फळ मिळणार नसेल तर कोण काम करेल?

आमच्या लहानपणी दूरदर्शनवर ‘गोट्या’ नावाची एक मराठी मालिका लागायची. त्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. लहानांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सर्वच या मालिकेचे चाहते होते. आमच्याही घरात ही मालिका आवडीने पहिली जाई.
ही मालिका १९५० ते ६० च्या सुमारास लिहिण्यात आलेल्या एका कादंबरीवर आधारित होती. एका अनाथ मुलाच्या भावविश्वाभोवती या कादंबरीचे कथानक होते. मालिकेला देण्यात आलेले ‘गोट्या’ हे नाव त्या मालिकेतील मुख्य पात्र असलेल्या मुलाचे होते. मला आठवते त्यानुसार गोट्याला एक कुटूंब आपल्या घरात सामावून घेते. त्या कुटुंबात एक छोटी मुलगी आणि तिचे आईवडील असतात. त्यातील एका प्रसंगात गोट्या आणि त्या कुटुंबातील वडील यांच्यात एक चर्चा होते असे दाखवले होते. गोट्या विचारतो, ‘कोणीही माणूस कोणतेही काम करत असेल तर त्या कामापासून फळ मिळेल ही अपेक्षा असेलच ना. फळ मिळणार नसेल तर कोण कशाला काम करेल?’
वडील म्हणतात, ‘बरोबर!’
गोट्या पुढे विचारतो, ‘पण भगवत गीतेत कृष्ण सांगतो, फळाची अपेक्षा न करता कर्म करा. हे कसे?’
त्यावर वडील निरुत्तर होतात आणि गोट्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करतात.
हा प्रसंग संपल्यावर बाबा म्हणाले, “यात जे दाखविण्यात आलेय ते अर्धवट आहे. ध्येय ठरवूनच शहाणा माणूस काम सुरू करतो हे खरे आहे. ध्येय न ठरवता काम सुरू केले तर तो वेडेपणा होईल ना. कुठे जायचे आहे हे न ठरवता एखाद्याने होडी वल्हवायला सुरू केली तर तो माणूस वेडाच असला पाहीजे.”
“म्हणजे गोट्या जे सांगतो ते बरोबरच आहे ना बाबा?” मी विचारले.
“पुढे ऐक तरी. असा लगेच निष्कर्षावर येऊ नकोस. ध्येय ठरवून एकदा निश्चित झाले की प्रत्यक्ष काम सुरू करावे. आणि एकदा काम सुरू केले की सगळे लक्ष कामात गुंतवावे. त्यानंतर ध्येय साध्य होईल की नाही याचा विचार करत बसू नये. ते मिळेल किंवा नाही हे आपल्या हातात नाही. कर्मातचि तुझा भाग, तो फळात नसो कधी हे लक्षात ठेवावे.”
“मग फळाचे काय?” मी पुन्हा अधीर होत विचारले.
“ते देवाला अर्पण करावे. जर फळ देवाला अर्पण करायचे असेल. कर्म ही देवाची पूजा असेल, कर्मफळ हा देवाचा नैवेद्य असेल, तर ते उत्तमच असावे असा आपण प्रयत्न करूच ना. आपण अनेकदा अशी कामे करतो ज्याचा आपल्याला काहीही फायदा होणार नसतो. तरीदेखील ती करायला आपल्याला आनंद वाटतो.”
“हो बाबा, परवा एसटीतून जाताना तुम्ही एका आजोबांना तुमची सीट बसायला दिलीत आणि तुम्ही उभे राहिलात. ते आजोबा आपले कोणीच नव्हते,” मी म्हणालो. त्या दिवशी बसमध्ये खूप गर्दी होती. बसमधून उतरल्यावर मी बाबांना विचारले की त्यांनी ओळखीच्या नसलेल्या आजोबांना जागा का दिली. त्यावर बाबा म्हणाले होते, ‘म्हातार्‍या माणसात, गरीब माणसात, आजारी माणसात देवच तर असतो. मग त्याला आपल्या वाट्याचे द्यायला नको का?’
