बाबू आजगांवकर, आता निवृत्त व्हा !

पूर्वी धारगळ आणि नंतर पेडणे या राज्यातील एकमेव अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे, तसेच मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांचा लोकमतमधील लेख वाचला. काँग्रेस, भाजप आणि मगो या तीन वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारीवर निवडून येत त्यांनी पेडणेतील आपली लोकप्रियता सिद्ध केली. तब्बल वीस वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून बाबू आजगांवकर यांनी काहीच केले नाही, असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. मात्र, पेडणेकरांच्या पाठबळावर उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या बाबू आजगांवकर यांनी केलेल्या चुका, स्वहितासाठी घेतलेले निर्णय आणि पेडणेकरांचा झालेला विश्वासघात विसरता कामा नये.
२०२७ मध्ये पेडणे मतदारसंघाला राखीव दर्जा प्राप्त होऊन ५० वर्षे पूर्ण होतील. प्रारंभी मांद्रे गावचे देऊ मांद्रेकर यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले, परंतु नंतर पेडणेबाहेरील नेत्यांनी राखीवतेचा लाभ घेत राजकीय कारकीर्द घडवली. रस्ते, पाणी, वीज, नळ आदी मूलभूत गरजांची पूर्तता ही आमदारांची संविधानिक जबाबदारी होती, ती त्यांनी पार पाडली. मात्र, पेडणेच्या मातीला न्याय मिळवून देण्यात बाबू आजगांवकर अपयशी ठरले.
मोपा विमानतळाच्या पार्किंग विषयावरून स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांनी आंदोलन पुकारले, त्यातून पुन्हा आमदारकीचे नूतनीकरण करण्याचा हव्यास बाबूंना जडला आहे. मोपा विमानतळ आपण खेचून आणल्याचा दावा करणारे बाबू आजगांवकर या प्रकल्पात पेडणेकरांचे हित जपण्यात अपयशी ठरले. जीएमआर कंपनीशी झालेल्या करारात स्थानिक आणि भूपीडितांचे हित जपले गेले असते, तर आज रोजगारासाठी रस्त्यावर उतरावे लागले नसते.
विमानतळाचा करार ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला आणि उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी. या दोन्ही वेळी बाबू आजगांवकर आमदार नव्हते, हे खरे. पण २०१७ ते २०२२ दरम्यान विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असताना त्यांनी दुर्लक्ष का केले? काम बंद करून पुन्हा सुरू करण्याची नाटके कुणाच्या फायद्यासाठी होती? स्थानिकांचे हित जपले गेले असते, तर किती स्थानिकांना रोजगार मिळाला हे त्यांनी स्पष्ट करावे. मोपा भूपीडितांची भरपाई अजूनही ईडीसीमध्ये पडून आहे. ७० टक्के लोकांना एक पैसाही मिळाला नाही. ती भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी काय केले, याचे उत्तर देण्याची गरज आहे.
क्रीडा नगरीसाठी शेतजमिनी संपादित केल्या, पण एकही क्रीडा प्रकल्प उभा राहिला नाही. या जागेत आयूष इस्पितळ उभे झाले. तिथे ८० टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल, असे सांगण्यात आले होते. आज तिथे कंत्राटी पद्धतीवर स्थानिकांना राबवले जात आहे. मोपा लिंक रोडच्या नावाने पुन्हा लोकांच्या जमीनी संपादीत करण्यात आल्या. यावेळी स्थानिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. यावेळी बाबु आजगांवकर कुठे होते. सावळवाडा येथे इनडोअर स्टेडियम उभारले, पण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन झाले नाही. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाची दयनीय अवस्था बदलण्यात ते अपयशी ठरले. मतदारसंघात एकही उद्योग स्थापन झाला नाही. तिळारी ओलीत क्षेत्राचा कृषी विकासही थांबलेला आहे.
शैक्षणिक विकासाकडे बाबू आजगांवकर यांनी दुर्लक्ष केले. वीस वर्षांत एकही सक्षम अनुसूचित जातीतील उमेदवार तयार झाला नाही. राजकारणातून निवृत्त होण्याची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पेडणेकरांचा पुळका दाखवत पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बाबूंनी एखाद्या सुशिक्षित युवकाला पुढे आणून विधानसभेत पाठवावे, हेच खरे पुण्यकर्म ठरेल.
धनगर समाजाला नोकरी आणि घरे दिल्याचा दावा बाबू वारंवार करतात. पण पावसात घरांना गळती लागली तेव्हा त्यांनी कोणती भूमिका घेतली? घरांची सनद का मिळाली नाही? प्रत्येक घरात नोकरी दिल्याचा दावा करत असताना, काहींनी ती नोकरी सोडली आहे, तर उर्वरितांना आजही दहा-पंधरा हजार पगाराची नोकरी आहे. याची जाणीव बाबूंनी करून घ्यावी.
२०१७ मध्ये त्यांनी आपली संपत्ती चार कोटी दाखवली होती, ती २०२२ मध्ये आठ कोटी कशी झाली? या कालावधीत किती पेडणेकरांची संपत्ती वाढली? हेही त्यांनी स्पष्ट करावे.
टॅक्सीच्या विषयावर बाबू आता खडबडून जागे झाले आहेत. हा विषय चार वर्षांपासून सुरू आहे. तेव्हा एक दिवसही रस्त्यावर उतरले नाहीत. भाजप सरकार सत्तेवर असताना हे प्रश्न का सुटत नाहीत?
पेडणेचे युवा पत्रकार ज्ञानेश्वर वरक यांनी बाबू आजगांवकर यांच्या राजकीय स्वार्थाचा पोलखोल करणारा लेख लोकमतमध्ये प्रसिद्ध केला. त्याला उत्तर देण्यासाठी बाबूंनी लेखणी हाती घेतली आहे. पण आता पेडणेकर जागा झाला आहे. मोपा विमानतळावरील अन्यायाविरोधात युवक पेटून उठला आहे. या तापत्या तव्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न बाबू आजगांवकर करत आहेत, पण पेडणेकर हे होऊ देणार नाहीत.
आता बाबूंनी आमदारकीची पेन्शन घेऊन निवृत्त व्हावे आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवावे, एवढेच सांगावेसे वाटते.
श्री. राजन बाबुसो कोरगांवकर
संस्थापक- मिशन फॉर लोकल, पेडणे

