
दिल्लीत श्रेष्ठींच्या भेटीनंतर दीपक ढवळीकरांचे प्रतिपादन
गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहत आहेत. देशातील समस्त हिंदू समाजाने एकजुट व्हावे, ही त्यांची इच्छा असल्याने गोव्यात समविचार मगो-भाजप युती होणे गरजेचे आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यासंबंधीचे स्पष्ट संकेत मिळाल्याची माहिती मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.
राज्यात प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यानंतर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी उघडपणे मगोला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींची भेट घेतली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांच्या भेटीनंतर आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मगो-भाजप युती कायम राहणारच आहे आणि त्याचबरोबर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपला हव्या आहेत, असेही बी.एल. संतोष यांनी स्पष्ट केल्याचे दीपक ढवळीकर म्हणाले.
या मंत्र्याला अधिकार दिले का?
मगो-भाजप युतीबाबत उघडपणे बोलणारे तसेच मगोची बदनामी करणाऱ्या मंत्र्याला युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत काय, असा सवाल ढवळीकर बंधूंनी भाजप श्रेष्ठींना केल्याचेही दीपक ढवळीकर म्हणाले. या प्रकरणी पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालण्याचे वचन दिले आहे. मगो-भाजप संबंधात कुठल्याही पद्धतीची कटुता निर्माण होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. मगोचा आदर आणि सन्मान राखला जाईल, असा शब्दही मिळाल्याचे दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. उमेदवारी वाटपाबाबतचा निर्णय हा निवडणूक सर्वेक्षणावरून ठरणार असल्याचेही ते म्हणाले.