क्रांती फक्त शंभर रुपयांची!

हा प्रयोग अपयशी ठरला किंवा आम्ही स्वतःला वेगळे पत्रकार आहोत हा भ्रमाचा फुगा फुटला, तर मग वेगळा मार्ग शोधावा लागेलच. पण तूर्तास—आता उठवू सारे रान…

नमस्कार येवकार,
हांव किशोर नाईक गांवकार. गांवकारी युट्यूब चॅनेल आणि डिजीटल पेपरचा दोन वर्षांचा टप्पा कधी संपला हेच कळले नाही. स्वतंत्र पत्रकारितेचा झेंडा हातात घेऊन २०२४ साली रामनवमीच्या शुभमुहूर्तावर जय श्रीराम म्हणून आम्ही हे शिवधनुष्य उचलले.
टीका, अपमान, मत्सर यांचे चटके सहन करत असतानाच प्रेम, आस्था, कौतुक, मदत, प्रेरणा, प्रोत्साहन, आशीर्वाद हीच आमची खरी ताकद ठरली आहे. व्यवहार्यतेत या गोष्टींना किती महत्त्व आहे हे माहित नाही, कारण निकाल बहुधा यश-अपयशावरच लावला जातो. त्यात आम्ही अजूनही मागे आहोत, पण हम होंगे कामयाब एक दिन या शब्दांवर विश्वास ठेवून आमची मुशाफिरी सुरू आहे.
पत्रकारिता नोकरी म्हणून करणे आणि स्वयंस्फूर्तीने स्वतंत्र पत्रकारिता करणे यात मोठा फरक आहे. नोकरीत आर्थिक संरक्षणाचे कवच असते; विचारांना व्यवस्थापनाचे बंधन असले तरी लवचिकता अवलंबणे सोपे ठरते. स्वतंत्र पत्रकारितेत मात्र आर्थिक कवच नसते, पण विचारांचे स्वातंत्र्य शिस्तबद्धपणे आणि सर्वमान्य पद्धतीने हाताळावे लागते अन्यथा भरकटण्याचीच अधिक शक्यता असते हे या काळात उमगले. चांगल्याची, प्रामाणिकपणाची, सत्याची आणि निस्वार्थपणाची कदर समाजाला आहे, पण या सगळ्या गोष्टी व्यवहार्यतेच्या कक्षेत आणणे हे खूपच कठीण आणि आव्हानात्मक ठरते हे देखील शिकायला मिळाले.
गांवकारी सुरू करताना सर्वांत मोठा प्रश्न होता तो या प्रयोगाच्या व्यवहार्यतेचा. आम्ही एक फॉर्म्युला शोधला. खरोखरच प्रामाणिक, निर्भय पत्रकारितेची अपेक्षा ठेवणारा समाज अशा पत्रकारांच्या मागे उभा राहतो का? अनुभव सांगतो, होय, उभा राहतो. पण तुम्ही उपाशी आहात हे समोरच्याला आपोआप कळत नाही; भूक लागली आहे हे सांगावेच लागते. ही गोष्ट तेवढीच कठीण आणि आव्हानात्मक ठरते हे देखील आम्हाला शिकायला मिळाले.
गोवा लहान आहे, त्यामुळे आमची स्वप्नेही लहान आहेत. जर १५ लाख लोकसंख्या असलेल्या राज्यात किमान ५ हजार लोकांनाही आमच्या पत्रकारितेची कदर नसेल, तर आम्ही स्वयंघोषित पत्रकार आहोत असा अर्थ निघेल. या प्रवासात साथ देणारेही निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने सोबत करणारे मिळाले. जे काय मिळेल त्यात धन्यता मानणारे, म्हणूनच हीच आमची खरी परीक्षा आहे असे आम्ही समजतो. गेल्या दोन वर्षांचा अनुभव सकारात्मक ठरला आहे, त्यामुळे पूर्ण यशासाठी आणखी पुढे चालत राहणे क्रमप्राप्त आहे. हा प्रवास किती सुखर असेल किंवा नेमके पुढे काय वाढून ठेवले असेल हे नियतीच जाणे.
वर्धापनदिन हा अनेक पेपर किंवा चॅनेलसाठी मोठा महसूलाचा स्रोत असतो. आम्हाला मात्र तसे करण्यात रस नाही. जाहिराती मागितल्या असत्या तर मिळाल्या असत्या, पण त्या उपकार, सहानुभूती किंवा अनुकंपाच्या भावनेतून मिळाल्या असत्या. आम्हाला फक्त कामाची पावती हवी आहे. जर आमचे काम समाजोपयोगी असेल, तर किमान लोकांनी महिन्याकाठी शंभर रुपये टीप म्हणून मदत करावी.
होय, अनेकांना आम्ही भीक मागतो असे वाटेल. अनेकजण टिंगलही करतील. पण आमचे साधूसंत माधुकरी मागून उदरनिर्वाह करीत. त्यांची माधुकरी ही देणाऱ्याला कधीच भीक वाटली नाही. तीच भावना या प्रवासात आमच्या वाचक आणि प्रेक्षकाची बनू शकेल काय, ही सत्वपरीक्षा आम्ही घेणार आहोत.
टीप एवढ्याचसाठी म्हटली की गिऱ्हाईक खूष झाल्यावरच ती मिळते. जर ती मिळाली नाही, तर आमच्या कामात दोष आहे किंवा समोरच्या व्यक्तीला आमच्यात काहीच विशेष वाटत नाही. हा प्रयोग अपयशी ठरला किंवा आम्ही स्वतःला वेगळे पत्रकार आहोत हा भ्रमाचा फुगा फुटला, तर मग वेगळा मार्ग शोधावा लागेलच. पण तूर्तास आता उठवू सारे रान…

  • Related Posts

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    You Missed

    15/05/2026 e-paper

    15/05/2026 e-paper

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper