राज्यातील गावांगावात लोकउठाव सुरू असताना कुडचिरेतील लोकांच्या एकजुटीचा विजय ही स्फुर्तीदायी आणि प्रेरणादायक ठरेल हे निश्चित.
मये मतदारसंघातील कुडचिरेवासियांनी नियोजित बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात उभ्या केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,अशी माहिती मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली आहे. सत्ताधारी आमदाराचा मतदारसंघ असूनही आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जवळचा मतदारसंघ असूनही कुडचिरेवासियांनी सरकारच्या या नियोजित प्रकल्पाला विरोध करताना अजिबात मनात किंतू ठेवला नाही. सरसकट कुडचिरेवासिय घराबाहेर पडले. त्यांनी आपल्या स्थानिक आमदारालाही खडे बोल सुनावल्याचेही आम्ही पाहीले. सर्वेक्षणावेळी गांवची एकजुट दाखवल्यानंतर परवाच त्यांनी काढलेला मोर्चा बरेच काही सांगून गेला आणि त्यामुळे सरकारला अखेर नमते घेत बाराजण या पवित्र आणि धार्मिक श्रद्धा असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणारा बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द करावा लागला. कुडचिरेवासियांच्या या यशामुळे अनेकांचा हुरूप वाढणार आहे. सध्या ठिकठिकाणी आपला गांव वाचवण्यासाठीची आंदोलने सुरू आहेत. कुडचिरेवासियांच्या भावनांची कदर केलेल्या सरकारला सांकवाळवासियांच्या भावनांची अद्याप कदर वाटलेली नाही. वास्तविक ११ सदस्यीय पंचायतीतले फक्त दोनच पंचसदस्य लोकांसोबत आहेत आणि उर्वरीत पंचसदस्य आपालीपा खेळत आहेत, हेच मुळी सांकवाळचे दुर्दैव ठरले आहे. सांकवाळवासियांनी या सर्व पंचसदस्यांना आपली भूमीका जाहीर करण्यास भाग पाडावे किंवा बहुमतातील पंचसदस्यांनी उघडपणे या प्रकल्पाचे समर्थन करावे. कुठल्या तरी मंत्र्यांच्या दबावापोटी घरात लपून बसणे हे त्यांना शोभणारे नाही. जमीन रूपांतराच्याविरोधात आगरवाडा-चोपडेवासियांचे आंदोलन सुरू आहे. या पंचायतीच्या पंचसदस्यांनी आपली भूमीका जाहीर करण्याची गरज आहे. भोमावासियांचा राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाचा लढा सुरू आहे. तिथेही सरकारला या लोकांच्या भावनांची कदर वाटत नाही. भावनांची कदर ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वाटावी हे एक नवलच म्हणावे लागेल पण काही प्रमाणात जनतेची कदर आहे, हेच समाधान म्हणावे लागेल. मये मतदारसंघाचाच भाग असलेल्या कारापूर-सर्वण येथे लोढा बिल्डरचा पंततारांकित रहिवासी प्रकल्प उभा होत आहे. तिथेही स्थानिकांमध्ये चलबिचल सुरू आहे. पण खाशांनीच ही जमीन लोढाला विकल्यामुळे आणि साखळीत विश्वजीतबाबांचा खास दरारा असल्यामुळे कुणीही अद्याप उघडपणे बाहेर येण्याची धाडस करत नाही. कुडचिरेचा हा विषय तसाच लोळत ठेवला असता तर त्यातून कारापूर-सवर्णवासियांनाही प्रोत्साहन मिळाले असते आणि हे लोण कारापूरात पोहचले असते. कदाचित यासाठीच कुडचिरेतील हा लोकक्षोभाचा भडका तिथेच शमन करण्यात आला. राज्यातील गावांगावात लोकउठाव सुरू असताना कुडचिरेतील लोकांच्या एकजुटीचा विजय ही स्फुर्तीदायी आणि प्रेरणादायक ठरेल हे निश्चित.