दृष्टांत !

‘जुना धर्म सांगत असे की ज्यांचा देवावर विश्वास नसेल तो नास्तिक, नवा धर्म सांगतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नसेल तो नास्तिक’ असे स्वामी विवेकानंद का म्हणाले त्याचाही उलगडा झाला. आणि तुकाराम महाराज ‘देव पाहावया गेलो, देव होऊनि आलो’ का म्हणाले तेदेखील लक्षात आले.

दृष्टांत देऊन सिद्धांत समजावून देणे ही शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते. मी सत्र घेताना ती वापरत असल्याचे पाहून एक ज्येष्ठ स्नेही म्हणाले, “तुम्ही इतके दृष्टांत देता की ऐकणार्‍यांना तुमचे दृष्टांतच लक्षात राहतील आणि सिद्धांत ते विसरून जातील!” आणि खो खो करत हसले.
त्यांचे म्हणणे अगदीच चुकीचे नव्हते, पण पूर्ण बरोबर होते असेही नाही. म्हणजे दृष्टांत म्हणून सांगितलेल्या गोष्टी कायमच्या लक्षात राहतात, हे खरे आहे. पण सिद्धांत विसरले जातात हे फारसे खरे नाही.
मी जेव्हा तत्त्वज्ञान अभ्यासायला सुरवात केली तेव्हा माझ्या सुमार बुद्धिमुळे नुसते सिद्धांत डोक्यात जात नसत. पण दृष्टांत दिला की पूर्वी डोक्यात न शिरलेला सिद्धांत पटकन समजे.
आदिशंकराचार्यांच्या अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना त्याची तत्वे समजणे मला कठीण जात होते. वाचत असताना समजल्यासारखे वाटे, पण पुस्तक बंद करून चिंतन करू गेल्यास, साबण लावलेल्या हातातून तांब्या निसटून जावा तसा मुद्दा निसटून जाई. असे बरेच दिवस चालले. मी त्या दर्शनाचा अभ्यास करण्याचा नाद सोडून द्यायच्या विचारात असताना एके ठिकाणी ‘काशीच्या राजकन्येची गोष्ट’ वाचनात आली.
एकदा एका राज्यात एका उत्सवासाठी नाटक बसवले जात होते. त्यात चारपाच वर्षांची काशीची राजकन्या दाखवायची होती. आयत्या वेळी राजकन्या म्हणून त्या देशाच्या चार वर्षाच्या राजकुमारालाच मुलीसारखे नटवून बसवण्यात आले. काशीची राजकुमारी बनलेला तो राजकुमार मुलीच्या वेशात इतका गोड दिसत होता की राणीने राजचित्रकाराकडून त्याचे स्त्रीवेशातले चित्र काढून घेतले. हळू हळू वर्षे पालटली. राजकुमार आता वीस बावीस वर्षांचा झाला. एक दिवस तो राजवाड्याच्या संग्रहालयात गेला. तिथे त्याने आपलेच काशीच्या राजकुमारीच्या वेशातील चित्र पाहिले. तो नाटकाचा प्रसंग पूर्ण विसरून गेला होता.
त्याने तिथल्या रक्षकाला ‘ते कोणाचे चित्र?’ म्हणून विचारले. तो संग्रहालयाचा रक्षक तिथे नवीनच आला होता. त्याने त्या चित्राखाली लिहिलेले नाव वाचले. त्यावर लिहिले होते, ‘काशीची राजकन्या!’ ते चित्र पाहताच राजकुमार चित्रातील राजकुमारीच्या प्रेमात पडला. ही लहान असताना इतकी सुंदर दिसत होती तर आता तरुणपणी किती सुंदर असेल हा विचार त्याच्या मनात आला. राजकुमार जेव्हापासून संग्रहालयातून परतला, तेव्हापासून त्याचा बदललेला भाव प्रधानाच्या लक्षात आला. प्रधानाने त्याचे कारण विचारले. राजकुमाराने आढेवेढे घेत आपण एका राजकुमारीच्या प्रेमात पडल्याचे सांगितले. प्रधानाला आनंद झाला. त्याने विचारले, “कुमार, आपली राजकुमारीशी कुठे भेट झाली?”
राजकुमार म्हणाला, “मी भेटलो नाही अजून. मी तिचे चित्र पाहिले.”
