मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५

महाराष्ट्र – गोव्यातील टेनिस क्रिकेटचे मापदंड बदलणारी स्पर्धा

क्रिकेटची जत्रा म्हणजे काय असते, क्रिकेटचा कुंभमेळा कसा असतो, याचा अनुभव १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान हजारो नव्हे तर लाखो क्रिकेट रसिकांनी गोव्यातील तुये- पेडणे येथील सुरेश रैना मैदानावर अनुभवला. मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी (एमसीटी)चे अध्यक्ष आणि मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच महेश कोनाडकर, गोव्याचे दमदार माजी अष्टपैलू खेळाडू संजय नागवेकर, त्यांचे सहकारी अंबाजी कोनाडकर आणि मांद्रे बॉयजच्या सदस्यांनी हा भव्य सोहळा इतक्या विलक्षण रीतीने यशस्वी केला की, येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची आठवण काढत राहतील.

पाच दिवस चाललेल्या या क्रिकेटच्या महासंग्रामात गोवा आणि सिंधुदुर्गातील सोळा संघ मालकांचे सोळा संघ सहभागी झाले. प्रत्येक संघातून त्या त्या तालुक्यातील नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यांना सोबत मिळाली ऑल इंडिया लेव्हलवरील प्रत्येकी दोन आयकॉन खेळाडूंची. आजपर्यंत ज्यांना प्रेक्षकांनी फक्त मोबाईल किंवा टेलिव्हिजनवर पाहिले होते, त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रत्यक्ष गोमंतभूमीत खेळताना पाहून प्रत्येक प्रेक्षक एमसीटी च्या प्रेमातच पडला. टेनिस क्रिकेटचा देव कृष्णा सातपुते, ‘३३३३३’ चा मानकरी आणि महाराष्ट्राचा बाईकमॅन केतन म्हात्रे, स्पीडस्टार ऑफ इंडिया विश्वजीत ठाकूर, आयएसपीएल विजेता आणि युवकांचा आयडॉल करण अंबाला, १४ झेल घेऊन अव्वल फील्डर ठरलेला कॅप्टन ऑफ महाराष्ट्र योगेश पेणकर, प्राइड ऑफ भिवंडी भावेश पवार, कोलकाता प्रिन्स जगत सरकार, संजू कनोजिया, इंदापूरचा एजाज कुरेशी, मोन्या अक्षय पाटील यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

यांच्याबरोबरच कोकणातील खेळाडूंनीही आपल्या कामगिरीने लक्ष वेधलेच. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ‘३३३३३’ पटकावणारा सिंधुदुर्ग एक्सप्रेस दर्शन बांदेकर, अंतिम सामन्यात चार दिग्गजांची शिकार करत ‘२२२२२’ चे पारितोषिक मिळवणारा रोहन साळगांवकर, गोव्याचा सुपरमॅन समर्थ गावस, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा, फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ गोवा पुनाजी कलंगुटकर, मिस्टर डिपेंडेबल अपाली कलंगुटकर, कोकणचा बाहुबली दाजी नाईक, ‘राजाओं का राजा’ राजा नाटेकर, ‘भाऊ’ सुरज गावडे अशा अनेकांनी आपल्या खेळाचे नाणे खणखणीत वाजवले. मात्र सर्वांचे लक्ष खेचून घेतले ते मालिकावीराच्या पुरस्कारावर कब्जा करणाऱ्या, एकूण १४३ धावांचा रतीब घालणाऱ्या आणि ‘फसिनो’चा मानकरी ठरलेल्या गोव्याच्या सुवर्णमयी प्रतिभावान खेळाडू रजत कुडाळकरने.

