
विश्वजित राणे यांनी तर हा सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देणारा प्रकल्प असल्याचे सांगून टाकले आहे. ते छोटे खाशे आहेत. खाशांना कोण जाब विचारणार. बरे सत्ताधारी पक्षाचे सोडा, पण विरोधी पक्षावरही खाशांची इतकी दहशत आहे की ते देखील या गोष्टीकडे अनदेखी करू लागले आहेत.
तुम्ही युट्यूब सुरू केल्यास तिथे मेगास्टार अमिताभ बच्चनची एक जाहिरात येते. कारापूर-साखळी येथे हाऊस ऑफ अभिनंदन लोढा कंपनीकडून मोठा पंचतारांकित प्रकल्प सुरू आहे. तिथे भूखंड विकत घेण्यासाठीची ही जाहिरात आहे. वन ग्लोबल गोवा असा मथळा या जाहिरातीचा आहे. गोव्यात व्हिला जमिनीच्या स्वप्नपूर्तीसाठी आता प्रतिक्षा का, असा सवाल या जाहिरातीत केला जातो. या व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर कितीतरी व्हिडिओ आहेत. देश, विदेशात जोरदार पद्धतीने ही जाहिरातबाजी सुरू आहे.
हे सगळे सुरू असताना आपले राजकीय नेते किंवा सरकार जणू हे काहीच माहित नसल्याच्या थाटात वावरत आहेत. ठिकठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटकात मोक्याच्या ठिकाणी भले मोठे फलक झळकत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकल्प गोव्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्या कारापूर एग्रो कंपनीकडून विकलेल्या जमिनीत उभा राहत आहे. दै. तरूण भारतसाठी दिलेल्या एका बातमीत चक्क नगर नियोजनमंत्र्यांनी हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ज्या तऱ्हेने या प्रकल्पाची जाहिरात सुरू आहे ते पाहता इथे काहीतरी भव्य दिव्य उभे राहणार आहे, हे मात्र नक्की. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही. या जागेत मानवनिर्मित समुद्राची उभारणी केली जाणार असल्याची घोषणा जाहिरातीत करण्यात आली आहे.
हा सगळा प्रकार बिनबोभाट सुरू असताना कुणीच याबाबतीत बोलत नाही. हा प्रकल्प मये मतदारसंघात येतो. आमदार प्रेमेंद्र शेट चुप आहेत. डिचोलीत प्रकल्प उभा होतोय, पण डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये चकार शब्द काढत नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे असे चुप आहेत की कारापूर-साखळी हा भाग खरोखरच गोव्यात येतो की अन्यत्र कुठे, असा प्रश्न पडावा. विश्वजित राणे यांनी तर हा सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करून देणारा प्रकल्प असल्याचे सांगून टाकले आहे. ते छोटे खाशे आहेत. खाशांना कोण जाब विचारणार. बरे सत्ताधारी पक्षाचे सोडा, पण विरोधी पक्षावरही खाशांची इतकी दहशत आहे की ते देखील या गोष्टीकडे अनदेखी करू लागले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शेजारलाच जेव्हा हा प्रकार सुरू आहे. ते याबाबत चकार शब्दही काढत नाहीत. दुसरीकडे गोंयकारांना भलत्याच गोष्टीत गुंतवून ठेवण्यासाठी सरकार एकामागोमाग एक स्टंटबाजी करत सुटले आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा, विकसित भारत, अंत्योदय तत्व आदी शब्दांचा मारा सुरू आहे आणि दुसरीकडे गोव्यावर रिअल इस्टेटवाल्यांचे आक्रमण सुरू आहे. सगळी यंत्रणाच या लोकांच्या संरक्षणार्थ आणि पाठींबार्थ वावरत असताना सर्वसामान्य लोकांना कुणाचाच आधार राहिलेला नाही. कारापूरात भव्य पंचतारांकित नगरी उभी राहणार आहे आणि तिकडे सांकवाळ येथील भूतानीच्या पंचतारांकित प्रकल्पासाठी सरकार अट्टाहास करून तेथील स्थानिक लोकांना सतावत आहे.
यंदाचा पद्मश्री पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांना प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांनीच त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी आपले पती वामनराव सरदेसाई यांच्यासोबत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे. गोवा मुक्ती संग्रामाचा गौरव होत असताना गोवा मुक्तीचे शत्रू बनून आपला गोवा भांडवलदारांच्या ताब्यात देण्यासाठी वावरणाऱ्यांचा पर्दाफाश व्हायला नको का?