बाबा पुढे म्हणाले, “काम करायचे, पण त्याचे फळ देवाला कसे अर्पण करायचे, हे शिकायचे असेल तर संतांकडून शिकायचे. जेव्हा आपण देवासाठी म्हणून काम करू लागतो ना, तेव्हा त्या कामाचा अजिबात बोजा वाटत नाही. उलट प्रचंड आनंद होतो. देवच प्रत्यक्ष काम करतोय असे वाटते. संत कबीर हे विणकर होते. ते कापड विणीत. त्यांच्याकडून ते काम इतक्या सहज होई की जणू देवच ते करून गेला असे त्यांना वाटे. संत जनाबाई ही जात्यावर दळण दळताना, कपडे धुताना देवासाठीच हे काम करतेय असा भाव (विचार) मनात ठेवी, त्यामुळे तिची कामे इतकी सहज होत की विठ्ठलच ती करून गेला असे तिला वाटे.”
“म्हणजे देव त्यांची कामे करत नसे?” मी विचारले.
“देव नाही तर कोण कामे करतो रे? माणसातला जीवंतपणा काढून घेतला तर केवळ शरीर काम करू शकेल काय? प्रत्येकातील हा जीवंतपणा देवाचाच तर अंश असतो. आपल्याला सगळ्यात जवळचा देवच तर आहे. पण हे आपल्याला कळत नाही ना. ते कळवं यासाठीच सर्व काही करायचे असते. मानवी आयुष्याचा उद्देशच सर्वत्र देव दिसावा यासाठी प्रयत्न करणे हा आहे.”
“बाबा, माणसाला देव दिसला हे कळणार कसे?” मी विचारले.
बाबा म्हणाले, “गीतेच्या पाचव्या अध्यायात देव दिसलेला माणूस कसा वागतो त्याचे भगवान श्रीकृष्णानी वर्णन केले आहे. ते सांगतात,
‘विद्याविनयसंपन्न द्विज गाय तसा गज
श्वान चांडाळ हे सारे तत्त्वज्ञ सम पाहती.’
म्हणजे ज्या माणसाला सर्वत्र व्यापलेला देव दिसतो, तो माणूस वेद शिकलेला ब्राह्मण असो की गाय असो की हत्ती असो की कुत्रा असो की चांडाळ असो, या सर्वांकडे समान दृष्टीने पाहतो. त्या प्रत्येकात त्याला देव भरून राहिलेला दिसतो.”
“बाबा, त्यात काय मोठेसे आहे?” मी विचारले.
“ते वाटते तितके सोपे नाही. उद्या तुझ्या गुरूजींनी तुला शिक्षा केली तर तुझ्या मनात त्यांच्याबद्दल भीती किंवा राग येईल की येणार नाही? तुझ्या एखाद्या मित्राने तुला चिडवले तर तुला त्याचा राग येईल की येणार नाही?”
मी हसलो.
बाबा म्हणाले, “आदी शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताचा गाढा अभ्यास करून ग्रंथ लिहिले होते. त्या तत्त्वज्ञानाचा ते प्रचार करीत होते. पण ज्याचा ते प्रचार करत होते, ते त्यांच्या वर्तनात मात्र आले नव्हते. ते त्यांच्या वर्तनात येण्यासाठी त्यांच्या जीवनात एक घटना घडावी लागली. ते काशीत राहत असतानाची गोष्ट आहे. एकदा ते आपल्या शिष्यांसोबत गंगेच्या घाटावर जात होते. ते जात असताना समोरून चांडाळ जातीचा माणूस येत असलेला त्यांना दिसला. चांडाळ ही अस्पृश्य मानली जाणारी जात. अस्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श केला जात नसे अशी जात. लोकांना असे अस्पृश्य मानणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, क्रूरपणाचे आहे. पण समाजात आजदेखील काही जातींच्या लोकांना अस्पृश्य मानले जाते. मग बाराशे वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल याचा विचार कर.
समोरून येत असलेल्या त्या चांडाळाला पाहून शंकराचार्य म्हणाले, ‘बाजूला हो, बाजुला हो.’
त्यावर त्या चांडाळाने त्यांना प्रश्न केला की ‘कोणी कोणापासून दूर व्हावे? अन्नापासून बनलेल्या एका शरीराने अन्नपासूनच बनलेल्या दुसर्‍या शरीरापासून दूर व्हावे का? की चैतन्याने चैतन्यापासून दूर व्हावे असे तुम्ही म्हणताय? तुमचे आणि माझे शरीर सारखेच आहे. ते रक्त मांसानेच बनलेले आहे. दोघांच्याही शरीरात मलमूत्राची घाण आहे. मग एक पवित्र आणि दुसरे अपवित्र असे म्हणणे शहाणपणाचे होईल का? आणि जर तुम्ही माझ्यातील जीवंतपणाने तुमच्यातील जीवंतपणापासून दूर व्हावे असे जर म्हणत असाल तर ते देखील शहाणपणाचे म्हणता येईल का? दोन्हींमधील जीवंतपणा हा एकाच ब्रम्हाचे प्रतिबिंब नाही का? तुम्हाला माझ्यात आणि तुमच्यात वसत असलेले चैतन्य एकच आहे, हे जाणवत नाही का?
