बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश
————————
गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) : सासष्टी तालुक्यातील केळशी येथील किनारपट्टीवरील एका मालमत्तेत वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांचा कथित विध्वंस करून सुरू असलेल्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तात्काळ स्थगिती दिली आहे. किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करून वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
मेसर्स ॲशफोर्ड एससीडीसी रिसॉर्ट्स एलएलपी विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी संबंधित मालमत्तेवरील सर्व बांधकामे आणि अन्य कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना बांधकामस्थळ सुरक्षित ठेवण्याचे तसेच तेथे अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात स्थानिक पंचायतीने बांधकाम परवाना रद्द केला असून गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. या दोन्ही निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
किनारपट्टीवरील नैसर्गिक वाळूच्या टेकड्या पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण आणि किनारी परिसंस्थेचे संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे अशा टेकड्यांच्या कथित विध्वंसाचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे ठरते.
ही जमीन सर्वे क्रमांक ९९/२-ई अंतर्गत येत असून तिचे क्षेत्रफळ सुमारे २२,८८५ चौरस मीटर आहे. अरबी समुद्र आणि साळ नदीदरम्यान असलेली ही मालमत्ता सीआरझेडच्या विविध प्रतिबंधित क्षेत्रांत येते. संबंधित कंपनीला मार्च ते मे २०२६ दरम्यान काही परवानग्या देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या प्रामुख्याने कुंपण आणि संरक्षक भिंतीपुरत्याच मर्यादित असल्याचे समोर आले आहे.
आयरिस पासान्हा आणि शाल्टन फर्नांडिस यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत कंपनीने परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून नैसर्गिक वाळूच्या टेकड्यांचे सपाटीकरण केल्याचा आरोप केला आहे. याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या छायाचित्रांची दखल घेत न्यायालयाने प्रथमदर्शनी नियमभंग झाल्याचे निरीक्षण नोंदवले.
दरम्यान, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबर रोजी स्थळाची पाहणी केली होती. मात्र, काम बंद करण्याची नोटीस ३ नोव्हेंबर रोजी बजावण्यात आल्याने कारवाईतील विलंबावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काँग्रेस आणि बजरंग दलाचे नाते काय ?
मेसर्स ॲशफोर्ड एससीडीसी रिसॉर्ट्स एलएलपी या कंपनीचे संचालक काँग्रेस नेते प्रशांत देशपांडे आहेत. कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आर.व्ही.देशपांडे यांचे ते पुत्र. मग काँग्रेस नेत्याकडून केळशी येथे या प्रकल्पाच्या कुंपणाचे काम गोवा बजरंग दलाचे निमंत्रक विराज देसाई यांना कसे काय मिळाले,असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सोहेल फुर्तादो यांनी केला. बजरंग दलाच्या प्रमुखाला हे काम दिल्यानंतर सरकारकडून अडथळा येणार नाही या इराद्याने हे कंत्राट दिले होते काय,असाही सवाल त्यांनी केला आहे.





