
एकदा आपण देवाला जाऊन मिळालो की जसे समुद्रात मिसळणार्या नदीचे होते तसे होते. समुद्राला मिळालेली नदी मग नदी राहत नाही, ती समुद्रच बनून जाते. मग मी उरत नाही. फक्त तोच उरतो.
मी नववीत असेन त्यावेळी. स्वामी विवेकानंदाच्या लिखाणात मला एक गंमतीशीर मुद्दा मिळाला. तो मुद्दा होता तार्किक, पण माझ्या यापूर्वीच्या विचार करण्याला धक्का देणारा होता. ‘मांजरांनी जर देव मानला तर त्यांच्या कल्पनेतील देव म्हणजे एक मोठे शक्तीशाली मांजर असेल. गुरांनी देव मानला तर त्यांच्या कल्पनेतील देव म्हणजे मोठी शक्तीशाली गाय किंवा बैल असेल. माणसांच्या कल्पनेतील देव ज्याच्या त्याच्या कल्पनेतील शक्तीशाली मनुष्य प्राणी असतो. म्हणजे शक्तिशाली असला, मोठा असला तरी तो एक प्राणीच असतो. आपल्या कल्पनांनी आपण देवाला मर्यादित करत असतो.’ देव तर अनादी अनंत म्हणजे त्याचा कधी जन्म झाला नाही, ना कधी त्याचा अंत होईल. तो सर्वव्यापी म्हणजे तो नाही अशी जागा नाही. तो निराकार म्हणजे त्याला कोणताच आकार नाही. तो निर्गुण म्हणजे त्याला कोणतेच वैशिष्टय़ लावता येणार नाही. ‘तो कसा आहे?’ या प्रश्नाचे उत्तर वेद काय देतात? ‘नेति नेति!’ म्हणजे तो कसा नाही ते वेद सांगतात. तो कसा आहे हे वेदांनाही सांगता येत नाही. गीतेत त्याचा उल्लेख ‘अचिंत्य’, ‘सर्वव्यापी खुणेविण’ असा केला आहे.
‘मला हे मूर्तीपूजेच्या विरोधी वाटते,’ मी बाबांना म्हणालो.
बाबा हसले आणि म्हणाले, ‘गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवान म्हणतात,
‘अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यास विशेष चि!
देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चि ना!!’
अव्यक्त, निराकार गोष्टीचे चिंतन सहजासहजी होणे शक्य नाही. त्यामुळे परमेश्वराचे प्रतीक घेऊन चिंतन करणे भाग आहे. हे प्रतिक आपल्याला वाटणार्या श्रेष्ठ गुणाचे असणार हेदेखील सहाजिकच आहे. राम, कृष्ण यांना आपण मानवी रुपात आठवत असलो तरी त्यांचा विचार करताना आपण त्यांना माणूस म्हणून आठवत नाही, परमेश्वर म्हणून आठवतो. त्यांची मातीची किंवा दगडाची मूर्ती पूजत असलो तरी ती मूर्ती बघतांना आपल्याला चैतन्यमय राम किंवा कृष्ण आठवत असतो.’
‘पण बाबा, आपण मूर्तीची पूजा केली तरी देवाविषयी प्रेम वाटत नाही,’ मी म्हणालो. मला जाणवत होते की चतुर्थीसारख्या उत्सवाची आतुरता वाटत असली तरी ती देवाच्या प्रेमामुळे नाही, तर त्या काळात जी धुमधाम असते त्यामुळे वाटते.
बाबा म्हणाले, ‘हा नवा प्रश्न नाही. गीतेच्या काळात देखील हा प्रश्न होता, म्हणून गीतेत भगवान म्हणतात,
जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर!
तरी अभ्यास योगाने इच्छुनि मज मेळवी!!
