मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात माझ्याकडे आलेल्या काही केसेस ठेवेन. सुमारे सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक वीस वर्षांची तरुणी डिप्रेशनचा त्रास आहे अशी तक्रार घेऊन आली. डिप्रेशन, चिंता वगैरे सामान्य मानसिक आजार आपल्या समाजात तब्बल दहा टक्के लोकांना असतात. त्यामुळे डिप्रेशनची केस म्हणून त्यात नव्याने सांगण्यासारखे काही नाही. तिचे डिप्रेशन निश्चित करायला मी निराशेशी संबंधित इतर लक्षणांबाबत तिला जुजबी प्रश्न विचारले. उमेद कमी झाल्यासारखे वाटते का? होपलेसनेसचे विचार येतात का? रडायला येतं का? वगैरे वगैरे. या प्रश्नांची उत्तरे जसजशी ती देत गेली तसतसे माझ्या डोक्यात तिला ‘डिप्रेशन’ असल्याचे निदान पक्के होत गेले. माझ्या डोक्यात तिला काय औषधे द्यायची याचा देखील निर्णय होऊ लागला. पण बोलता बोलता ती थांबली, तिला हुंदका आला. काही क्षणांनंतर ती म्हणाली, “डाॅक्टर, मला काही सांगायचे आहे. माझ्या बाबतीत खूप वाईट घडलेय.”
कुमारवयीन मुलांच्या समस्या बहुधा नातेसंबंधांच्या, करियरसंबंधीच्या, अभ्यासाबाबतच्या, व्यसनासंबंधीच्या असतात. त्यामुळे यापैकी एखादी समस्या ती मांडेल अशी मला अपेक्षा होती. बहुधा प्रेम-आकर्षण याबाबतच्या संभ्रमाबद्दल ती बोलेल असे मला वाटले.
माझा अंदाज बरोबर होता. ती प्रेम-आकर्षण या भावनांबद्दलच बोलत होती. पण तिची समस्या माझ्यासाठी देखील धक्कादायक होती. ती अकरावीत असताना कोणीतरी एक व्यक्ती ऑनलाईन तिच्या संपर्कात आली. ती व्यक्ती पुण्याची होती. ही मुलगी त्या व्यक्तीत भावनिकदृष्ट्या गुंतली. त्यानंतर त्या व्यक्तीने हिला सांगितले की मला अनुभवी प्रेयसी हवी. अनुभवी याचा अर्थ पूर्वी लैंगिक संबंध केलेली. मग त्या व्यक्तीने या मुलीला वेगवेगळ्या तरुणांशी लैंगिक संबंध ठेवून त्याची व्हिडिओग्राफी करुन ते व्हिडिओ आपल्याकडे पाठवायला सांगितले. सतत तीन वर्षे ती मुलगी असे करत राहिली. या तीन वर्षांत तो व्यक्ती तिच्याशी काॅलवर बोलला, त्याने तिच्याशी चॅटिंग केले, पण तो तिला एकदाही प्रत्यक्ष भेटला नाही. तो व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ही मुलगी कळसूत्री बाहुलीसारखी वागत राहीली.
बरं, ही मुलगी अभ्यासात ‘ढ’ होती किंवा तिला इतर काही छंद- कौशल्ये नव्हती असेही नाही. दहावीला प॔चाण्णव टक्के होते. भाषणे, अभिनय, लेखन, वाचन या तिच्या आवडीच्या कला होत्या. पण तरीदेखील ती त्या व्यक्तीच्या तावडीत सापडली आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिच्याशी त्यापूर्वी कोणीही भावनिक बुद्धिमत्तेबद्दल बोलले नव्हते. आपल्या डोक्यात आपल्या नकळत दुसरा कोणीही व्यक्ती भावना निर्माण करु शकतो याबाबत तिला कोणीही सावध केले नव्हते. कोणाविषयी आकर्षण वाटू लागणे म्हणजे नेमके काय, असे आकर्षण कितीही तीव्र वाटत असले तरी त्याला एक दिवस एक्सपायरी असते, या गोष्टी तिच्याशी कोणीही बोलले नव्हते.
