तुम्ही चांगले कसे वागता ?

चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यानंतर मी पाचवीत हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला ‘मराठी शाळा’ म्हणत तर हायस्कूलला ‘इंग्रजी शाळा’ म्हणत. पण ‘इंग्रजी शाळा’ असे तिला आम्ही म्हणत असलो तरी ती इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. पाचवीपासून इतर विषयांसोबत इंग्रजी भाषादेखील शिकवणे सुरू होई म्हणून ती इंग्रजी शाळा. पण चौथीपर्यंतच्या शाळेत आणि पाचवीपासूनच्या शाळेत आणखी एक महत्त्वाचा फरक होता, तो म्हणजे आमच्या पाचवीपासूनच्या शाळेत ग्रंथालय होते. दर आठवड्याला एक पुस्तक वाचायला दिले जात असे. त्यातल्या एका पुस्तकासंदर्भात घडलेला किस्सा आठवतो, पण पुस्तकाचे नाव आठवत नाही.
ते पुस्तक मी वाचायला नेले खरे, पण ते मी वाचण्याऐवजी बाबांनीच आधी वाचून काढले. त्यात अनेक गोष्टी होत्या. त्यातील एक गोष्ट होती ती कुरूक्षेत्रावरील एका कुटुंबाची!
बाबा म्हणाले, ‘कृष्णाने आपल्या भक्तांना शिकवण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग वापरले!’ हे बोलताना बाबांचे डोळे भक्तिभावाने चमकत होते. ते काही क्षण थांबले आणि म्हणाले, “त्याने अर्जुनाच्या निमीत्ताने गीता तर सांगितलीच, शिवाय भक्तांच्या पुढ्यात असंख्य उदाहरणे ठेवली. युधिष्ठिर राजाने जेव्हा राजसूय यज्ञ केला, तेव्हाची गोष्ट आहे. त्या यज्ञाच्यावेळी युधिष्ठिराने सढळ हाताने दानधर्म केला. कितीतरी गोरगरीब लोक जेवून गेले. तो सर्व विधी चालू असताना युधिष्ठिराच्या मनात विचार आला की आपणाइतका दानधर्म कधी कोणी केला नसेल. आपणासारखा असा यज्ञ कधी कोणी केला नसेल. त्याच्या अशा विचार करण्यामुळे त्याच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली. गर्व म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखण्याची भावना. दुसऱ्यांना तुच्छ मानणारी भावना. या राजसूय यज्ञात भगवान कृष्णाने उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे काम स्विकारले होते. तो जिथे या पत्रावळी नेऊन टाकत होता, तिथे एक विचित्र मुंगूस आल्याचे त्याने युधिष्ठिराला सांगितले. खरकटे टाकलेल्या ठिकाणी लोळणाऱ्या त्या मुंगूसचे अर्धे अंग सोनेरी होते. त्या मुंगूसाला पहायला युधिष्ठिर आणि इतर पांडव गोळा झाले. त्यांना तिथे पाहून ते मुंगूस माणसासारख्या आवाजात म्हणाले, ‘महाराज, इथेदेखील माझ्या पदरी निराशाच पडली!’
आधीच ते मुंगूस माणसाच्या आवाजात बोलतेय म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटलेच होते, त्यात हे कसल्या निराशेबाबत बोलतेय याचे सर्वाना कुतूहल वाटले.
‘मी सर्वश्रेष्ठ यज्ञाच्या शोधात आहे. आतापर्यंत मी अनेक यज्ञांना भेटी दिल्यात. शेवटी मोठ्या आशेने मी तुमच्या यज्ञाच्या ठिकाणी आलो. पण तुमचा यज्ञदेखील कुरूक्षेत्रावरील कुटुंबाच्या यज्ञाच्या तोडीचा ठरला नाही.’
त्याने कुरूक्षेत्रावरील यज्ञाचा उल्लेख करताच, युधिष्ठिराला आश्चर्य वाटले. तिथे असा यज्ञ झाला असेल तर त्याविषयी आपण कसे ऐकले नाही, असा त्याला प्रश्न पडला.
‘त्या यज्ञातील उष्ट्यात मी चुकून लोळलो आणि काय आश्चर्य माझं अर्ध अंग सोन्याचं झालं. तेव्हापासून मी प्रत्येक यज्ञाच्या ठिकाणी जाऊन तिथल्या उष्ट्यात लोळतो. पण आजपर्यंत माझं उरलेलं अंग सोन्याचं झालं नाही,’ ते मुंगूस म्हणाले.
असे त्या यज्ञात काय दिव्य होते, ते जाणण्याची सर्वानाच उत्कंठा लागली.
