
सरकारी कारवाईने झोपडपट्टीवासीयांमध्ये भीती
गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)
बार्देश तालुक्यातील थिवी मतदारसंघातील थिवी कोमुनिदादच्या अवचीनवाडा येथील वादग्रस्त ‘लाला की बस्ती’ या झोपडपट्टीतील सुमारे २५ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई आज सकाळी सुरू करण्यात आली. पाच पोलिस निरीक्षकांसह मोठा पोलिस फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता.
या कारवाईमुळे राज्यातील इतर ठिकाणच्या झोपडपट्टीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याचा आधार घेऊन आता ठिकठिकाणी ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांकडून जारी केलेल्या नोटिशींमध्ये ११ मार्च २०२५ नंतर कधीही ही बांधकामे पाडली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते, परंतु कारवाईसाठी अखेर १५ एप्रिल उजाडावा लागला.
वोटबँकचा वापर
थिवी मतदारसंघातील अवचीनवाडा येथील ‘लाला की बस्ती’ ही कायम राजकीय नेत्यांची वोटबँक राहिली आहे. सत्तेत असलेल्या नेत्यांकडून या वोटबँकेचा वापर केला गेला. आरजीपीने प्रारंभी हा विषय हातात घेतल्यामुळे ही वस्ती चर्चेत आली. यानंतर आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेऊन अशा बेकायदा घरांवर कारवाई करण्यासाठी मुख्य सचिवांना नोटीस जारी केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
ही कारवाई झाली नाही, तर अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा गडेकर यांनी दिला आहे. याशिवाय, म्हापसा आणि आसगांव कोमुनिदादच्या घरांचा विषय त्यांनी प्राधान्यक्रमाने लावून धरला आहे.