अभिनंदन लोढा समुहाकडून जोरदार जाहीरातबाजी
पणजी,दि.२६(प्रतिनिधी)
कारापूर साखळी येथे ४.५ लाख चौरसमीटर जागेत अभिनंदन लोढा समुहातर्फे उभारण्यात येणाऱ्या पंचतारांकित प्रकल्पात मानवनिर्मित समुद्र आणि किनारा असणार आहे. या व्यतिरीक्त पंचतारांकित हॉटेल आणि अन्य पंचतारांकित सुविधाही उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची जोरदार जाहीरातबाजी सुरू आहे.
कारापूरात भूखंड तयार करण्याचे काम जोरात
राज्याचे नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या मालकीची ही जमीन त्यांनी संबंधीत कंपनीला विकली आहे. महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मालकीच्या कंपनीने ही जमीन विकत घेतल्याची माहिती विश्वजीत राणे यांनीच दिली होती. याठिकाणी पंचतारांकित नव्हे तर सर्वसामान्यांसाठी गृह प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या माहितीत म्हटले होते. वास्तविक अनेक स्थानिकांनी याठिकाणी भूखंडांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले असता हा प्रकल्प पंचतारांकित असून इथे बड्या आणि धनाढ्य मंडळींनाच जमीन विकत घेणे शक्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. कारापूरात या जमीनीत भूखंड तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. एकूणच कारापूरात आणि उत्तर गोव्यात या प्रकल्पाबाबतची उत्सुकता अनेकांना लागून राहीली आहे.
मुख्यमंत्र्यांची चुप्पी
कारापूर- सर्वण ग्रामपंचायतीने २४ तासांत या प्रकल्पासाठीचा ना हरकत दाखला दिल्यावरून बरेच वादळ उठले होते. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी या व्यवहाराचा पोलखोल करून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले होते. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण या प्रकरणाचा अभ्यास करू, असे आश्वासन दिले होते. आता या प्रकाराला बराच काळ उलटून गेला तरिही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकरणावर अजिबात भाष्य केले नसल्याने संशय बळावला आहे. एकीकडे खुद्द नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे हा सर्वसामान्यांसाठीचा गृह प्रकल्प असल्याचे सांगतात तर दुसरीकडे कंपनीकडून सुरू असलेल्या जाहीरातींकडे पाहील्यास हा पंचतारांकित प्रकल्प असल्याचे जाणवत असल्याने सरकारने नेमके याठिकाणी काय उभे राहते आहे,याची खरी खुरी माहिती जनतेसमोर ठेवावी,अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.