गांवकारी, दि. २१ : माजी मंत्री आणि साळगांव मतदारसंघाचे माजी आमदार जयेश साळगावकर यांनी शुक्रवारी भाजपला रामराम ठोकला. पक्षाच्या सदस्यत्वासह पक्षाने दिलेली सर्व संघटनात्मक पदे आणि जबाबदाऱ्यांचा त्यांनी त्याग केला.
शुक्रवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन आपला राजीनामा औपचारिकपणे सादर केला. समर्थक, पंचसदस्य, पक्ष कार्यकर्ते आणि साळगावमधील नागरिकांकडून सक्रिय राजकारणात पुन्हा परतण्याची सातत्याने मागणी होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“माझा राजकीय प्रवास नेहमीच जनतेशी जोडलेला राहिला आहे. माझे मित्र, पंचसदस्य, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक सातत्याने साळगावला माझी पुन्हा गरज असल्याचे सांगत होते,” असे साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०२२ ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढल्यानंतर आपण हळूहळू सक्रिय राजकारणापासून दूर झालो आणि पक्षाच्या कामकाजापासून पूर्णपणे दुरावलो, असे त्यांनी सांगितले.
आपला राजकारणात परतण्याचा निर्णय वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेतून घेतलेला नसून साळगावसमोरील वाढत्या समस्यांमुळे घेतल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले. “राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. माझ्यासाठी राजकारण म्हणजे वैयक्तिक लाभ किंवा मोठे राजकीय डावपेच खेळणे नव्हे. मला अर्थपूर्ण राजकीय भूमिका बजावायची होती,” असे ते म्हणाले.
आपल्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या विकासकामांचा उल्लेख करताना त्यांनी अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचा किंवा अपेक्षित वेगाने पुढे न गेल्याचा दावा केला. “सुमारे ९७ हून अधिक कामे पाइपलाइनमध्ये होती; मात्र त्यापैकी एकही काम पुढे गेले नाही,” असा दावा त्यांनी केला. साळगावची विकासकामे पुन्हा रुळावर आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये २० एमएलडी क्षमतेच्या कच्च्या पाणी प्रक्रिया प्रकल्पाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. २०२० मध्ये तत्कालीन कळंगुट आमदार मायकल लोबो यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचा आदेशही देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
साळगावमधील वीजपुरवठ्याच्या समस्या आणि भारनियमन दूर करण्यासाठी वीज उपकेंद्र उभारण्याचा पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले. तत्कालीन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे कामही हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले. “ही कामे मी सुरू केली. विद्यमान आमदारांनी त्यातील एक-दोन कामांचे केवळ उद्घाटन केले असेल,” अशी टीका साळगावकर यांनी केली.
आपल्या कार्यकाळात सुरू केलेली काही कामे आता पूर्ण केली जात असून त्यांच्या उद्घाटनाचे श्रेय विद्यमान आमदार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. “माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला.
विद्यमान आमदार केदार नाईक यांच्या कार्यकाळात स्थानिक प्रश्नांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याची टीकाही साळगावकर यांनी केली. जनतेच्या खऱ्या प्रश्नांना राजकीय रंग दिला जाऊ नये, असे ते म्हणाले. “मी माझ्या विचारांनुसार आणि माझ्या लोकांच्या इच्छेनुसार काम करतो, जेणेकरून ते निर्भयपणे जगू शकतील,” असे त्यांनी सांगितले.
साळगावमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा सर्वांत गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. साळगाव आणि कळंगुटसाठी उभारण्यात आलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प आता जवळपास संपूर्ण गोव्यातील कचरा स्वीकारत असल्याचा दावा त्यांनी केला. “कचऱ्याच्या प्रश्नामुळे साळगावमधील नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे,” असे ते म्हणाले. दुर्गंधी, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि वाहतुकीदरम्यान होणारी लीचेटची गळती यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील डोंगरांवर वाढत असलेल्या विकासाच्या दबावाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. नो डेव्हलपमेंट झोन म्हणून निश्चित केलेल्या भागांचे रूपांतर करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामसभांमध्ये अशा प्रस्तावांना विरोध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“साळगावमध्ये सर्वप्रथम जनता आणि त्यानंतर पक्ष असला पाहिजे,” असे सांगत विकास आणि मतदारसंघाचा वारसा जतन करणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या अंतर्गत कार्यपद्धतीवरही साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्यासोबत काम करणाऱ्या आणि पक्षाला निष्ठेने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “माझ्यासोबत काम करणाऱ्या, त्यात निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचाही समावेश आहे, त्यांना पूर्णपणे बाजूला करण्यात आले,” असे ते म्हणाले. यामुळेच पर्यायी राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डिसेंबर २०२१ मध्ये गोवा फॉरवर्ड पक्ष सोडून साळगावकर भाजपमध्ये दाखल झाले होते. २०२२ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर साळगावमधून विधानसभा निवडणूक लढवली; मात्र त्यांचा केदार नाईक यांनी पराभव केला. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या नाईक यांनी साळगावकरांचा १,८९९ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर नाईक भाजपमध्ये दाखल झाले.
भाजपच्या तिकिटावर २०२२ ची निवडणूक लढविणे ही चूक होती का, असे विचारले असता साळगावकर यांनी सांगितले की, भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी काम केले होते; मात्र त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
माजी मंत्री दिलीप परुळेकर हेही साळगावमधून भाजपच्या तिकिटासाठी संभाव्य दावेदार असल्याबाबत विचारले असता साळगावकर म्हणाले की, परुळेकर यांचा स्वतःचा मतदारवर्ग आहे आणि त्यामुळे ते पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करणार हे स्वाभाविक आहे.
मात्र आपला राजीनामा भाजपच्या आगामी उमेदवारीच्या निर्णयाशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “तिकीट हा वेळेचा विषय आहे. पक्षाने अद्याप तिकिटांबाबत निर्णय घेतलेला नाही. तिकिटांबाबत कोणताही निर्णय होण्याच्या खूप आधी मी राजीनामा दिला आहे,” असे ते म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्षासह अन्य कोणत्याही पक्षात तातडीने प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. सध्या मतदारांशी पुन्हा संपर्क वाढविण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. “माझी पुढील पायरी म्हणजे घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला भेटणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांच्यासाठी काम करणे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२७ ची विधानसभा निवडणूक लढणार का, असा थेट प्रश्न विचारला असता साळगावकर यांनी, “होय, ११० टक्के,” असे उत्तर दिले. मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत त्यांनी “पक्ष नंतर ठरवू,” असे सांगितले.