मुंगूस पुढे सांगू लागले, ‘कुरूक्षेत्राच्या परिसरात एकदा दुष्काळ पडला होता. लोक उपासमारीने मरू लागले होते. त्या काळात कुरूक्षेत्रावर एक कुटूंब रहात होते. कित्येक दिवसांपासून ते उपाशी होते. सुदैवाने त्यांना एक दिवस थोडेसे धान्य मिळाले. घरधणीनीने ते दळून त्याचे पिठ केले आणि चार भाकर्‍या केल्या. कुटुंबातले चौघेहीजण भाकरी खायला बसले, इतक्यात त्यांच्या दारावर एक भिकारी आला. एकदम थकून गेलेला, जराजर्जर झालेला भिकारी. घरधन्याने त्याला आपल्या ताटातली भाकरी वाढली. त्याने ती लगेच संपवली. पुन्हा तो आशाळभूत नजरेने पाहू लागला. घरधनीनबाईने आपल्या ताटातली भाकरी देखील त्या भिकाऱ्याला वाढली. ती देखील त्याने लगेच मटकावली. त्याची भूक अजूनही तशीच होती. तेव्हा घरातल्या मोठ्या मुलाने आपली भाकरी देखील त्या भिकाऱ्याला वाढली. लहान मुलाने देखील त्या भिकार्‍याला तृप्त करण्यासाठी आपली भाकरी त्याला दिली. त्या दिवशी ते सगळे कुटुंब उपाशीच झोपले. त्यानंतर त्यांच्या भाग्यात पुन्हा अन्न आले नाही आणि ते चौघेही उपासमारीने मरून गेले. त्या घरात जिथे पिठाचे कण पडले होते, तिथे मी योगायोगाने लोळलो, त्याने माझे अर्धे अंग सोन्याचे झाले होते.’
कृष्णाने युधिष्ठिराकडे पाहीले. आणि युधिष्ठिर समजून चुकला.”
“पण बाबा, ही काल्पनिक कथा नाही का? माणूस कितीही त्यागी असला म्हणून मुंगूसाचे अंग सोनेरी होईल का?” मी विचारले.
“तुझा मुद्दा मान्य. पण ही गोष्ट ज्याने कोणी रचली त्याला काय संदेश द्यायचा असेल? पिठाच्या कणांनी मुंगूसाचे शरीर सोनेरी होते असे सांगायचे असेल की अनोळखी वंचित माणसासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा न करणे हा सर्वश्रेष्ठ यज्ञ होय?”
“अनोळखी वंचित माणसासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा न करणे हा सर्वश्रेष्ठ यज्ञ होय, हे सांगण्यासाठी. पण बाबा असा त्याग करणे शक्य आहे का?”
“आपल्याला नसेल शक्य. आज आपल्या मनाची तेवढी तयारी झालेली नसेल. पण म्हणून त्यासाठी आदर्शाला आपल्या उंचीएवढा थोडाच बनवायचा असतो. मला झेपत नाही म्हणून आदर्शाची उंची कमी करा असे म्हणता येणार नाही. आपल्या मनाची तशी तयारी व्हावी म्हणून सतत प्रयत्न करायला हवेत.”
सतत प्रयत्न करायला हवेत हे माहीत असले तरी तसे प्रयत्न होत नाहीत. पण हे लक्षात यायला मला आणखी चार वर्षे लागली. आणि ते लक्षात आले संत एकनाथांचे चरीत्र वाचताना. नाथांना एका माणसाने एकदा प्रश्न विचारला की “तुम्ही नेहमीच चांगले वागता ते कसे? तुमच्यासारखे सतत चांगले वागायचे असे मी अनेकदा ठरवले पण अपयशी ठरलो.”
त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता नाथ म्हणाले, “माझ्या वागणूकीचे बाजूला राहू दे. मला वेगळेच काही जाणवू लागले आहे. तुमचे आयुष्य फक्त आठवडाभराचेच उरले आहे.”
तो माणूस पडलेल्या चेहर्‍याने निघून गेला. त्यानंतर सात दिवसानी नाथ त्याच्या घरी गेले. बिचारा अंथरुणावर पडून होता. नाथाना समोर पाहून तो चटकन अंथरुणातून उठून नाथांच्या पाया पडला,
नाथांनी विचारले, “आठवडा कसा गेला?”
“मृत्यू समोर दिसत असताना कसा जाणार? दुसरे काही सुचतच नाही,” तो म्हणाला.
“या आठवडय़ात तुझ्या मनात कितीदा दुसर्‍याविषयी वाईट विचार आले? कोणाशी भांडलास का? कोणाशी वाईट वागलास का?” नाथांनी विचारले.
“अजिबात नाही महाराज. उलट यापूर्वी ज्या मंडळींना दुखावले होते, त्यांची मी क्षमा मागितली. मृत्यू समोर दिसत असताना वाईट वागायचे कसे सुचेल?”
“माझ्या सतत चांगले वागण्याचे हेच रहस्य आहे. मी सतत मृत्यूची जाणीव ठेवत असतो. जन्मल्यापासून आपली घोडदौड मृत्यूच्याच दिशेने होत असते, हे वास्तव मी मनाला विसरू देत नाही!”
खरे म्हणजे जे काही आयुष्यभर करायचे ते शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणून. शेवटच्या क्षणी परमेश्वराचे चिंतन घडावे म्हणून.
गीतेच्या आठव्या अध्यायात भगवान सांगतात,
अंतकाळी हि माझे चि चित्ती स्मरण राखूनी!
देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय!!
म्हणुनि सगळा काळ मज आठव झुंज तू!
मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी!!
……….
डॉ. रुपेश पाटकर

