
शिक्षण व्यवस्थेत बदलत्या काळानुसार होत असलेला बदल व तशी सुविधा उपलब्ध झाल्याने डॉक्टर्सच्या संख्येत व सेवेत वाढ झालेली आहे ही चांगली गोष्ट आहेच. तरीपण मागील काही दशकांतील राज्यातील डॉक्टर्सच्या सेवेबद्दलचा आढावा घेतला तर त्यावेळी नागरिकांना अवघ्या काही नामांकित डॉक्टर्सकडून सेवा उपलब्ध होत होती. त्यातही अमुकतमुक डॉक्टर्सनी २४ तास उपलब्धतेनुसार दिलेल्या सेवेबद्दल व त्यांच्या आजारांवरील अचूक निदानामुळे तसेच त्यांच्या दिलेल्या औषधांच्या औषधी गुणांमुळे नागरिकांच्या ह्रदयात त्यांनी इश्वरस्वरूप स्थान प्राप्त केले होते.
अशा आदरणीय डॉक्टर्स मंडळींची यादी अनेक अनुभवी नागरिक सहजपणे समोर मांडू शकतील. तशाच प्रकारे म्हापसा शहरात सुद्धा नागरिकांना उत्तम सेवा देणाऱ्यांच्या पंक्तीतील आदरणीय डॉक्टर्स मंडळींची नावं घेता येतील. उदाहरणार्थ: स्व. डॉ. गणबा दुभाषी, स्व. डॉ. बाळकृष्ण कुवेलकर, स्व. डॉ. रामकृष्ण मोरजकर, स्व. डॉ. दत्ता गायतोंडे (surgeon), स्व. डॉ. कोलवाळकर (gynaecologist) आणि वयाच्या सत्तरीतही आजसुद्धा आपली सेवा देत आहेत असे म्हापसा, खोर्ली येथील डॉ. सुभाष कामत इत्यादी. ह्या मान्यवर डॉक्टर्सच्या पंक्तीतील आणखी एक डॉक्टर म्हणजे डॉ. आल्फ्रेड डा’ कॉस्ता.
मंगळवार, दिनांक १४ जानेवारी रात्री डॉ. आल्फ्रेड डा’ कॉस्ता ह्यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाल्याची दुःखद बातमी आली व मन स्तब्ध झाले. साधारण दीड वर्षांपूर्वी मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन आरोग्याविषयी विचारपूस केली असता, त्यावेळी त्यांच्या व्हीलचेअरवरील थकलेली देहबोली पाहून माझे डोळे पाणावले होते.
लहानपणापासून साधं सर्दी-तापाचं किंवा इतर आजारपण असो, ह्यासाठी आई-वडील तसेच कुटुंबातील सदस्य त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन औषधोपचार घ्यायचे. ते तपासणी करून औषध लिहून देतानाचे सहजसुंदर वागणे व त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांची विचारपूस करणे ह्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या बद्दल वेगळाच आदर निर्माण झाला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने मन स्तब्ध झाले.
आजही नवीन पिढीतील काही डॉक्टर्स चांगल्या स्वभावाचे भेटतील व तयार होतीलही खरे, पण त्या खास अशा चांगल्या स्वभाव शैलीतील तसेच निस्वार्थपणे अतिशय अल्प प्रमाणात फी आकारणी करणाऱ्या अशा पंक्तीतील डॉक्टर्सची यादी ही डॉ. आल्फ्रेड डा’ कॉस्ता ह्यांच्या जाण्याने इथपर्यंत पूर्ण होत असल्याचे वाटत आहे.
डॉ. आल्फ्रेड डा’ कॉस्ता ह्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. ईश्वर चरणी प्रार्थना…
– सुदेश प्रभाकर तिवरेकर
खोर्ली, म्हापसा, गोवा