“कुमार, मला सांगा कुठच्या राज्याची राजकुमारी ती? मी लगेचच तुमच्यावतीने तिच्या वडिलांकडे जातो,” प्रधान म्हणाला.
“ती काशीची राजकुमारी. तिचे लहानपणीचे चित्र आपल्या संग्रहालयात आहे,” राजकुमार म्हणाला.
प्रधान राजकुमारासोबत संग्रहालयात गेला. ते चित्र बघताच प्रधान हसू दाबत म्हणाला, “कुमार, तुम्ही हिला विसरून जा. हिच्याशी तुमचा विवाह होऊ शकणार नाही.”
राजकुमाराने आश्चर्याने विचारले, “का?”
प्रधान म्हणाला, “तत् त्वम असि!”
(कारण ती तूच आहेस!)
मी ही गोष्ट ऐकली आणि
‘तत् त्वम असि!’ या अद्वैत वेदांतींच्या महावाक्याचा अर्थ चटकन डोक्यात शिरला.
त्या राजपुत्रासारखे आम्ही स्वतःच ते चिन्मय तत्त्व (ब्रम्ह) असून देखील स्वतःला त्याच्यापासून वेगळे समजतो, असा त्याचा अर्थ होतो.
हा अर्थ हाती लागताच, ‘जुना धर्म सांगत असे की ज्यांचा देवावर विश्वास नसेल तो नास्तिक, नवा धर्म सांगतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नसेल तो नास्तिक’ असे स्वामी विवेकानंद का म्हणाले त्याचाही उलगडा झाला. आणि तुकाराम महाराज ‘देव पाहावया गेलो, देव होऊनि आलो’ का म्हणाले तेदेखील लक्षात आले.
अद्वैत दर्शनाचे ‘सर्वांच्या ठिकाणी एकच एक ब्रम्ह विराजमान आहे’ हे वाक्य मला समजेना. पण जेव्हा ‘सुवर्णमाळेचा दृष्टांत’ वाचला तेव्हा तेही लक्षात आले. सोन्याच्या तारेत ओवलेले सोन्याचे मणी विचारात घ्या. यातील प्रत्येक मणी स्वतंत्र दिसतो. पण त्या सर्व मण्यांत एकच एक तार असते. त्याही पुढे म्हणजे ते मणी आणि ती तार हे दिसतात वेगवेगळे पण ते मुळात एकच तत्त्व असते, ते म्हणजे सोने. तसेच सृष्टीच्या रूपाने दिसणारे जडद्रव्य आणि सर्व जीवमात्रात असणारा जीवंतपणा हे एकच आहे, याचा अर्थ कळला. आणि पाठोपाठ हे देखील लक्षात आले की ‘ज्ञानू रेडा आणि मी यात काहीच भेद नाही’, असे ज्ञानोबा का म्हणाले.
आणि ही ‘माहिती’ ज्याच्यासाठी ‘ज्ञान’ बनते, त्याचा व्यवहार एकनाथ महाराजांसारखा जातीभेद मोडण्याचा, वंचितांसोबत उभा राहण्याचा का होतो, हेदेखील कळले.
…….
डॉ. रुपेश पाटकर

  • Related Posts

    पडत्या फळाची आज्ञा !

    हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल.…

    “कोकणचा प्रेरणादायक प्रवास—रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याचा गौरव”

    रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन! अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    10/07/2025 e-paper

    10/07/2025 e-paper

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    न्याय व्यवस्थेचा अवमान ?

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    पर्रीकरांच्या निर्णयाला पूर्णत्व द्यावे

    09/07/2025 e-paper

    09/07/2025 e-paper

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    पालिका, पंचायतींना शेवटची संधी

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!

    आदिवासी समाजाचे राजकारण नको!
    error: Content is protected !!