हा अभ्यास करण्याचा एक मंत्र आहे. तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका गावात एक सिद्ध पुरुष आले होते. त्यांच्या दर्शनाला एक विष्णूचा भक्त गेला. त्या वैष्णव भक्ताने त्या सिद्ध पुरुषाला आपली अडचण सांगितली की तो विष्णुचा उपासक असला, तो नित्यनेमाने विष्णूची पुजा करत असला तरी त्याला विष्णूचा जिव्हाळा वाटत नाही. करायचे म्हणून तो पुजा करतो. त्यावर त्या सिद्ध पुरुषाने विचारले, ‘तुला जगात सर्वात जास्त जिव्हाळा कोणाविषयी वाटतो?’
शरमेने मान खाली घालत तो वैष्णव म्हणाला, ‘माझा एक मेंढा आहे. त्याच्याच विषयी मला सर्वात जास्त जिव्हाळा वाटतो.’
त्यावर तो सिद्ध पुरुष म्हणाला, ‘मग त्या मेंढ्यालाच तू विष्णु मान. त्या मेंढ्यातील जीवंतपणा हा विष्णुच नाही का!’
ज्याच्या विषयी सर्वात जास्त जिव्हाळा वाटतो त्या गोष्टीला परमेश्वर मानावे. त्यातील चिन्मयता (म्हणजे जीवंतपणा) हा परमेश्वराचा अंश असतो.
रामकृष्ण परमहंसांनी चैतन्यदेवांची कथा सांगितली आहे. चैतन्यदेव एकदा दक्षिणेच्या यात्रेला गेले होते. एके ठिकाणी एक साधक भगवद्गीता पठण करत होता. त्याच्यापासून काही अंतरावर बसून एक साधारणसा व्यक्ती त्याचे गीता पठण ऐकत होता. त्या ऐकणाऱ्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. चैतन्यदेव त्याच्याजवळ गेले. त्यांनी विचारले, ‘गीतेतील कोणत्या गोष्टीने तुम्ही इतके भावूक होत आहात?’
तो म्हणाला, ‘मला जे वाचले जातेय त्यातील काहीच कळत नाहिये. हे ऐकत असताना माझ्या डोळ्यांसमोर अर्जुनाचा रथ येतो. निराश होऊन बसलेला अर्जुन आणि त्याला समजवणारा सावळा कृष्ण येतो. साक्षात परमेश्वर आपल्या भक्तासाठी सारथी होतो. बस, माझ्या मनात उभे रहाणारे हेच दिव्य चित्र मला भावूक बनवते आहे.’ चैतन्यदेव म्हणतात, ‘त्यालाच गीता खरोखर कळते आहे.’ इतरांना प्रभावित करण्यासाठी शुष्क पांडित्य मिरवणे काय कामाचे, देवाचे नाव ऐकताच मनात भावना उचंबळून येणे हीच खरी भक्ती,’ बाबा म्हणाले.
‘परमेश्वराची भक्ती ही मुक्ती मिळवण्यासाठीच करायची असते ना? जीवनातील अडचणींसाठी करायची नसते ना?’ मी विचारले.
‘हे खरे आहे. पण मग आपल्या अडचणींची गार्हाणी सांगावी तरी कोणाला? ती जरूर त्यालाच सांगावी. ती त्याच्याकडेच मागावी. इतरांच्या पुढ्यात का लाचार व्हावे?देवाने आपली अडचण सोडवली किंवा नाही सोडवली, तरी त्याची इच्छा हसत मान्य करावी. पण हेदेखील पक्के लक्षात ठेवावे की अडचणींवर मात करण्यासाठी नीती कधीच सोडू नये. ज्याचा परमेश्वरावर विश्वास असतो, त्याचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. तो अडचणीतदेखील नीती सोडत नाही. तुकाराम महाराजांना सांसारिक अडचणी कमी नव्हत्या. पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदराने पाठवलेला नजराणा परत पाठवला.
आणखी एक गमत बघ. विठ्ठलाच्या साकार मुर्तीची भक्ती करणारे तुकाराम महाराज साधू कोणाला म्हणतात? निःसंदिग्ध शब्दात ते सांगतात,
‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा!’
