प्रिय गणराया,
आज पुन्हा तू आमच्या अंगणात आलास. ढोल – ताशांचा गजर आहे, घुमटांच्या आरत्यांचा निनाद आहे, घराघरांत तुझ्या आगमनाचा आनंद आहे. तुझ्या चरणी फुले वाहिली जात आहेत, मोदकांचा नैवेद्य दाखविला जात आहे. तुझ्या स्वागतासाठी गोमंतकीय माणूस मनापासून सजला आहे.
पण बाप्पा… या आनंदाच्या वातावरणात माझ्या मनात एक प्रश्न सतत घोंघावत आहे. आपला गोवा नेमका कुठे चालला आहे?
म्हणून यंदा तुझ्याकडे माझी याचना वेगळी आहे.
मला माझ्यासाठी काही नको. माझ्या घरासाठी काही नको. माझ्या सुखासाठी काही नको.
फक्त गोवा वाचविण्याची बुद्धी गोमंतकीयांच्या मनात जागव, बाप्पा!
विकास हवा, पण विकासाच्या नावाखाली आमच्या मातीचा विनाश नको. रस्ते हवेत, पूल हवेत, उद्योग हवेत, रोजगार हवेत; पण त्यासाठी आमची शेती, बागायती, डोंगर, नद्या, झरे, खाजन जमीन आणि गावांची ओळखच नष्ट होणार असेल, तर असा विकास कोणासाठी?
आज जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.
जमीन विकली जाते आहे. जमिनीचे व्यवहार होत आहेत. गावांचे चेहरे बदलत आहेत. कालपर्यंत ज्या मातीत आमच्या पूर्वजांचे घामाचे थेंब पडले, त्याच मातीवर आज काँक्रीटचे साम्राज्य उभे करण्याची स्पर्धा सुरू आहे.
बाप्पा, आम्हाला एवढी तरी बुद्धी दे की जमीन ही केवळ विक्रीची वस्तू नाही, तर ती आमच्या अस्तित्वाची आई आहे, हे आम्हाला समजावे.
काही जण जमिनीच्या व्यवहारातून पैसा कमावतात. तोच पैसा पुन्हा राजकारणात ओततात. पैशाच्या बळावर सत्ता मिळवतात, सत्ता वापरून आपले व्यवसाय वाढवतात आणि सामान्य माणसाला आपल्या राजकीय-आर्थिक जाळ्यात अडकवतात.
लोकशाहीत नागरिक मालक असतो,
पण पैशाच्या राजकारणात नागरिक मतदारापासून गुलाम बनतो.
गणराया, अशा गुलामगिरीविरुद्ध उभे राहण्याची बुद्धी आम्हाला दे!
पैशाची ताकद आणि सत्तेची ताकद यांच्यात फरक ओळखण्याची दृष्टी दे. कोण गोव्याच्या नावाने बोलतो आणि कोण गोव्याच्या जमिनीच्या नावावर स्वतःचे साम्राज्य उभारत आहे, हे ओळखण्याची विवेकबुद्धी दे.
ज्यांनी गोव्याच्या मातीचे सौदे केले,
ज्यांनी पर्यावरणाच्या किंमतीवर आपली संपत्ती वाढवली,
ज्यांनी राजकारणाला व्यवसायाचे साधन बनवले,
ज्यांनी जनतेच्या मताला आपल्या स्वार्थाची शिडी बनवले—
त्यांना ओळखण्याचे धैर्य गोमंतकीय जनतेला दे, बाप्पा !
त्यांच्या जाहिरातींपलीकडे पाहण्याची नजर दे. त्यांच्या गोड भाषणांपलीकडे त्यांची कृती पाहण्याची बुद्धी दे. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी मिळणाऱ्या आश्वासनांपेक्षा मागील वर्षांची कामगिरी तपासण्याची सवय दे.
बाप्पा,
आज आमच्या गोव्याच्या डोंगरांना जखमा आहेत.
नद्यांचे पाणी अस्वस्थ आहे.
शेतीच्या जमिनीवर काँक्रीट चढत आहे.
बागायती कमी होत आहेत.
गावांचे स्वरूप बदलत आहे.
वाहतूक कोंडी वाढत आहे.
कचऱ्याचे प्रश्न कायम आहेत.
तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
एका बाजूला प्रचंड प्रकल्पांची घोषणा होते आणि दुसऱ्या बाजूला सामान्य गोमंतकीय आपल्या भविष्यासाठी संघर्ष करतो.
हा विरोधाभास समजून घेण्याची बुद्धी दे, गणराया!
