करमळीवासियांचा टीसीपीसमोर ठिय्या

मेगा प्रकल्पाविरोधात आमदार विरेश बोरकर आक्रमक



गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

तिसवाडी तालुक्यातील करमळी गावात होऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाविरोधात करमळीवासियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पाटो-पणजी येथील नगर नियोजन खात्याच्या गेटसमोर करमळीवासियांनी ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. “जोपर्यंत करमळीतील मेगा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेत आमदार विरेश बोरकर यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला.
करमळीवासियांनी आज सकाळीच नगर नियोजन खात्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी खात्याच्या इमारतीच्या मुख्य गेटला कुलूप ठोकून आंदोलकांना आत येण्यास मज्जाव केला. यानंतर मुख्य नगर नियोजकांनी फोनवरून आमदार विरेश बोरकर यांच्याशी संवाद साधला. प्रकल्पधारकाकडे सर्व कायदेशीर परवाने आणि मान्यता असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर “कितीतरी त्रुटी आम्ही दाखवू शकतो,” असे म्हणून आमदार बोरकर यांनी त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले.
हप्तेखोरींना मिळतात परवाने
प्रकल्पधारकांकडून हप्ते जमा केल्यानंतर सर्व कायदे-नियम वाकवून मेगा प्रकल्पांना मान्यता दिली जाते. “प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक त्रुटी आम्ही दाखवू शकतो,” असे आमदार बोरकर म्हणाले. या मेगा प्रकल्पांमुळे करमळी गावाचा विध्वंस होणार आहे. प्रस्तावित रस्त्यांचे निकष पुढे करून दिले जाणारे परवाने भविष्यात गावांसमोर भीषण संकटे निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. भूवनेश्वर फातर्पेकर आणि जिल्हा पंचायत सदस्य तृप्ती बकाल यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला.
सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठींबा
विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला. स्वप्नेश शेर्लेकर, शंकर पोळजी तसेच अनेक इतरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

आम आदमी पार्टीत भूकंप
प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

गोवा प्रदेश आम आदमी पार्टीत भूकंप झाला आहे. गोवा प्रदेशाचे माजी अध्यक्ष ॲड. अमित पालेकर आणि प्रभारी अध्यक्ष तसेच सरचिटणीस श्रीकृष्ण परब यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर अन्य पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. या राजीनामा सत्रामुळे पक्षात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा महायुतीकडे कल होता; परंतु तरीही पक्षाच्या नेतृत्वाने थेट विरोधी काँग्रेसवर हल्लाबोल करून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षात अंतर्गत धुसफुस सुरू होती. सर्वाधिक ४२ जागांवर उमेदवार उतरवून केवळ एका ठिकाणी पक्षाला यश मिळाल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाली. या निकालानंतर ॲड. अमित पालेकर यांच्याकडून अध्यक्षपदाची धुरा काढून घेण्यात आली. पक्षात नव्याने दाखल झालेले आणि सरचिटणीसपदी नियुक्त झालेले श्रीकृष्ण परब यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता ॲड. अमित पालेकर यांच्यासह श्रीकृष्ण परब यांनीही जिल्हा पंचायतीतील अपयश तसेच निर्णयप्रक्रियेतील चुकांवर बोट ठेवत आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
या राजीनामा सत्रात पक्षाचे युवा अध्यक्ष रोहन नाईक आणि प्रदेश उपाध्यक्ष चेतन कामत यांनीही आपले राजीनामे सादर केल्यामुळे पक्षासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पक्षाचे दोन आमदार असून संघटनात्मक संकट अधिक गडद झाले आहे. पक्षाच्या प्रभारी तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांना पक्षाला उभारी देण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळे अनेकांची नाराजी आहे. रामराव वाघ यांनी उघडपणे युतीच्या धोरणाबाबत टीका करून पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता पक्षासमोर नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

  • Related Posts

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Goa University is preparing for a leadership transition, and the selection of its 10th Vice-Chancellor is crucial. After five years marked by academic reforms and controversies, the new appointment will determine the university’s direction for years to come, requiring a leader who can restore trust, transparency, academic freedom, and institutional excellence.

    कंत्राटी कर्मचारी कायम, २ हजार नोकऱ्या

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी अथवा अन्य स्वरूपात १० वर्षापासून दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…

    You Missed

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???