या त्यांच्या दातृत्वाची परतफेड त्यांच्या डोक्यावर नेतृत्वाचा मुकुट चढवून करण्याचा चंगही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधीलही काही लोकांनी बांधला आहे हेच या सगळ्या शक्तीप्रदर्शनातून अधोरेखीत झाले आहे.
सरकारी नोकरी देणे आणि आजारपणात किंवा संकटकाळात मदत करणे या दोन अशा उपकाराच्या गोष्टी आहेत ज्या सहजा कुणीही विसरू शकत नाही. सत्तरीची जनता बाबामय होण्याची ही दोन प्रमुख कारणे आहेत. सत्तरीच्या लोकांना सरसकट नोकऱ्या देण्याचे काम विश्वजीत राणे यांनी केले आहेच परंतु आजारपणात किंवा संकटकाळात त्यांना आर्थिक आधार देण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. पैसा किंवा संपत्ती ही अनेकांजवळ असते पण त्यासाठी दातृत्व हवे ते निश्चितच या बाबांकडे आहे आणि म्हणूनच सत्तरीच्या या ज्यूनिअर खाशांच्या उपकारांत ही जनता कायम आहे. केवळ सत्तरीतच नव्हे तर राजकीय पातळीवरही अनेक राजकीय नेत्यांना बाबांनी मदतीचा हात दिलेला आहे. अनेकांना विदेश दौरे, आरोग्याच्या संकटकाळात मदत, घरांसाठी, वाहन खरेदीसाठी त्यांची मदत चालूच असते. अनेक राजकीय नेत्यांवरही त्यांचे उपकार आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांच्याकडील खात्यांत नोकरी विक्रीची प्रकरणे उघडकीस आणली असता सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची पाठराखण करण्यासाठी जी धडपड सुरू केली आहे, त्यातूनच त्यांच्या उदारपणाचे विराट दर्शन घडते आहे. केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांनीही त्यांच्या समर्थनार्थ आपल्या प्रतिक्रिया जाहीर केल्या आहेत. विश्वजीत राणेंच्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्रच जणू या नेत्यांनी बहाल करून नकळतपणे त्यांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शनच केले आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत असताना त्यांच्या मदतीला पक्षाला किंवा पक्ष प्रवक्त्यांना धाव घ्यावी लागते पण इथे चित्र वेगळेच आहे. नेतृत्वाच्या विषयावरून विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सुरू असताना सरकारात विश्वजीत समर्थकांचा आकडा वाढत असल्याचेच यातून अप्रत्यक्ष दिसून आले आहे. एकीकडे विश्वजीत राणेंकडून फक्त सत्तरीच्याच लोकांचा सरकारी नोकरीत भरणा होत असल्याचा आरोप होत असताना या सगळ्या नोकऱ्या केवळ पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारावरच दिल्याचा निर्वाळाच या नेत्यांकडून दिला जात असल्याचे पाहील्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसणे स्वाभाविक आहे. विश्वजीत राणेंकडून नोकऱ्यांसाठी पैसे घेतले जात नाहीत अशी दृढ भावना सगळ्यांचीच आहे परंतु त्यांच्या गोतावळ्यातील त्यांचे काही प्रमुख कार्यकर्ते किंवा निकटवर्तीय उमेदवारांकडून पैसे घेत नसावेत, याबाबत मात्र ठामपणे काहीच सांगता येणार नाही. राज्यातल्या अनेक देवदेवतांवर सध्या बाबांकडून सुवर्णवर्षाव सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्यासाठी त्यांच्याकडून भरभरून मदत दिली जात आहे. या त्यांच्या दातृत्वाची परतफेड त्यांच्या डोक्यावर नेतृत्वाचा मुकुट चढवून करण्याचा चंगही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधीलही काही लोकांनी बांधला आहे हेच या सगळ्या शक्तीप्रदर्शनातून अधोरेखीत झाले आहे. या परिस्थितीत बाबांची दुसरी बाजू म्हणजे नगर नियोजन खात्याकडून सरसकट जमीन रूपांतरणे आणि त्यातून सुरू असलेले जमीन खरेदी- विक्री व्यवहारांना कोण कसा आवर घालणार हा जटिल प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे.