
प्रत्यूत्तरासाठी केंद्रीय समितीचा ढवळीकरांवर दबाव
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)
ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी आमदार एड. उदय भेंब्रे यांनी आपल्या एका व्हिडिओत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अप्रत्यक्ष भाऊसाहेब बांदोडकर आणि शशिकला काकोडकर यांच्यावर जहाल टीकेचे ब्रह्मास्त्र सोडल्याने मगो पक्षाचा सिंह घायाळ झाला आहे. या टीकेमुळे मगोप्रेमी खवळले असून भेंब्रे यांना सडेतोड प्रत्यूत्तर देण्यासाठी ढवळीकरबंधूंवर प्रचंड दबाव सुरू झाल्याची चर्चा आहे.
मगोमुळे गोव्याची अपरिमित हानी
मगो पक्षामुळे गोव्याची अपरिमित हानी झाल्याची टीका उदय भेंब्रे यांनी या व्हिडिओतून केली आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मगो सरकारने गोव्यासाठी सुरक्षा कवच प्राप्त करून घेतले नाही आणि त्यामुळेच आज असंख्य संकटे राज्यासमोर उभी आहेत, असाही आरोप भेंब्रे यांनी ठेवला आहे. मगोने कोकणी भाषेची अवहेलना केली. महाराष्ट्रातील नेत्यांच्या बुद्धीने हा पक्ष वागत होता तसेच जनमत कौलात गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे यासाठी सगळे यंत्रणा पणाला लावली, असाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. उदय भेंब्रे यांनी थेट भाऊसाहेब बांदोडकर आणि शशिकला काकोडकर यांचे नाव जरी घेतले नसले तरी ही दोन्ही नेतृत्वांकडून झालेली हानी ही अजिबात भरून येणार नाही, असाही उल्लेख या व्हिडिओतून केला आहे.
तीव्र संताप
मगो पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वावर तोंडसुख घेतलेल्या उदय भेंब्रे यांच्या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात तीव्र संताप उमटला आहे. मगोचे कार्यकर्ते आणि भाऊप्रेमींच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. या व्हिडिओला सडेतोडपणे पक्षाने प्रत्यूत्तर द्यावे, अशी मागणी अनेकांनी पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर तथा वीजमंत्री तथा पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे केली आहे. केंद्रीय समितीनेही या टीकेची गंभीर दखल घेतली असून ढवळीकरांनी भेंब्रे यांचे मुद्दे खोडून काढायलाच हवे, असा आग्रह धरला आहे. या प्रकरणी लवकरच केंद्रीय समितीची बैठक बोलावून हा विषय चर्चेला घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय समितीच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.