तो चांडाळ जे त्यांना सांगत होता, त्याच वेदांतात शंकराचार्यांनी पांडित्य मिळवले होते. पण नेहमीच्या जीवनात मात्र आध्यात्मिक तत्त्वाप्रमाणे न वागता ते सामाजिक रुढी प्रमाणेच वागत होते. ही सामाजिक रुढी आध्यात्मिक विचाराच्या विरुद्ध होती.
त्या चांडाळाने अशी कान उघडणी केल्यानंतर शंकराचार्यांना आपली चूक जाणवली हे लक्षात घे. ते त्यांना त्यांची चूक दाखवून देणार्‍यावर रागावले नाहीत. उलट त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले. ते म्हणाले, ‘आजपर्यंत मी सर्वत्र चैतन्य भरलेले आहे हे फक्त बोलत होतो. त्याबाबत वाद घालून पंडितांना हरवत होतो. पण मला ते सर्वत्र दिसत नव्हते. तुम्ही मला ती दृष्टी दिलीत. तुम्ही माझे गुरू आहात.’
शंकराचार्यानी सर्वत्र भरून राहिलेले ब्रम्ह माणसाला कसे दिसेल याची साधना सांगितली आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे हे जाणून घेणे की सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे. हा विचार आपल्या मनाचा भाग व्हावा यासाठी चिंतन करायला हवे. मनाला तसे पाहण्याची सवय व्हायला हवी म्हणून सतत प्रयत्न करायला हवेत.
हा विचार संत तुकाराम महाराजांना कळला होता, म्हणून त्यांना ‘विठू सर्वत्र घनदाट’ भरून आहे हे जाणवू लागले होते. त्यांना हे जाणवू लागल्यामुळे त्यांचा स्वार्थ नाहीसा झाला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा त्यांनी परत पाठवला. गरजेपेक्षा जास्त पैशांची गरज नाही हेच त्यांच्या वागणुकीतून दिसत नाही का? हेच वैराग्य. हे वैराग्य आपल्यात बाणवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
“पण बाबा, ते संत होते म्हणून त्यांना ते जमले,” मी म्हणालो.
बाबा हसले आणि म्हणाले, “ते संत म्हणून आकाशातून पडले नाहीत. त्यांनी खऱ्या आध्यात्मिक तत्त्वाप्रमाणे साधना केली. साधनेमुळे त्यांना सर्वत्र देव दिसू लागला. त्यांच्या वर्तनात निस्वार्थता दिसू लागल्यानंतर, त्यांच्यात करुणा ओतप्रोत भरलेली दिसू लागल्यानंतर लोक त्यांना संत म्हणू लागले. असे संतत्व प्राप्त करण्यासाठीच मानवी जन्म आहे. तेच ध्येय माणसाने बाळगले पाहीजे अशी गीतेची शिकवण आहे.”
……
डॉ. रुपेश पाटकर

  • Related Posts

    MLAs Cannot Control Behaviour of Pass Holders

    GFP MLA Vijay Sardesai responds to the notice of speaker in Assembly Panaji, 10 : Vijai Sardesai on Tuesday responded in the Goa Legislative Assembly after Speaker Dr. Ganesh Gaonkar…

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    Panaji : Leader of Opposition Yuri Alemao on Wednesday strongly condemned the BJP Government’s decision to denotify 3.33 lakh sq. mt. of command area land under the Tillari Irrigation Project…

    You Missed

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    25/03/2026 e-paper

    25/03/2026 e-paper