पत्रकार ज्ञानेश्वर वरक यांचा … तर पेडण्यासाठी खुली चर्चा करा या मथळ्याचा एक लेख दै. लोकमतमध्ये प्रसिद्ध झाला होता. या लेखाला माजी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबु आजगांवकर यांनीमोपा टॅक्सी पार्किंगचा विषय मार्गी लागावा या नावाने आपला एक लेख दै. लोकमतध्येच प्रसिद्ध करून अप्रत्यक्ष उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. बाबु आजगांवकर यांनी आपल्या लेखात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींबाबत प्रश्न विचारणारा करणारा लेख राजन कोरगांवकर यांनी दै.लोकमतमध्ये पाठवला होता. हा लेख लोकमतमध्ये प्रसिद्ध झाला नाही. हा लेख इथे प्रसिद्ध करून हा विषय पेडणेतील जनतेपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न.

  • You Missed

    WRD’s Alleged Covert Move: Deltins Land to Be Excluded from Tillari Command Area

    WRD’s Alleged Covert Move: Deltins Land to Be Excluded from Tillari Command Area

    03/03/2026 e-paper

    03/03/2026 e-paper

    जलस्त्रोत खात्याचा कपटी डाव

    जलस्त्रोत खात्याचा कपटी डाव

    निवडणूकांचा फार्स नको

    निवडणूकांचा फार्स नको

    03/03/2026 e-paper

    03/03/2026 e-paper

    The Doctor’s Cunning Move

    The Doctor’s Cunning Move