
तीन दिवसांत पाच प्रयोग, कलाकार संच सज्ज
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)
गोव्याची जीवनदायिनी म्हणजेच ‘ म्हादई नदी ‘ चे महत्व आणि त्या अनुषंगाने इतर विषयांवर झणझणीत भाष्य करून प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे तसेच संपूर्ण गोवा आणि लंडन येथेही लोकप्रिय ठरलेले ‘ गांव जाला जाण्टो ‘ या नाटकाचे पाच प्रयोग महाराष्ट्रातील मुंबई शहरात होणार आहेत.
सदर नाटक कलाचेतना वळवई या संस्थेतर्फे सादर करण्यात येत आहे. गोव्यात गाजलेला म्हादईचा विषय विनोदी पद्धतीने तसेच अत्यंत प्रभावीपणे या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. म्हादई नदीचे महत्त्व सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात या नाटकाचे कलाकार पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. गोव्यातील मडगाव, फोंडा, पणजी, साखळी, सावर्डे याठिकाणी असलेल्या प्रसिद्ध नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रयोग झालेले आहेत. शिवाय लंडनमध्ये या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत पाच प्रयोग हाऊसफुल्ल झालेले आहेत. आतापर्यंत या नाटकाचे सुमारे सव्वाशे ( १२५) प्रयोग झालेले असून या नाटकातील कलाकार येत्या २५ जानेवारी रोजी मुंबई येथे दौरा करणार आहेत. २५ जानेवारी रोजी रात्री ८ .१५ वा. साहित्य संघ नाट्यगृह गिरगांव, २६ रोजी सकाळी १०.३० वा. दीनानाथ नाट्यगृह विर्ले पार्ले, दुपारी २.४५ वा. रंगशारदा बांद्रा व रात्री ८.१५ वा. यशवंत नाट्यगृह माटुंगा, २८ रोजी रात्री ८.१५ वा. ठाकरे सभागृह बोरीवली अशा मुंबईतील पाच प्रसिद्ध नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
युवा लेखिका सुचिता नार्वेकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक अमोघ बुडकुले यांनी दिग्दर्शित केले आहे. गोव्यात लोकप्रियता लाभलेले वासंती फेम नाट्यकलाकार राजदीप नाईक हे या नाटकात प्रमुख भूमिका करीत आहे.