  • Related Posts

    मायेची सावली हरपली…

    जीवनाच्या प्रवासात काही माणसे अशी असतात की, त्यांची उपस्थिती मोठ्या आवाजात कधी जाणवत नाही; पण त्यांच्या अस्तित्वामुळे संपूर्ण कुटुंब, संसार आणि अनेकांची आयुष्ये शांतपणे उजळलेली असतात. त्या स्वतः प्रकाशझोतात नसतात;…

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    पक्षनिष्ठेपेक्षा भूमीनिष्ठा मोठी मानून प्रत्येक गोमंतकीयाने एकच प्रश्न विचारला पाहिजे, खरोखर गोव्यासाठी कोण उभे आहेत ? लोकशाही केवळ निवडणुकांवर टिकत नाही. ती टिकते जबाबदारीवर, जागरूकतेवर आणि सत्तेला प्रश्न विचारण्याच्या धैर्यावर.…

    You Missed

    पुरंदरला कोट्यवधींचे पॅकेज; मोपा विमानतळ भूग्रस्तांना न्याय कधी?

    पुरंदरला कोट्यवधींचे पॅकेज; मोपा विमानतळ भूग्रस्तांना न्याय कधी?

    BJP Government Misusing Power to Silence Voices Against Corruption, Say Sherlekar Supporters

    BJP Government Misusing Power to Silence Voices Against Corruption, Say Sherlekar Supporters

    GFP Chief Vijai slams BJP Over Case Against Activist

    GFP Chief Vijai slams BJP Over Case Against Activist

    Government Orders Enquiry into Complaint Alleging Illegal Construction in Mandrem CRZ Area

    Government Orders Enquiry into Complaint Alleging Illegal Construction in Mandrem CRZ Area

    PWD Goa Refutes ₹1,000 Crore Scam Allegations; Says No Work Order Issued to Contractor

    PWD Goa Refutes ₹1,000 Crore Scam Allegations; Says No Work Order Issued to Contractor

    Private Bus Owners Urge CM to Resolve Long-Pending Demands, Raise Concerns Over Kadamba EV Buses and Poor Bus Stand Facilities

    Private Bus Owners Urge CM to Resolve Long-Pending Demands, Raise Concerns Over Kadamba EV Buses and Poor Bus Stand Facilities