देणगी सलामत तो गोंयबाब पचास

पावसाळी थंडीच्या रात्रीस लागलेली साखरझोप सकाळच्या फोनच्या रिंगमुळे मोडली. व्हॉटसऍपवर ढीगभर मेसेजेस येऊन पडले होते. मेसेज उघडून पाहिल्यानंतर मात्र मला खडबडून ‘जाग’ आली. जाग म्हयनाळ्याच्या जुलै अंकात दत्ता नायकांनी त्यांचा तुती शणै गोंयबाबच्या माथ्यावर ठेवला होता. आता फारसी भाषेत तुती म्हणजे पोपट असे हल्लीच वाचनात आले होते म्हणून भुवया उंचावल्या. पण जेव्हा कोंकणीत हातोडीलाही तुती म्हणता हे कळले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. उगाच अर्थाचा अनर्थ व्हायचा! त्यामागोमाग दत्तानी कोकणी भाषा मंडळाचा राजीनामा देत आधी जाहीर केलेली एक कोटीची रक्कम मागे घेत असल्याचेही जाहीर केले. ह्यातली किती रक्कम त्यांनी आधीच दिली आहे आणि किती उरली आहे हे कळले तर बरे झाले असते. भाशा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सेराफिन कॉता ह्यांनी ह्या रकमेचे कॉत करून एकदाची रक्कम जाहीर करावी म्हणजे आमच्यासारख्यांची उत्कंठा शमेल.

देशभरात सद्या बाबांचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातही एक बाबा थैमान घालत आहे. पण भाशा मंडळात बाबा नसतात. तिथे असतात केवळ बाब. गोंयबाब, उदयबाब, आणि दत्ताबाब असे एकापेक्षा एक सरस बाब एकाचवेळी एका वादात गुंफले जाणे हि काही साधीसुधी बाब नाही. प्रकरण गंभीर आहे.

मागे एकदा गोमंतकमधील डिबेटवर मराठी आणि रोमी कोकणीला राजमान्यता द्यावी असे वक्तव्य केले म्हणून कोकणी भाशा मंडळाने दत्ता नायकांचा पत्रकार परिषद घेऊन निषेध केला होता. त्यावर उतारा म्हणून दत्तांनी एक कोटी रक्कम मंडळाला देणगी म्हणून जाहीर केली. आणि भाशा मंडळाने ती स्वीकारही केली. ह्याहीवेळी परत दत्तांचा निषेध केला तर अजून एक कोटी मिळतील ह्या आशेने मंडळाने पत्रक काढले. पण झाले उलटेच! जादाचे एक कोटी मिळाले तर नाहीच, उलट दिलेले पैसे दत्तांनी मागे घेईन असे जाहीर केले.

हे भांडण खरेतर दत्ता आणि भेम्बऱ्यांच्यात आहे. काही दिवसांपूर्वी भेम्ब्र्यानी एक व्हिडीओ काढला होता. बाबूमामालो पणस सारख्या अजरामर साहित्यकृती लिहिणारे शणै गोंयबाब हे थोर विचारवंत आहेत असे ते लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. दत्तांचा हा लेख त्याच व्हिडिओच्या प्रतिक्रियेत लिहिला असावा. लेखात तसे तपशील काही नाही. दत्तांच्या मते गोंयबाब हे प्रतिगामी होते आणि बामणांची बाजू घेऊन कोकणीची पाठराखण करत होते त्यामुळे त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही. आता ज्यांनी गोंयबाब वाचण्याचे कष्ट घेतलेत त्यांना हि गोष्ट नवीन नाही. पण अस्मितायेच्या नावाने पुरस्कार लाटणाऱ्या अनेक कोकणी लेखकांनीच गोंयबाब वाचले नाहीत अशी (खरी) कुजबुज अधून मधून ऐकू येत असते. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असे म्हणतात पण दत्ताबाब आणि उदयबाबांच्या भांडणात मात्र भाशा मंडळाचे नुकसान झाले. सेराफिन बिचारे खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आना म्हणत असतील. आता भाशा मंडळवाले म्हणताहेत कि ते जाग वाचणार नाही. ह्याच तंद्रीत जर दत्तांनी भाशा मंडळासाठी ठेवलेले पैसे ‘जाग’ला दिले तर त्यांचे अच्छे दिन आले म्हणायचे.

