धार्मिक द्वेषाचा बिमोड हवाच

एकीकडे आपले सरकार भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करत असताना भारतीय संविधानाच्या मुळ ढाच्यालाच ठेच पोहचवण्याच्या या कृतीचा वेळीच बिमोड केला नाही तर ही वृत्ती आपल्या विनाशाला आमंत्रण देणारी ठरेल हे मात्र नक्की.

पेडणे तालुक्यातील कोरगांवचे सरपंचपद अब्दुल करीम नाईक याला प्राप्त झाल्याने स्वतःला हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या काही लोकांनी मोठा गहजब सुरू केला आहे. कोरगांवच्या इतिहासात नोंद असलेल्या आणि इथल्या सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या मुस्लीम कुटुंबाचा द्वेष करून अब्दुल नाईक याच्या सरपंचपदाला पाठींबा दिलेल्या महिला आणि एक पुरूष पंचसदस्याला थेट धमकी देण्याची कृती खरोखरच निषेधार्ह म्हणावी लागेल. गोवा हिंदु युवक शक्ती संघटनेच्या नावाने काल कोरगांवात बैठकीचे आयोजन करून अब्दुल नाईक याची कसाब या दहशतवाद्याशी तुलना करण्याचे धाडस केले जाणे हे कशाचे द्योतक म्हणता येईल. अब्दुल नाईक याच्या आजोबांनी गोवा मुक्ती चळवळीत सहभाग घेतला. अगदी कदंब काळात या कुटुंबाला मान्यता आणि जमीन दिल्याचा ताम्रपट इतिहासात नोंद आहे. या व्यतिरीक्त या कुटुंबाला देवस्थानाच्या कारभारातही मान देण्यात येतो. एवढे सगळे असूनही धर्माच्या नावाने एकत्र येऊन या कुटुंबाला आणि अब्दुल नाईक याला लक्ष्य बनवण्याची ही कृती निंदनीय तर आहेच परंतु तेवढीच गंभीरही आहे. कोरगांवचे ग्रामस्थ या गोष्टीला किती महत्व देतात किंवा या अपप्रचाराच्या चक्रव्युहात फसतात हे पाहावे लागेल. राज्यात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. एकीकडे सरकारी नोकऱ्यांच्या नावाने लोकांना कोट्यवधी रूपयांचा चुना लावण्याचे प्रकार एकामागोमाग एक उघडकीस येत आहेत. गोव्याच्या जमीनींची बेसुमार रूपांतरणे सुरू आहेत. या जमीनी कुणाला विकल्या जात आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, त्याचा गोव्याच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम काय होणार, आदी गोष्टींबाबत काही मोजकेच लोक सोडले तर कुणाचा चकार शब्द नाही. भ्रष्टाचाराने डोके वर काढले आहे. राजकारणात पक्षाचे धोरण किंवा विचारधारा याचा काहीही संबंध नसलेल्या लोकांची आयात- निर्यात बिनधास्तपणे सुरू आहे. या सगळ्या गोष्टींवर तोंडावर बोट ठेवून बसलेला समाज केवळ अज्ञानातून समाजात धार्मिक तेढ निर्माण करून इथले सामाजिक वातावरण दूषीत करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर ते वेळीच हाणून पाडणे गरजेचे आहे. कोरगांवातील सभेत बोललेल्या एकाला तरी अब्दुल करीम नाईक किंवा त्याच्या कुटुंबाचा किंवा येथील मुस्लीम समाजाचा इतिहास माहित आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने करावा लागेल. तपोभूमीच्या संप्रदायाशी संबंधीत हे लोक असल्याने त्याचे गांभिर्य अधिक वाढते. तपोभूमीचे कार्य ओजस्वी आहे. व्यसनमुक्ती किंवा कौटुंबिक कलहातून जगण्याची उमेद घालवलेल्या अनेकांना तपोभूमीने आधार दिला आहे. अनेकांना अगदीच संपलेल्या अवस्थेतून उभे केले आहे. अध्यात्मिक ताकद काय असते हे तपोभूमी तथा सांप्रदायाने सिद्ध केली आहे. मानवता धर्म, प्रेम, करूणा, माया इत्यादींची शिकवण देणाऱ्या संप्रदायात हे द्वेषाचे पिक कधी उगवले, हेच कळत नाही. देशाचा शत्रू हा सगळ्यांचाच शत्रू. शत्रूला धर्म नसतो. परंतु एखाद्या धर्मालाच दहशतवादी संबोधण्याची ही कृती कितपत बरोबर आहे. एकीकडे आपले सरकार भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करत असताना भारतीय संविधानाच्या मुळ ढाच्यालाच ठेच पोहचवण्याच्या या कृतीचा वेळीच बिमोड केला नाही तर ही वृत्ती आपल्या विनाशाला आमंत्रण देणारी ठरेल हे मात्र नक्की.

  • Related Posts

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    You Missed

    15/05/2026 e-paper

    15/05/2026 e-paper

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper