लाखोली


घोषणांची
गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच पक्षाचे अन्य नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर नितीन नबीन यांचा हा पहिला राज्य दौरा असून त्यांनी गोव्याची निवड करणे हे भाजप कार्यकर्त्यांचे भाग्य असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काढले. मोपा विमानतळावर खास ढोलताशांची सोय करण्यात आली होती, तसेच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला.
पणजी येथील पक्ष कार्यालयाबाहेर खास व्यासपीठाची सोय करण्यात आली होती. विशेष मिरवणुकीतून भाजप पक्ष कार्यालयाकडे त्यांचे आगमन झाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी घोषणांची लाखोली करत पणजी परिसर दणाणून सोडला. मोठ्या संख्येने युवा कार्यकर्त्यांची हजेरी होती. नितीन नबीन हे भाजयुमोतून उभे राहिलेले नेतृत्व असल्याने युवकांत विशेष उत्साह पसरला असून २०२७ च्या विधानसभा निवडणुका भाजप युवकांच्या पाठबळावरच जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
कोअर समितीसोबत महत्त्वाची बैठक
आज पहिल्या दिवशी नितीन नबीन यांची भाजप कोअर समिती तसेच सर्व आमदारांसोबत महत्त्वाची बैठक झाली. पक्ष संघटना आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे.

दूषणांची
गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)

चिंबलकरांच्या महाआंदोलनाला अटकाव करण्यासाठी सरकारने रात्री उशिरा पणजी परिसरात जमावबंदी आदेश जारी केल्यानंतर अखेर महाआंदोलनाचे स्थळ जुनेगोवेतील गांधी चौकाकडे वळविण्यात आले. चिंबलातील नियोजित जागेत यापुढे कुठलाही प्रकल्प येणार नाही, याची कायदेशीर हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार चिंबलवासियांनी केला.
आज राज्यभरातून मोठ्या संख्येने लोकांनी चिंबलकरांना पाठींबा दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपचे माजी अध्यक्ष अमित पालेकर तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि आरजीपीचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा दिला.
“प्रशासन स्तंभ पर्यटन संचालक कसे काय हलवू शकतात?” असा सवाल करत सरकार चिंबलकरांची थट्टा करत असल्याचा आरोप करण्यात आला. रात्री उशिरा पर्यटन संचालकांनी चिंबल गावच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीला पत्र पाठवले. या पत्रात युनिटी मॉलसह प्रशासन स्तंभ स्थलांतरित केला जाईल, असे नमूद करण्यात आले. प्रशासन स्तंभ प्रकल्प पर्यटन खात्याकडे येत नाही, मग तो हटविण्याचा अधिकार संचालकांना कुणी दिला, असा टोलाही गोविंद शिरोडकर यांनी हाणला.
नगर नियोजन खात्याने या जागेत यापुढे कुठलाही प्रकल्प येणार नाही, याची लेखी हमी द्यायला हवी, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रत्येक वेळी कुठला ना कुठला तरी प्रकल्प आणून या जागेचा वापर करण्याची सवयच सरकारला जडली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
पणजी परिसरात जमावबंदी लागू करून चिंबलकरांना अडवले, पण भाजपला मात्र ही जमावबंदी लागू नाही. “राज्यात भाजपसाठी एक आणि इतर सर्वसामान्यांसाठी वेगळा कायदा आहे की काय?” असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

  • Related Posts

    Unity Mall at Chimbel: When Environmental Clearance Failed Goa and Public Trust Was Betrayed

    Unity Mall at Chimbel: When Environmental Clearance Failed Goa and Public Trust Was BetrayedThe controversy surrounding the proposed Unity Mall at Chimbel is no longer confined to questions of land…

    This Path Leads Only to Ruin

    The torchlight march once led by the late Manohar Parrikar against casinos, and the subsequent permission granted to the tallest casino vessel, together highlight a transformation in the BJP’s policy…

    You Missed

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !

    04/02/2026 e-paper

    04/02/2026 e-paper