भाजयुमो इथे लक्ष द्या !

मद्य, कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्स ही आपल्या पर्यटनाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तर मग नशामुक्तीचा निर्धार आपल्याला खरोखरच परवडणारा आहे का, याचे उत्तर भाजयुमोला शोधावे लागेल.

ढोंगी आदर्शवादी संकल्पनांचा प्रचार करून प्रत्यक्षात त्याच्या उलट धोरणे आणि कृती राबवण्याची राजकारणाची अलिकडच्या काळातील पद्धतच बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील भाजप पक्ष आणि सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्याची घोषणा भाजयुमोचे अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी केली. डिचोली येथे रविवार, २१ रोजी ‘नमो युवा रन’ आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेचा प्रसार करणे आणि तंदुरुस्तीबाबत जागृती घडवणे हा आहे. वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर युवकांना सकारात्मक जीवनशैलीकडे वळविणे व समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे, असेही सांगण्यात आले.
भाजयुमोच्या या संकल्पनेचे कौतुकच करावे लागेल. ही संकल्पना आदर्शवादी आहे, परंतु राज्यात १२ वर्षे आणि देशात १४ वर्षे भाजपचेच सरकार सत्तेवर असताना या संकल्पनेच्या विरोधातच सरकारची धोरणे आणि कृती सुरू आहेत, याकडे या युवकांचे लक्ष वेधावे लागेल. ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणता म्हणता आजच्या गोव्यात भाजपची परिस्थिती ‘काँग्रेसयुक्त’ जशी झाली आहे, तसेच ‘नशामुक्त भारत’ ही संकल्पना गोव्यात ‘नशायुक्त’ बनली आहे. ‘नशामुक्त’ ही संकल्पनाच गोव्याच्या आर्थिक नीतीला हादरवणारी आहे. मद्य, कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्स ही आपल्या पर्यटनाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. तर मग नशामुक्तीचा निर्धार आपल्याला खरोखरच परवडणारा आहे का, याचे उत्तर भाजयुमोला शोधावे लागेल.
भाजपला राज्यातील त्यांच्या २०१२ पासूनच्या राजवटीचेच दाखले देऊन नशामुक्तीचे कसे धिंडवडे सुरू आहेत, ते पाहता येतील. २०१२ मध्ये राज्यातील एकूण मद्यालये व मद्यविक्री केंद्रांची संख्या सुमारे ७ हजार होती. आत्ता हा आकडा सुमारे ११ हजारांपर्यंत पोहोचला आहे. २०१९-२० या काळात अबकारी महसूल ४९१.८३ कोटी होता, तो आता २०२३-२४ मध्ये ९०० कोटींवर पोहोचला आहे.
तंदुरुस्तीचीच गोष्ट करायची झाली, तर राज्यात युवकांमध्ये मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. दररोज १० ते १२ लोक हृदयविकाराशी संबंधित मृत्यू पावत आहेत. मद्य, ड्रग्स आदी व्यसनांमुळे वर्षाकाठी सुमारे ३०० लोकांचा मृत्यू होतो. जीएमसीमध्ये दररोज १५ ते २० लोक केवळ मद्याशी निगडीत आजारांमुळे निधन पावतात. जीएमसी आणि मानसोपचार इस्पितळात दररोज ५ ते ६ व्यसनाधीनतेमुळे गंभीर अवस्थेतील रुग्ण दाखल होत असतात.
मद्यपी चालकांमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. वर्षाकाठी सरासरी २५० ते ३०० लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात, त्यात मद्यपींचा मोठा वाटा आहे. युवकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. वर्षाकाठी सुमारे ३०० लोक आत्महत्या करतात, आणि त्यात १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींचा समावेश अधिक आहे. ड्रग्स सेवनाची दिवसाला ५ ते ७ प्रकरणे सरकारी इस्पितळांत दाखल होतात. राज्यात ड्रग्स जप्त करण्याचे प्रमाण वाढले असून, यंदा जानेवारी ते एप्रिल या फक्त चार महिन्यांतच ६८ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
भाजयुमोचे नेते पक्ष सत्तेत असताना कुठेच दिसत नाहीत. ‘कॅश फॉर जॉब’चा घोटाळा सुरू असताना आणि राज्यातील शेकडो युवक-युवतींना कोट्यवधी रुपयांची टोपी घालून फसवणूक झाली असताना मोर्चाचे नेते कुठे लपून बसले होते?
किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तरी ढोंगी संकल्पना राबवण्याचे पक्षाने सोडून द्यावे. ‘नशामुक्त भारत’ आणि ‘तंदुरुस्त युवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी रस्त्यावर नव्हे, तर स्वपक्षाच्या नेत्यांच्या घरीच धावा करा. मगच काहीतरी बदल घडू शकेल.

  • Related Posts

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    उटाचा मेळावा कारापूरात का नको ?

    मेळावा क्रांती मैदानावर का, कारापूरच्या आंदोलनस्थळी का नाही? हा प्रश्न उटा संघटनेच्या नेतृत्वाला समाजबांधवांनी विचारला पाहिजे. उटा संघटनेचा नियोजित आझाद मैदानावरील मेळावा आता म्हार्दोळ येथील क्रांती मैदानावर होणार आहे. राजकीय…

    You Missed

    13/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 13, 2026
    • 11 views
    13/08/2026 e-paper

    रोजगार: आभास आणि वास्तव

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 13, 2026
    • 11 views
    रोजगार: आभास आणि वास्तव

    वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 13, 2026
    • 11 views
    वेळसाव रेल्वे दुपदरीकरण चिघळले

    GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 15 views
    GOA CONGRESS LEADERS MEET K.C. VENUGOPAL IN DELHI; DISCUSS ORGANISATIONAL STRENGTHENING AND PREPARATIONS FOR KHARGE’S GOA VISIT

    12/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 37 views
    12/08/2026 e-paper

    “आज नाही तर कधीच नाही”

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 18 views
    “आज नाही तर कधीच नाही”