पण भेम्बऱ्यांचे हल्ली बुरे दिन चालू आहेत. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक गोष्टीला कडाडून प्रतिवाद होतो आणि त्यांच्या समर्थनार्थही कोणी जाहीररीत्या येत नाही. त्यात त्यांना दत्ता नायकांनींच घरचा आहेर दिला. आता यूरीपाठोपाठ उदयबाबही दत्तांना जुदास म्हणून संबोधण्याच्या वाटेवर आहेत असे सूत्रांकडून कळते. आपल्या ‘घर का चिराग’च्या निवडणुकीत आणि काँग्रेससाठी नवीन ऑफिस घेण्यास पैसे कमी पडत असल्याने दत्तांनी भाषा मंडळाचे पैसे मागे घेतले अशीही चर्चा चालू होती. ह्यामुळे सॅटर्डे क्लबमध्ये दत्तांच्या खुस्तार पिणाऱ्यांनाही नवीन द्रव्यदाता शोधावा लागेल की काय अशी भीती निर्माण झाली. ह्यासाठी लंडनमधून काही पैसे मिळू शकतील का हे चाचपण्यासाठी विजय सरदेसायांनी लंडनला कूच केली. ह्या भांडणावर सॅटर्डे क्लबमध्ये मद्यस्ती होईल असे वाटत असतानाच व्हॉट्सअपवर ‘संदेश’ आला कि दत्तांचा राजीनामा भाशा मंडळ स्वीकारणार नाही आणि त्यांनी कोकणीसाठी केलेल्या कार्याची पावती म्हणून ते दत्ता नायकांकडे कट्टी फू करणार नाही. तेव्हा कुठे सॅटर्डे क्लबच्या सभासदांना दिलासा मिळाला.

ह्या सगळ्या समुद्रमंथनात हसे झाले ते बिचाऱ्या भाशा मंडळाचे. भांडण उदयबाब आणि दत्ताबाब ह्यांचे. त्यात दत्तांचा निषेध करणारे पत्रक भाषा मंडळाने काढावे इतकेही काही झाले नव्हते. पण कोकणीचा डोलारा हा भेंम्बरेच्या भरवशावर टिकून असल्याने भाशा मंडळास उदयबाबांच्या रक्षणार्थ येणे भागच होते. इतर कोणी उदयाबाबांवर चढले तर त्याकडे दुर्लक्ष करता येते. इथे तर साक्षात दत्ता बाबांनीच मोहीम उघडली होती. म्हणून मोठ्या अविर्भावात भाशा मंडळाने दत्ताचा निषेध केला पण कोटीची देणगी मागे घेत असल्याचे कळले तेव्हा त्यांच्यासमोर लोटांगण घालायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. देणगी सलामत तो गोंयबाब पचास असे भाशा मंडळाचे म्हणणे होते.

भाशा मंडळावरील दत्तांचा वाढता प्रभाव पाहता भाशा मंडळाला दत्त संप्रदाय हे नाव शोभून दिसेल असे भेम्बरे ह्यांचे म्हणणे पडले आहे. पण दत्ताही हुशार! ज्यांच्या नावापुढे बाब लावले जाते ते जन्मजात हुशार असतात असा एक समज आहे. त्याला ते तरी अपवाद कसा असणार? दत्तांनी भाशा मंडळाला सांगितले आहे कि देणगीची उर्वरित रक्कम कॅशमध्ये न देता ते केकस्वरूपात देणार आहेत. त्यानुसार आता भाशा मंडळाच्या कार्यालयात असंख्य पेस्ट्री भरलेले बॉक्सेस येऊन पडले आहेत आणि ह्यावर भाशा मंडळाचे पदाधिकारी केक गिळून गप्प बसलेत. नाहीतरी ‘केका जनार्दनीं मुखी दत्तनाम’ असे ‘एका’ने म्हटलेले आहेच त्यामुळे सगळे भाशा मंडळाचे पदाधिकारी दिलेल्या केकचा प्रसाद मुखी ठेवून दत्तनामाचा जप करीत आहेत. आधी ते ‘दत्ता दिगंबरा’ म्हणायचे. सद्या मात्र दिगंबर नाम वर्ज्य आहे असे ऐकिवात आहे.

शणै गोंयबाब कथामाळेत बक्षिसे म्हणूनही भविष्यात केक देण्यात येतील अशी खबर मिळाली आहे. भाशा मंडळात झालेला केकांचा सुकाळ पाहता मोरोपंतांच्या धर्तीवर कोकणी भाषेत केकावली लिहायचा मानस एखाद्या होतकरू कोकणी लेखकाने केल्यास नवल वाटणार नाही. दाते पंचांगानुसार उशिरा का होईना पाऊस गोव्यात आला. पाऊस आल्यावर मोर जेव्हा आनंदाने नाचतात तेव्हा ते केकाटतात. दत्ताबाबांनी दिलेल्या देणगीच्या वर्षावात भाशा मंडळाचे मोर नाचून ‘केका’टतील ह्यात शंका नाही. तेव्हा मात्र ‘मंडळ में मोर नाचा किसी ने न देखा’ असे म्हणायची पाळी येणार नाही. तूर्तास एवढेच.

  • अंत्रुजसिंग फोंडेकर

सदर लेखनाचा हेतू निखळ मनोरंजनाचा असून या लेखनाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुणाचाही अपमान किंवा बदनामी करण्याच्या हेतू नाही.

  • Related Posts

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    पश्चिम बंगाल सभापतींच्या गोवा भेटीचे रहस्य उघडगावंकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांच्या आर. बोस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीतर्फे पाळोळे-काणकोण येथील सर्व्हे क्रमांक १४८/६ मधील…

    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    नेपाळमधील महापुरानंतर हिमनदीजन्य तलावांचा धोका चर्चेत; भारतासाठीही सतर्कतेचा इशारा नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला…

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM