काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार?

भाजपने सर्वांत मोठी खेळी केली ती म्हणजे काँग्रेस पक्षात आपले हेर पाठवले. काँग्रेसनेही ते स्वीकारले आणि त्यांच्याकडे पदेही बहाल केली.

राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत राहीलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था खूपच बिकट बनली आहे. फक्त तीन आमदार विधानसभेत राहीलेल्या या पक्षाला खरोखरच नवसंजिवनी मिळणार काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशात आणि राज्यातही सर्वाधिक काळ सत्तेत राहीलेला पक्ष अजूनही आपल्या भूतकाळातील वैभवाची स्वप्ने पाहत आहे. भाजपने वेळोवेळी स्वतःमध्ये जी लवचिकता प्राप्त केली ती लवचिकता काँग्रेस पक्षाला आत्मसात करणे गरजेचे आहे. कधीकाळी हिंदूत्ववादी पक्ष आणि अजूनही तोच अजेंडा प्रखरपणे पुढे नेणारा पक्ष असूनही गोव्यातील अल्पसंख्यांक आमदार भाजपला सत्तेसाठी चिकटताना अजिबात डगमगत नाही, यावरून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. अलिकडेच पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि सहप्रभारी डॉ.अंजली निंबाळकर यांनी प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीला हजेरी लावली. परंपरेप्रमाणे ही बैठक वादळी झाली. या बैठकीत अनेकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले. हे काँग्रेससाठी नवीन निश्चितच नाही परंतु सध्याची परिस्थिती पाहता या गोष्टी पक्षासाठी हानीकारक ठरणार आहेत, हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे युवा आहेत. त्यांच्यात जिद्ध आहे आणि काम करण्याची प्रचंड तयारी आहे. परंतु ते पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि यापूर्वीच्या कार्यात नसल्याने त्यांना अनेकजण नवखे मानतात. पक्षात आपले योगदान आणि त्याग याचा हिशेब करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. पक्षासाठीच्या योगदानाचा आणि त्यागाचा हिशेब हा मुळ भाजप कार्यकर्त्यांना विचाराल तर त्याचे योग्य उत्तर त्यांना मिळू शकेल. भाजपने सर्वांत मोठी खेळी केली ती म्हणजे काँग्रेस पक्षात आपले हेर पाठवले. काँग्रेसनेही ते स्वीकारले आणि त्यांच्याकडे पदेही बहाल केली. या हेरांमार्फत पक्षाच्या सगळ्या गोष्टी भाजपकडे पोहचायला मदत होत होती. आता देखील पक्षात एकमेकांवर भाजपचे हेर असल्याचे आरोप केले जातात. हे आरोप आमदारांवरही होतात, इथपर्यंत त्यांची पत उतरली आहे. अशा या परिस्थितीत अंतर्गत कलह आणि कुरघोडी यामुळे पक्ष पुन्हा उभारी कसा का घेऊ शकेल हा चिंतेचा प्रश्न आहे.
गेली चौदा वर्षे राज्य करणाऱ्या भाजपकडून अनेक चुका घडत आहेत. अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारविरोधात वातावरण तयार करण्यासाठी पोषक वातावरण असतानाही त्याचा फायदा घेण्यात काँग्रेस कमी पडत आहे. अर्थात विरोधात फक्त ७ आमदार आणि त्यात काँग्रेसचे फक्त ३ आमदार असल्याने संघटनेच्या उभारणीला पर्याय नाही. कागदोपत्री पदाधिकाऱ्यांच्या याद्यांचा काहीच उपयोग नाही. हे पदाधिकारी रस्त्यावर उतरणारे हवेत. पक्षाच्या संघटनेची नव्याने पुर्नरचना करण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींनी अमित पाटकर यांना दिले आहेत. याचा अर्थ श्रेष्ठींनी अमित पाटकर यांच्यावर विश्वास ठेवला आहे. किमान हे ओळखून आता तरी त्यांच्या विरोधकांनी त्यांना साथ द्यावी किंवा पटत नसेल तर वेगळा मार्ग स्वीकारावा. पक्षात राहूनच पक्षाला अडचणीत आणण्याचे हे कारनामे काँग्रेस पक्षाने खपवून घेतल्यास त्यांचे सत्तेतील फेरआगमन कठीण बनणार आहे हे मात्र खरे.

  • Related Posts

    भाजपचे वैभव आणि जनतेचे वास्तव

    या प्रदीर्घ सत्ताकाळाचे मूल्यमापन आता केवळ पक्षाच्या वाढलेल्या वैभवावरून नव्हे, तर जनतेच्या जीवनमानावरून झाले पाहिजे. गोवा भाजपच्या नव्या कार्यालयाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कदंब पठारावर जमीन खरेदी करून उभारण्यात…

    कोलवाळ तुरुंग की गैरकारभाराचा अड्डा?

    तुरुंग प्रशासन हे गृह खात्याच्या कार्यक्षमतेचेही प्रतिबिंब असते. त्यामुळे प्रत्येक प्रकरण स्वतंत्र मानून त्यावर मलमपट्टी करण्याऐवजी संपूर्ण तुरुंग व्यवस्थेचे स्वतंत्र आणि सर्वंकष सुरक्षा ऑडिट करण्याची वेळ आली आहे. कोलवाळ मध्यवर्ती…

    You Missed

    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 9 views
    Private Bus Owners Serve 7-Day Ultimatum to Goa Government, Threaten Black Flag Protest

    पत्रकारांना ‘दिमागी नक्षल’ ठरवणे निषेधार्ह

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 17 views
    पत्रकारांना ‘दिमागी नक्षल’ ठरवणे निषेधार्ह

    Congress demands probe into alleged ‘parallel cash economy’ in Colvale Jail

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 23, 2026
    • 17 views
    Congress demands probe into alleged ‘parallel cash economy’ in Colvale Jail

    Kejriwal to Hold Goa Town Hall Against ‘Forced E20’ on August 25

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 22, 2026
    • 21 views
    Kejriwal to Hold Goa Town Hall Against ‘Forced E20’ on August 25

    22/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 22, 2026
    • 26 views
    22/08/2026 e-paper

    १३७१ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 22, 2026
    • 22 views
    १३७१ कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला