मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

कोपनहेगन ओपन स्क्वॉश स्पर्धेत यश फडतेला विजेतेपद; ऑलिंपिकच्या स्वप्नासाठी सरकारी मदतीची प्रतीक्षाच

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धांमध्ये गोव्यासह भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या यश फडतेच्या वाट्याला मैदानात यश, तर सरकार दरबारी उपेक्षा येत असल्याचे चित्र आहे. डेन्मार्कमधील कोपनहेगन ओपन २०२६ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून यशने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. मात्र, ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या युवा खेळाडूला राज्य सरकारने आश्वासन दिलेल्या आर्थिक मदतीसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोपनहेगन ओपनच्या अंतिम सामन्यात यशने स्पर्धेतील अव्वल मानांकित तथा स्वीडनचा क्रमांक एकचा खेळाडू जोएल विकस्टोन याचा ११-८, ११-६, ११-५ अशा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. ५१ मिनिटांच्या या सामन्यात त्याने निर्विवाद वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी डेन्मार्कच्या माल्थे लॉर्सन, इंग्लंडच्या चेस्टर डॉकरी आणि गॅब्रिएल कॉक्स यांना पराभूत करत त्याने अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत दहा देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, यशच्या या यशामागील संघर्षाची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावण्यासाठी विविध देशांतील स्पर्धांत सहभागी होणे आवश्यक असून त्यासाठी प्रवास, निवास आणि प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. यशच्या कुटुंबाने त्याच्या कारकिर्दीसाठी सर्वस्व पणाला लावले आहे. तरीही राज्य सरकारच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ त्याला मिळालेला नाही. कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑलिंपिकच्या तयारीसाठी विशेष मदतीची घोषणा केली होती. मात्र, त्या घोषणेचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचे यशचे वडील दिलीप फडते यांनी सांगितले.

खेळाडूला यश मिळाल्यानंतर नव्हे, तर यश मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असतानाच मदतीची खरी गरज असते, अशी बोलकी प्रतिक्रिया दिलीप फडते यांनी व्यक्त केली.

या विजेतेपदानंतर यश आता फ्रान्समधील लिऑन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या उत्तरार्धात वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत तो सहभागी होणार आहे.

  • Related Posts

    दोन लाख महिला तीन हजारांच्या प्रतीक्षेत !

    आमदार विजय सरदेसाई यांचा हल्लाबोल गांवकारी,दि.२४(प्रतिनिधी) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या नावाखाली भाजप सरकार मोठमोठ्या घोषणा आणि प्रसिद्धी करत असले तरी प्रत्यक्ष लाभ देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे…

    ५०० कोटींचा हिशेब!

    रोहन, मायकल निरुत्तर गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक आमदाराला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा विकासनिधी दिल्याचे जाहीर केले होते. मग गेल्या पाच वर्षांत कळंगुट मतदारसंघात ५००…

    You Missed

    Amit Patkar Launches ‘Super Me’ Campaign to Fight Drug Abuse Among Schoolchildren

    Amit Patkar Launches ‘Super Me’ Campaign to Fight Drug Abuse Among Schoolchildren

    मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

    मैदानात यशचा डंका; सरकार दरबारी मात्र उपेक्षाच !

    27/10/2026 e-paper

    27/10/2026 e-paper

    ‘कमळ बघ, मतदान कर’!

    ‘कमळ बघ, मतदान कर’!

    घोषणा नकोत, दरारा हवा !

    घोषणा नकोत, दरारा हवा !

    Chodankar Alleges ₹5,000-Crore Dona Paula Land Scam, Questions BJP Government’s PPP Deal

    Chodankar Alleges ₹5,000-Crore Dona Paula Land Scam, Questions BJP Government’s PPP Deal