सरपंच अब्दुल करीम नाईकचे टीकाकारांना चोख प्रत्यूत्तर
पेडणे,दि. १८ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील कोरगांवचे नाईक मुस्लीम कुटुंब काल परवाचे नाही. या कुटुंबाला मोठा इतिहास आहे. कदंबकाळाचे ताम्रपट आपल्या पूर्वजांच्या नावे आहे आणि गोवा मुक्ती संग्रामातही आपल्या पूर्वजांनी योगदान दिलेले आहे. ही माती, हा देश आणि या देशाच्या तिरंग्यावर आमची जान कुर्बान आहे, असे चोख प्रत्यूत्तर कोरगांव- पेडणेचे नवनियुक्त सरपंच अब्दुल करीम नाईक यांनी दिले.
केवळ मुस्लीम असल्याचे निमित्त करून आपल्याला पाठींबा दिलेल्या हिंदू पंचमंडळींना आपल्या विरोधात भडकावून त्यांच्या धरावर धडक देण्याची धमकी देण्याच्या कृतीचा अब्दुल करीम नाईक यांनी निषेध केला. कोरगांवात जाहीर सभेचे आयोजन करून या गावांत धर्मिक द्वेष पसरवून इथले वातावरण दूषीत करण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सभेला कोरगांवातून किती लोक होते आणि बाहेरून किती लोकांना आणले होते, हे सगळा गांव जाणतो,असेही यावेळी त्यांनी सांगितले.
सहकाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक
आपल्याला सरपंचपदी निवड करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्या धाडसाचे आपण कौतुक करतो,असेही नाईक म्हणाले. आपल्याला खाली खेचण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न झाले. पंचसदस्यांवर विनाकारण चुकीचे आरोप करण्यात आले. तरिही या सर्वांनी धीटपणे आपली साथ दिली, याबाबत त्यांचे कौतुकच करावे लागेल.
सभेचा निषेध
कोरगांव गांवात येऊन देवस्थानच्या प्रांगणात बैठक घेऊन गांवातील महिला पंचसदस्यांबाबत आक्षेपार्ह टीका करण्याचा अधिकार या लोकांना कुणी दिला,असा सवाल नरेश कोरगांवकर यांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने सर्वांना समान संधी दिली आहे. केवळ अब्दुल हा मुस्लीम असल्यामुळे त्याला सरपंचपदावर बसवू नये, हा कुठला विचार आहे,असा सवालही त्यांनी केला. अब्दुल नाईक याला सरपंचपद बहाल करून कोरगांवकरांनी खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचा मान तर राखला आहेच आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श गोव्यासमोर ठेवला आहे,असेही ते म्हणाले.
कोरगांवात संतप्त प्रतिक्रिया
गोवा हिंदु युवक शक्ती संघटनेच्या नावाने कोरगांवात बैठक घेऊन कोरगांवातीलच महिला पंचसदस्यांवर टीका करून त्यांनी अब्दुल नाईक याला पाठींबा दिल्याने त्यांच्या घरांवर धडक देण्याची धमकी देण्याच्या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आपल्या राजकीय वैमनस्यातून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. राज्यात सगळीकडे सरकारी नोकऱ्यांच्या बाजार सुरू आहे. जमिनींचे रूपांतरण सुरू आहे. सरकारी पातळीवर भ्रष्टाचाराने धुमाकुळ घातला आहे. या कुठल्याच गोष्टींवर न बोलणारी ही संघटना गावांतील धार्मिक एकजुट बिघडवण्याचा प्रयत्न का करत आहे,असाही सवाल कोरगांववासीयांनी केला आहे.