करापूर-सर्वणच्या प्रश्नावर सरकार कोणती भूमिका घेते, यावरून गोव्याच्या विकासात गावांना किती स्थान आहे, हे दिसून येईल.
———————
– जॉन आगियार
डिचोली तालुक्यातील करापूर-सर्वण येथे ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (एचओएबीएल) या कंपनीच्या प्रस्तावित ‘वन गोवा’ टाऊनशिपवरून गोव्याच्या विकासाची दिशा पुन्हा चर्चेत आली आहे. ग्रामस्थांचे दीर्घ आंदोलन, पर्यावरणाविषयी त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि सुरू असलेली न्यायालयीन प्रक्रिया या पार्श्वभूमीवर सरकारने एका मूलभूत प्रश्नाला सामोरे जायला हवे. मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी देताना गावांचे पाणी, शेती, पारंपरिक रस्ते आणि पायाभूत सुविधांची क्षमता यांचा किती विचार केला जातो?
ग्रामस्थांनी मांडलेल्या चिंता त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. पिढ्यान्पिढ्या वापरात असलेले ये-जा करण्याचे मार्ग खुले राहतील का? प्रकल्पाचा शेती आणि भूजलसाठ्यांवर काय परिणाम होईल? वाढीव वाहतूक आणि सांडपाण्याचा भार पेलण्याची क्षमता परिसरात आहे का? या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय अभ्यासातून मिळाली पाहिजेत आणि त्याचे निष्कर्ष ग्रामस्थांसमोर खुलेपणाने मांडले पाहिजेत.
ग्रामस्थांनी १६१ दिवस आंदोलन केले. ग्रामपंचायतीने ११ सप्टेंबर २०२६ रोजी काम थांबविण्याची नोटीस बजावल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. विकासकाने आवश्यक परवानग्या मिळवल्याचा दावा केला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक आणि बांधकाम परवान्यांना अंतरिम स्थगीती दिल्यामुळे आता हा विषय अधिक गंभीर बनला आहे.
प्रकल्पासाठी पूर्व पर्यावरणीय मंजुरी आवश्यक होती का, हा प्रश्न उपस्थित करणारा अर्ज राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दाखल करून घेतला आहे. नगर आणि नियोजन खात्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाची व्याप्तीही अचूकपणे समजून घेणे आवश्यक आहे. त्या आदेशावरून ‘वन गोवा’ प्रकल्पाचे काम तूर्त स्थगीत राहणार आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सरकारने आपल्या अधिकारक्षेत्रातील प्रश्नांची तपासणी करावी. प्रकल्पाला कोणत्या परवानग्या दिल्या, त्या कोणत्या जमीन वर्गीकरणाच्या आधारे दिल्या आणि त्यातील पर्यावरणीय अटींची पूर्तता कशी तपासली जाते, याची माहिती सार्वजनिक करावी. पारंपरिक रस्ते, पाण्याचे स्रोत आणि गावाच्या विद्यमान सुविधांवर प्रकल्पाचा किती भार पडेल, याचाही आढावा घ्यावा. प्रकल्प सर्व वैधानिक अटी पूर्ण करत असेल, तर विकासकाला कायद्यानुसार पुढे जाण्याचा अधिकार आहे. एखादी परवानगी नियमांच्या विरोधात दिल्याचे आढळल्यास सरकारने नियमानुसार दुरुस्तीची कारवाई करावी.
करापूर-सर्वणचा अनुभव गोव्यातील मोठ्या टाऊनशिप प्रकल्पांच्या मंजुरी प्रक्रियेचा फेरविचार करण्याची संधी देतो. पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करताना गावांची प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेतली पाहिजे. जनसुनावणीत ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना संबंधित खात्यांकडून स्पष्ट उत्तरे मिळाली पाहिजेत. प्रकल्पाला लागणारे पाणी कुठून येणार, सांडपाण्याची व्यवस्था कशी होणार आणि वाढीव वाहतुकीसाठी रस्ते पुरेसे आहेत का, याचा हिशेब मंजुरीपूर्वीच मांडला पाहिजे.
गावांची ओळख तिथल्या जमिनीशी, उपजीविकेशी आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या परंपरांशी जोडलेली असते. शेतीकडे जाणारी वाट बंद झाली किंवा पाण्याच्या स्रोतावर ताण वाढला, तर त्याची किंमत ग्रामस्थांना रोज चुकवावी लागते. गुंतवणुकीचा विचार करताना हा परिणामही सरकारने निर्णयात धरला पाहिजे. विकासकांनी पर्यावरणीय अटींचे पालन कृतीतून दाखवावे आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे द्यावीत.
प्रगतीचा हिशेब मांडताना किती टाऊनशिप उभ्या राहिल्या यापेक्षा स्थानिकांचे जीवनमान किती सुधारले आणि पुढच्या पिढ्यांसाठी किती नैसर्गिक वारसा जपला, या निकषांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. करापूर-सर्वणच्या प्रश्नावर सरकार कोणती भूमिका घेते, यावरून गोव्याच्या विकासात गावांना किती स्थान आहे, हे दिसून येईल.