आमच्या तरुणांना केवळ नोकरीच्या शोधात गोवा सोडावा लागू नये. त्यांना आपल्या मातीत भविष्य दिसावे. त्यांना आपल्या गावाचा अभिमान वाटावा. आपल्या जमिनीचे रक्षण करणे हे मागासलेपण नसून आधुनिक गोमंतकीयपणाची जबाबदारी आहे, हे त्यांना समजावे.
गोव्याच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक युवकाच्या मनात आपल्या भूमीचे रक्षण करण्याची ज्वाला पेटू दे!
ज्येष्ठांनी अनुभव द्यावा, तरुणांनी नेतृत्व घ्यावे.
महिलांनी आवाज उठवावा.
ग्रामस्थांनी प्रश्न विचारावेत.
शेतकऱ्यांनी आपली जमीन जपावी.
नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारावा.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे
गोमंतकीयांनी पक्षांपेक्षा गोव्याला मोठे मानावे.
बाप्पा, आम्हाला अशी बुद्धी दे की निवडणुकीच्या वेळी जात, धर्म, पैसा, भीती, आमिष किंवा व्यक्तिगत स्वार्थ यापेक्षा गोव्याचे भवितव्य आमच्या मतदानाचा आधार बनेल.
सत्ता कोणाचीही असो;
गोवा कोणाचाही खासगी मालमत्ता होऊ नये.
राजकीय पक्ष कोणताही असो;
गोव्याच्या मातीशी तडजोड करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धैर्य जनतेत राहू दे.
बाप्पा,
आज तुला मोदक अर्पण करताना माझ्या मनात एकच प्रार्थना आहे—
आमच्या हातातील मोबाइलपेक्षा आमच्या हातातील मताची ताकद आम्हाला जाणवू दे.
सोशल मीडियावरील चर्चेपेक्षा गावातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे कळू दे.
क्षणिक फायद्यापेक्षा पुढच्या पिढीचे भविष्य महत्त्वाचे आहे, हे उमजू दे.
आज जमीन विकून मिळणाऱ्या पैशापेक्षा उद्या मुलांना मिळणारा सुरक्षित, हिरवा आणि स्वाभिमानी गोवा अधिक मौल्यवान आहे, हे प्रत्येक गोमंतकीयाला जाणवू दे.
गणराया, विघ्नहर्ता म्हणून येतोस ना तू?
मग गोव्याच्या वाटेतील ही सर्वांत मोठी विघ्ने दूर कर, अज्ञानाचे, स्वार्थाचे, पैशाच्या राजकारणाचे आणि मौनाचे!
गोव्याला केवळ विकासाची नाही,
दिशेची गरज आहे.
गोव्याला केवळ मोठ्या प्रकल्पांची नाही,
सुज्ञ निर्णयांची गरज आहे.
गोव्याला केवळ नेत्यांची नाही,
जागरूक नागरिकांची गरज आहे.
आणि त्या जागृतीची सुरुवात आज तुझ्या चरणी होऊ दे.
प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात एक प्रश्न जागा होऊ दे
“आपण पुढच्या पिढीला नेमका कोणता गोवा देणार आहोत?”
तो प्रश्न विचारण्याची बुद्धी दे.
त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे धैर्य दे.
आणि गोवा वाचविण्यासाठी स्वतः पुढे येण्याची शक्ती दे.
गणपती बाप्पा,
तू आमच्या घरात आलास, आता गोव्याच्या मनात ये.
तुझी मूर्ती आम्ही दीड, पाच, सात, नऊ, अकरा, एकवीस दिवस पूजतो;
पण तुझी शिकवण वर्षभर जगण्याची बुद्धी दे.
गोव्याच्या मातीचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक हाताला बळ दे.
सत्यासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक आवाजाला ताकद दे.
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक तरुणाला धैर्य दे.
आणि स्वार्थाच्या राजकारणापुढे न झुकणारा स्वाभिमानी गोमंतकीय घडव.
कारण बाप्पा,
गोवा वाचवायचा असेल तर चमत्काराची नाही,
गोमंतकीयांच्या जागृत बुद्धीची गरज आहे.
म्हणूनच यंदा तुझ्या चरणी शेवटची एकच हाक
गणा धाव रे…
गोव्याला पाव रे…!
गोव्याला वाचविण्याची बुद्धी दे रे बाप्पा…
गोव्याच्या भवितव्यासाठी लढण्याचे धैर्य दे रे बाप्पा…
आणि गोव्याला विक्रीची वस्तू नव्हे,
तर पुढच्या पिढ्यांची अमूल्य मातृभूमी मानण्याची जाणीव दे रे बाप्पा!
गणपती बाप्पा मोरया!
गोमंतकीयांचा गोवा राख रे मोरया!
मी गांवकार…