आणि ही फक्त त्यांची एक अभंग रचना किंवा प्रतिभाविलास होता असं नाही. तुला मी गो. नि. दांडेकरांनी लिहिलेलं तुकाराम महाराजांचं चरित्र वाचायला दिलं होतं. त्यात त्यांनी इंद्रायणीत काही बुडवल्याची कथा आहे. आठवते का?’
‘हो. गाथा बुडवल्याची! आणि मग ती वर येते त्याची,’ मी म्हणालो.
बाबा हसले आणि म्हणाले, ‘ती नव्हे. त्याच्या आधीची ही घटना आहे. तुकाराम महाराज त्यांच्या गावाजवळच्या डोंगरावर पंधरा दिवस एकांतात राहून परत येतात, त्यानंतरची गोष्ट आहे. तुकारामांच्या कुटुंबात सावकारी होती. लोकांना कर्जाऊ पैसे देत आणि त्या बदल्यात व्याज घेत. कर्ज कोण घेतो? गरीब शेतकरी. त्याच्याकडे फारसे काही नाही म्हणून तर तो कर्ज घेतो. तो कर्ज कसे फेडणार? त्याचे व्याज कसे देणार? त्याला त्याच्या शेतात पिकलेल्या तुटपुंज्या धान्यातून आणखी एक वाटा सावकाराला द्यावा लागतो. अशा अनेक गरीब शेतकर्यांनी तुकारामांच्या वडिलांकडून कर्ज घेतले होते आणि तसे लिहून दिले होते. त्या लिहून दिलेल्या कागदाला कर्जखत म्हणतात. तुकाराम महाराजांनी त्यांच्या वाट्याला आलेली कर्जखते चक्क इंद्रायणीत बुडवली. का? त्या रंजल्या गांजल्यांचा छळ नको म्हणून!
आणखी हेदेखील लक्षात घे की ‘रंजल्या गांजल्यात देव पहा’ हे फक्त तुकाराम महाराज एकटेच सांगतात किंवा फक्त वारकरी संतच सांगतात असेही नाही. नरसी मेहता हे गुजरातेतील संत. ते ‘वैष्णव कोण’ याची स्पष्ट व्याख्या करताना म्हणतात,
‘वैष्णव जन तो तेणे कहिए जे, जो पिड पराई जाने रे.’ अनेकांना ही महात्मा गांधींची ओळ वाटते, पण ती त्यांची नाही, त्यांच्या आधी चारशे वर्षे होऊन गेलेल्या संत नरसी मेहतांची आहे.
मूर्तीत देव पहाण्यापासून भक्ती सुरू होते, पण ती तिथेच थांबत नाही. ती विकसीत होत होत रंजल्या गांजल्यांच्या सेवेपर्यत पोचते,’ बाबा म्हणाले.
‘रंजल्या गांजल्यांची सेवा या अवस्थेपुढे काय होते? भक्तीची सर्वात अंतिम अवस्था कोणती?’ मी विचारले.
‘रंजल्या गंजल्यांच्या सेवेबाबतचा भाव पण महत्त्वाचा आहे. आपण त्यांची सेवा करून उपकार करत नाही, हे लक्षात ठेव. ते दरिद्री असले तरी ते नारायण असतात. सेवा नारायणाची असते. त्यामुळे त्यांची सेवा करताना उपकाराचा भाव असणे म्हणजे आपण देवावर उपकार करतोय असे वागणे. ते चुकीचे आहे. देवाचा घोर अपमान करणे आहे.
आणि भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे आपण देव होणे. गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवान म्हणतात,
मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू
म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये!
म्हणजे एकदा आपण देवाला जाऊन मिळालो की जसे समुद्रात मिसळणार्या नदीचे होते तसे होते. समुद्राला मिळालेली नदी मग नदी राहत नाही, ती समुद्रच बनून जाते. मग मी उरत नाही. फक्त तोच उरतो,’ बाबा म्हणाले.
…….
– डॉ. रुपेश पाटकर