या स्पर्धेत अभिर बाबा बार्देश संघाने प्रथम क्रमांकासह ₹ ९,९९,९९९ चे पारितोषिक आणि मानाची एमसीटी ट्रॉफी पटकावली. भाव्यानश स्पोर्ट्स साईश इलेव्हन मालवण संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरून ₹६,६६,६६६ चे पारितोषिक मिळवले. उपांत्य फेरीत पराभव पत्करलेल्या गतविजेत्या पेडणे स्ट्रायकर्स व श्री बांदेश्वर इलेव्हन सावंतवाडी यांनी प्रत्येकी ₹३,३३,३३३ वर समाधान मानले. तसेच उप-उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इतर चारही संघांना प्रत्येकी ₹५५,५५५ देऊन गौरविण्यात आले.

फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेल्या बक्षीस वितरण सोहळ्याला मान्यवरांनी चार चांद लावले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, ध्रुव क्लब व ध्रुव ट्रॉफी आणि पीपीएलचे सर्वोसर्वा , माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर, मांद्रे पंचायतीचे सरपंच रॉबर्ट फर्नांडिस, माजी सरपंच व विद्यमान पंचायत सदस्य प्रशांत नाईक, राजेश मांद्रेकर, मिंगेल फर्नांडिस, पंचायत सदस्या सौ. संपदा आजगावकर, सौ. चेतना पेडणेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत एमसीटी अध्यक्ष महेश कोनाडकर आणि स्पर्धाप्रमुख संजय नागवेकर यांनी व्यासपीठाची शोभा वाढवली.

कोकणच्या सुपुत्रांनी अधिकृत कर्तव्ये देखील तितक्याच दर्जेदारपणे पार पाडली. अंपायर म्हणून योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर, राजेंद्र दाभोलकर आणि रुपेश ‘भालो’ गावस यांनी पंचगिरीत उत्कृष्ट कामगिरी केली. स्कोरर निखिल कुडव, धीरज पालयेकर आणि अखिल परब यांनी आकडेवारी अचूकपणे सांभाळली. मैदानाबाहेर बॉल बॉय म्हणून ‘डम्मा’ आणि स्पर्धेचे व्हिडिओ शूट करणारे रुपेश कळंगुटकर यांनीही मोलाची भूमिका बजावली. सुमधुर डीजे संदीप किनळेकर यांनी प्रेक्षकांना संगीताच्या तालावर झुलवले. समालोचनाच्या क्षेत्रात हरेश काकोडकर, अशोक नाईक, समीर पांढरे, प्रशांत आदवडे, तुषार नाईक, श्याम कळंगुटकर, योगेश परब, नाना परब तसेच मालवणी–कोकणी आवाजाचा बादशहा बादल चौधरी यांनी आपला ठसा उमटवला. २१ लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेल्या टेनिस क्रिकेट. ईन टीमने पाच दिवसांत तब्बल २३ लाख व्हूज मिळवून ही स्पर्धा जगभरात पोचवली.

खरंच, ज्यांनी ही स्पर्धा पाहिली ते एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. कधीच संपू नये असे वाटणारा हा दैदीप्यमान सोहळा सांगता जवळ आला तो अध्यक्ष महेश कोनाडकर यांच्या ‘नॉर्थ गोवा प्रीमियर लीग २०२६’च्या घोषणेने. पुढील वर्षी आणखी भव्य-दिव्य काहीतरी पाहायला मिळणार, या उत्सुकतेने आणि आनंदाने प्रेक्षकांनी भरल्या अंत:करणाने मैदानाचा निरोप घेतला. पुढच्या वर्षी नक्की भेटूया, या दृढ निश्चयासह…

  • Related Posts

    MLAs Cannot Control Behaviour of Pass Holders

    GFP MLA Vijay Sardesai responds to the notice of speaker in Assembly Panaji, 10 : Vijai Sardesai on Tuesday responded in the Goa Legislative Assembly after Speaker Dr. Ganesh Gaonkar…

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    Panaji : Leader of Opposition Yuri Alemao on Wednesday strongly condemned the BJP Government’s decision to denotify 3.33 lakh sq. mt. of command area land under the Tillari Irrigation Project…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    किती म्हणून सहन करणार ?