येत्या दोन दिवसांत महत्त्वपूर्ण बैठकीची शक्यता
————————————————————–
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आघाडीच्या चर्चेला गती देण्याचे निर्देश दिल्यानंतर गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षासोबतच्या संभाव्य युतीच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता असून, आघाडीबाबत लवकरच ठोस निर्णय होण्याचे संकेत काँग्रेसच्या सूत्रांनी दिले आहेत.
काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४० मतदारसंघांतून इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले असून, या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत आघाडीच्या चर्चेला ठोस दिशा देण्याच्या दृष्टीने पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही आघाडीबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांना मतदारसंघात घरोघरी संपर्क, बैठका आणि सभांच्या माध्यमातून प्रचाराची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मात्र, काँग्रेसने उमेदवारी निश्चित करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारांची नावे आधीच जाहीर केल्यास भाजपकडून राजकीय फोडाफोडीचे प्रयत्न होण्याची शक्यता पक्षाला वाटत आहे. त्यामुळे आघाडी आणि जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करताना उमेदवारी निश्चितीबाबतही काळजीपूर्वक पावले टाकली जात आहेत.
आरजीपीतील अंतर्गत वादामुळे पेच
दुसरीकडे, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे आघाडीच्या चर्चेत नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षात दोन गट निर्माण झाल्याची परिस्थिती असून, काँग्रेसचा कल आमदार वीरेश बोरकर यांच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा नेमकी कोणाशी करायची, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा राहिला आहे.
आरजीपीची अधिकृत नेतृत्वाची धुरा नेमकी कोणाकडे राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने या पक्षासोबतच्या चर्चेला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस-गोवा फॉरवर्ड यांच्यातील आघाडीची चर्चा वेग घेण्याची चिन्हे असली, तरी आरजीपीतील अंतर्गत वादाचा गुंता सुटल्याशिवाय व्यापक विरोधी आघाडीचे चित्र स्पष्ट होणे कठीण आहे. आगामी दोन दिवसांतील बैठक या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.