मला स्वतःला हे कबूल केले पाहिजे की आकर्षणाच्या बाबतीत माझा तोपर्यंतचा क्लिनिकल अनुभव इतकाच होता की एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीकडे आकर्षित होते. त्या आकर्षणाच्या प्रभावाखाली त्यांच्यात लैंगिक संबंध येतात. अनेकदा यातील एक व्यक्ती बहुधा पुरुष व्यक्ती केवळ लैंगिक अनुभव किंवा टाईमपास म्हणून दुसर्या व्यक्तीला भावनिक गुंतवतो आणि आपला कार्यभाग साधला की बेजबाबदारपणे निघून जातो. त्यानंतर त्या मुलीला भावनिक आघात सहन करावा लागतो. अर्थात हे अनेकदा उलटदेखील घडते. म्हणजे मुलीच्या डोक्यातले निघून जाते आणि मुलाला भावनिक आघात भोगावा लागतो.
पण या केसमध्ये याच्यापेक्षा वेगळे घडले होते. तिच्यात आकर्षणाची भावना निर्माण करून तिच्याकडून तिच्याच फिल्म बनवून घेण्यात आल्या होत्या. त्यापासून ती व्यक्ती एकतर विकृत आनंद घेत होती किंवा त्या फिल्म विकून पैसे मिळवत होती. हे भयानक गुन्हेगारीकरण आहे.
दुसर्या एका केसमध्ये थोडा वेगळा प्रकार घडला. सुमारे एकोणीस वर्षांची मुलगी ठरलेल्या वेळेत काॅलेजातून परत आली नाही. काॅल केले तर काॅल उचलेना. मेसेजना उत्तर देईना. विचारपूस करता कळले की ती त्यादिवशी काॅलेजात गेलीच नाही. पालकांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस मिसिंगची तक्रार नोंदवून घेत असतानाच त्या मुलीचा मेसेज आला की आपण स्वतःहून घरातील मंडळींच्या जाचाला कंटाळून जात आहोत. तिचा मोबाईल पोलीसांनी ट्रॅक करायला सुरवात केली तर तो पुण्यातील बुधवारपेठ या रेडलाईट एरीयाचे लोकेशन दाखवू लागला. पोलिसांच्या प्रयत्नांनी ती मुलगी रेस्क्यू झाली. पण तिच्याकडून मिळालेली माहिती आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे. तिच्या घरात कडक वातावरण असल्याने तिने सोशल मिडीयावर अकाऊंट उघडू नये अशी तिला घरातून सक्त ताकीद होती. त्यामुळे तिने इतक्या गोपनीय पद्धतीने फेसबुक अकाऊंट उघडले की तिच्या सख्या बहिणीलादेखील त्याची माहिती नव्हती. एक दिवस घरात काही वाद झाला. वडील तिला ओरडले. त्यादिवशी तिने फेसबुकवर पोस्ट टाकली की ‘मी डिप्रेस आहे. जवळच्या लोकांना देखील मी नकोशी आहे!’ त्याच दिवशी तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने त्याची प्रोफाईल पाहीली. एक रुबाबदार तरुण मर्सिडीजच्याजवळ उभा आहे. मागे सेवनस्टार हाॅटेल आहे. त्याने आपला व्यवसाय म्हणून डायमंड मर्चंट लिहीले आहे. तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्याने तिला सहानुभूती दर्शवणारे चॅटिंग सुरू केले. घरातील टेंशन व्यक्त करण्यासाठी एक जागा म्हणून ती चॅटिंग करु लागली. हळूहळू ती त्याच्यात गुंतली आणि ज्या दिवशी काॅलेजची फी भरायची होती, त्याच दिवशी तिला पळून येण्यास त्याने प्रवृत्त केले. फीचे पस्तीस हजार रुपये घेऊन ती गेली. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तिच्या लक्षात आले की ज्याची ती कल्पना करत होती त्यापेक्षा भयंकर वेगळेच चित्र समोर होते. सुदैवाने ती सुटली. पण या घटनेतून समजून घेण्याची गोष्ट म्हणजे तुमच्या सोशल मिडीया अकाऊंटवर लक्ष ठेवून असणारी माणसे आहेत. तुम्ही त्यांच्या पुढ्यात तुमचा मेंटल स्टेटस उघडा करणे हे धोक्याचे आहे, नव्हे तो निव्वळ मूर्खपणा आहे. तुमच्या कमजोरी टिपल्या जाऊन, तुम्हाला कनेक्ट होणे, भावनिक गुंतवणे, तुमच्या हितसंबंधीयांपासून तुम्हाला मानसिक पातळीवर दूर करणे, तुमच्या वतीने निर्णय घेणे आणि एक दिवस तुम्हाला घर सोडून यायला प्रवृत्त करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे.
