म्हापसा, दि. १२: म्हापशातील पारंपरिक गणेश विसर्जन स्थळाची स्वच्छता आणि गाळ काढण्याचे काम अखेर जलसंपदा विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ‘टुगेदर फॉर म्हापसा’ने या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून मुख्य अभियंत्याला आवश्यक काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस जितेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
गणेश विसर्जनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्थळाकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्या उदासीनतेमुळे दरवर्षी चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांनी आवाज उठवल्यानंतरच साफसफाई आणि गाळ उपसा केला जात असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
यंदा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचला होता. जुन्या पुलाचे काँक्रीटचे मोठे तुकडेही नदीपात्रात पडून असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. पाण्याची पातळी कमी असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळी मूर्ती व्यवस्थित विसर्जित होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेबरोबरच धार्मिक भावना आणि विसर्जन स्थळाचे पावित्र्य यांचाही प्रश्न निर्माण झाला होता, असे संघटनेने म्हटले आहे.
या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांच्या पुढाकारातून ‘टुगेदर फॉर म्हापसा’ने जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी तातडीने दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छता व पुनरुज्जीवनाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. याबद्दल संघटनेने शिरोडकर यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, शेखर नाईक यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे विसर्जन स्थळाची दुरवस्था प्रभावीपणे समोर आली आणि प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले, असेही कामत यांनी म्हटले आहे.
‘टुगेदर फॉर म्हापसा’चे अध्यक्ष महेश राणे, उपाध्यक्ष विजय भिके, सरचिटणीस जितेश कामत, चिटणीस योगेश केळकर, खजिनदार राजेश मराठे आणि कार्यकारी सदस्य सुशांत पावसकर यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
म्हापशाच्या धार्मिक परंपरा आणि वारशाशी निगडित असलेल्या अशा महत्त्वाच्या स्थळांची देखभाल केवळ उत्सवाच्या तोंडावर न करता वर्षभर नियमितपणे व्हावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच परंपरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय प्रतिनिधींवर टीका करत, या प्रश्नासाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिक आणि अधिकाऱ्यांचे ‘टुगेदर फॉर म्हापसा’ने अभिनंदन केले आहे.





