सरकारने घेतला जनचळवळीचा धसका
गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी)
निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्या म्हापसा येथील सभेला हजर राहून सत्तरी तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले आणि व्यासपीठावरून भाषण केलेले केरी-सत्तरीचे माजी पंचसदस्य समील गोवेकर यांच्या भाडेपट्टीवर दिलेल्या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ते बंद करण्याच्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन खाते विश्वजीत राणे यांच्या अखत्यारीत आहे. या कारवाईमागे सूडबुद्धी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तात्पुरते हे हॉटेल बंद करण्याचा तोंडी आदेश देण्यात आला असून, हॉटेलचे बांधकाम पाडण्याची धमकीही दिली गेली आहे. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी या घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या खात्याला बांधकाम पाडण्याचे अधिकार नाहीत. कायद्याबाहेर जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असेही न्यायमूर्ती रिबेलो यांनी स्पष्ट केले.
फेर्दिन रिबेलो यांच्या पत्राने एफडीएत खळबळ
निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी स्वतः खात्याच्या संचालकांना या घटनेबाबत पत्र लिहिले आहे. समील गोवेकर यांच्याविरोधात तक्रार कुणी केली याची माहिती मागवली आहे. या कारवाईसंबंधी सविस्तर माहिती देताना या भागातील अन्य आस्थापनांवर कारवाई झाली आहे का, याचीही माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने आपल्या कार्यकक्षेत राहूनच कारवाई करावी. आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कारवाईचा प्रयत्न केल्यास त्याला कायदेशीर प्रत्युत्तर दिले जाईल, असेही रिबेलो यांनी बजावले आहे.