हे टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे कोणाही पाल्याच्या बाबतीत घडू शकते याचा स्वीकार आणि त्याबाबत मुलांना सावध करणे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांना भावना ओळखायला शिकवणे. प्रेम म्हणजे काय? आकर्षण म्हणजे काय? वासना म्हणजे काय? हे ओळखायला शिकवणे. यावर कधीही घरात किंवा शाळेत निरोगी चर्चा होत नाही. ती व्हायला पाहीजे. या तिन्ही भावना भिन्न भावना आहेत. त्यांना एकच समजण्याची गल्लत होऊ शकते. या भावना वाटणे हा गुन्हा नाही. पण आपण बेसावध राहिल्यास याचा मानसिक आघात भोगावा लागू शकतो. आणि दुसरा उदाहरणात दिसल्याप्रमाणे तुम्हाला विकले जाऊ शकते. म्हणून पालक व शिक्षकांनी मुलांशी बोलले पाहिजे. अर्थात यासाठी पालक शिक्षकांनी असे कौशल्य विकसित केले पाहिजे की तुमचे सांगणे मुलांना उपदेशाचा डोस न वाटता, आवश्यक गोष्ट वाटली पाहिजे. मुलांनी स्वतःहून मोठ्यांशी अशा भावनांबद्दल बोलावे यासाठी मोठ्यांनी अवकाश ठेवला पाहीजे. दरारा ठेवून या गोष्टी मुलांना बोलूच देण्यात आल्या नाहीत तर लपवून ठेवण्याच्या प्रयत्नात आपले पाल्य भलत्याच संकटात पडू शकते याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
आजच्या काळातील आव्हाने पूर्वीच्या काळापेक्षा वेगळी आहेत. पूर्वी देखील प्रेम, आकर्षण, वासना या भावना होत्या. कुमारवयात त्यांचा उद्भव होई. पण त्याकाळात तुमच्याशी कोण संपर्क करेल याला मर्यादा होत्या. आता जगाच्या पाठीवरची कोणीही व्यक्ती तुमच्या नकळत तुमच्या पाल्याच्या संपर्कात येऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. कालचे पालकत्व तुलनेने सोपे होते. एकत्र कुटुंबामुळे एखाद्या पालकाची पालकत्वाची कौशल्ये कमी पडली तर घरातील इतरजण ती उणीव भरून काढीत. शिवाय सामुहिक पालकत्वाची जाणीव देखील होती. वाड्यावरील, गावातील इतर जेष्ठ मंडळी कोणाही मुलासाठी पालकत्वाची भूमिका बजावत. आता हे एका बाजूला नष्ट होतेय तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या घुसखोरीमुळे आव्हान वाढले आहे. असे असले तरीही यावर मात करता येणे शक्य आहे, त्यासाठी थोडासा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पालकत्व ही जबाबदारी न मानता ती पालकाच्या व्यक्तीमत्वाला विकसित करणारी गोष्ट म्हणून पाहिले तर पालकत्व निभावणे हेदेखील जाॅयफूल होईल!
– डाॅ.रुपेश पाटकर






