्थित होतो. तिने ही माहिती दिली असतानाही पोलिसांनी ती लपवली आणि तिला याबाबत वाच्यता न करण्याची धमकी दिली नसावी, याचेही स्पष्टीकरण आवश्यक आहे.
राजकीय वरदहस्त किंवा आशीर्वादाशिवाय हे प्रकार घडूच शकत नाहीत. याठिकाणी सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे आयएएस अधिकाऱ्याचा समावेश. हा आयएएस अधिकारी नेमका कोण, याचे कुतूहल अनेकांना लागून राहिले आहे.
विशेष म्हणजे अन्य एक प्रकरण अशाच स्वरूपाचे घडले आहे. तिथे दोघांनी आयएएस अधिकाऱ्याचा पीए आणि दुसऱ्याने वाहन चालक असे स्वतःला भासवून अनेकांना सुमारे ५ ते ७ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण पोलिस तपास करत आहेत. ते दोघेही लोकांना आपल्या सोबत पर्वरी सचिवालयात नेत होते. तिथे आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बिनधास्तपणे फिरत होते आणि लोकांना आपली त्या अधिकाऱ्यांशी जवळीक दाखवत होते.
हा सगळा प्रकार म्हणजे आपली प्रशासकीय यंत्रणा किती भरकटलेली आणि अनियंत्रित बनली आहे, हेच दर्शवतो. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातच हे प्रकार घडल्यामुळे त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून सत्य जनतेसमोर ठेवणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President